आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कुएं को कुआं नहीं मिलता आदमी को आदमी मिल जाता है’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विक्रांत बदरखे  

आम्ही कबीर ऐकला पाहिजे...आम्ही बुल्लेशाह समजून घेतला पाहिजे...आम्हाला तुकाराम पचला पाहिजे...आम्ही चमत्काराला बगल दिली पाहिजे आणि गणपती महाराजांसारखे "अजात' झाले पाहिजे... आम्ही यात्रा केली पाहिजे... "राजस्थान कबीर यात्रा'
 
मी नवव्या मजल्यावरच्या माझ्या बाल्कनीत उभा आहे... माझ्यासमोर जमिनीचा भलामोठा तुकडा आहे, त्यावर हिरवळ पसरलेली आहे. तिथे एक कौलारू घर सोडता काहीही नाही. मेन रोडपासून त्या घरापर्यंत येणारी वाट नागमोडी आहे. ती स्वतःहून स्फुरलेली नाही..वाटा स्वतःहून स्फुरत नाहीत तर बनवाव्या लागतात. जो डोंगराची रेघ ओढतो तोच झाडांनाही वळण देतो, पण तो वाटा बनवू शकत नाही. वाटा बनवणारी माणसे असतात... पहिला चालत जाणारा माणूस सरळ चालत न जाता नागमोडी आकारात चालत गेला असेल? 

मित्र म्हणे...माणसं त्यातल्या त्यात क्रिएटिव्ह होण्याचा प्रयत्न करतात रे..!
आमच्या आज्जीने घरगड्याला सांगून सुगरणीचे घरटे मागवून घेतले ते अंगणातल्या पेरूच्या झाडावर टांगले..तिची क्रिएटिव्हिटी तिथपर्यंतच होती. तरीही त्या पहिल्या चालत जाणाऱ्या माणसाविषयीचे माझे आकर्षण कमी होत नाही. रस्ते बनवणं हे शास्त्र नसून तो एक कलाप्रकार आहे, असं मला वाटतं. 

आम्हीही स्वतःला "हॅशटॅग' आर्टिस्ट म्हणवतो. आम्ही "फॅब इंडिया'चे कुर्ते घालतो...नाटकाच्या प्रयोगांना कॉटनच्या साड्या घालून जातो...फेसबुकवर समीक्षा लिहितो...वाइन पितो...आत्मशोधासाठी बुलेटवर लडाखला जातो...स्वतःला "सोलो ट्रॅव्हलर' म्हणवतो...घरात बुद्धिस्ट फ्लॅग लावतो..."सेपियन्स' विकत घेतो "सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक' आपल्या "इन्स्टा' स्टोरीला ठेवतो...ब्लाऊजमधून "ब्रा' दिसण्याला फेमिनिझम म्हणतो...आम्ही रवीश कुमारचे प्राइम टाइम बघतो...कन्हैया कुमारचा डीपी लावून स्वतःला अॅक्टिव्हिस्ट म्हणवतो...आम्ही जुनी नाटकं पुनरुज्जीवित करतो...आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याला एकच प्रदेश समजतो. तिथल्या शेतकरी आत्महत्यांवर आम्ही कमी पैशात फिल्म करतो.. त्या फिल्मला फेस्टिव्हल फिल्म म्हणवतो...आम्ही शॉर्टफिल्म्ससुद्धा करतो आणि फीचर फिल्म्सवर येणार नाहीत इतके लेख छापून आणतो. पाँडेचरी किंवा तत्सम ठिकाणावरून चार दिवसांचे वर्कशॉप करून आल्यावर आम्ही पुण्या-मुंबईत एका दिवसाचे पेड वर्कशॉप घेतो. वर्ल्ड सिनेमामधील एखादी भारीतली फ्रेम आम्ही कव्हर पिक्चरला लावतो. आम्ही यूट्यूब, कोक स्टुडिअो ऐकतो आणि "ट्रान्स'मध्ये जातो....
हे सगळं करत असताना राजस्थानमध्ये "बुल्लेशाह' गाणारा मीर बस्सू हा सहा हजार रुपये महिना या पगारावर ड्रायव्हरी करत असतो.

"कोसला' मधला नायक पांडुरंग सांगवीकर हरला..गावी गेला..हो हो म्हणत सुटला...म्हणाला..तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य आहे...आम्ही सगळे हरलेले "हो हो' म्हणत सुटलेले,  परंतु परत फिरण्याची इच्छा व हिंमत नसलेले लोक आहोत..

आम्ही स्वतःला बडवून घेतले पाहिजे. आम्ही आमचे कवितासंग्रह फाडून त्याच्या पानांनी लहान पोरांची ढुंगणं धुतली पाहिजेत.. आमच्या कथासंग्रहाचं पानं फाडून त्याची घडी करून बिअर बारच्या त्या टेबलाखाली लावलं पाहिजे ज्या टेबलाचा एक पाय छोटा आहे...त्या टेबलाला बॅलन्स करू शकेल इतकीही आमच्या कथेत ताकद नाही...आमची नाटकं एसटीच्या तिकिटाच्या मागे लिहावीत इतकीही त्यांची लायकी नाही... आम्ही स्वतःला सांगितले पाहिजे की आम्ही वांझ आहोत...आम्ही नवीन काहीही निर्माण करू शकत नाही.
आम्ही कबीर ऐकला पाहिजे...आम्ही बुल्लेशाह समजून घेतला पाहिजे...आम्हाला तुकाराम पचला पाहिजे...आम्ही चमत्काराला बगल दिली पाहिजे आणि गणपती महाराजांसारखे "अजात' झाले पाहिजे.
आम्ही यात्रा केली पाहिजे.

"राजस्थान कबीर यात्रा'
आलो...
माझ्यासारखे दोनशे जण आले... 
यात्रा करणं मला दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन स्वतःला आवाज देण्यासारखं वाटतं. 
“सब ठौर जमात हमारी 
सब ठौर पर मेला 
हम सब मांय, सब हैं हम मांय 
हम है बहुरी अकेला”

कबीर यात्रा म्हणजे भारतात लोकसंगीताच्या माध्यमातून कबीर गाणाऱ्या आणि ऐकणाऱ्या लोकांचा मेळा. रोज मुक्काम हलतोय. सिकर, डुंलोद, फतेहपूर, रामगड अशा गावांतून खरा राजस्थान कळत जातोय..
नवीन लोक भेटतायत.. कहां से हो? पासून संभाषणाला सुरुवात होते.. थोड्या वेळाने तुम्ही कबीरच्या सान्निध्यात गात असता तेव्हा "हायवे' चित्रपटातील गिरीश कुलकर्णीचं पात्र बोलत असलेल्या संवादावरचा विश्वास आणखी ठाम होतो. ते पात्र म्हणतं..
"सगळी माणसं आपली असतात'
सीकरमध्ये पोहोचलो... इथे 'व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी' ने अफवा पसरवली की "दहा' ची नाणी बंद होणार आहेत. लोकांनी हितभराचं हातभर करून सांगितलं की, मार्केटमध्ये दहा रुपयांची नकली नाणी आली आहेत..खरं-खोटं ओळखण्यासाठी नोटेच्या आत तार असते तसं माणसाच्या आत काय असतं? समस्या अशी की ही दहाची नाणी कोणीच स्वीकारेनासं झालं, अगदी बँकाही... ही नाणी पडून आहेत. एका हलवायाने मला त्याच्याकडची सहा हजारांची नाणी दाखवली. सकाळी एक जण मला म्हणाला..
"सिर्फ मंदिरों का बन के रह गया है सीकर..लोगों का ट्रस्ट टूट गया है..'
पाव्हण्या माणसाजवळ जेव्हा एखादा आपल्याच शहराबद्दल छी थू करतो तेव्हा समजून जावं..जखम आपल्याला दिसते तेवढीच नाही अधिक गहरी आहे. 
व्हॉट्सअॅपने अशा अनेक अफवा मोठ्या केल्या..
"जो बात बिगाड में है वो मिलाप में कहा'
मीर सत्तू आणि सत्तार ह्या दोन बुल्लेशाह गाणाऱ्या भावंडांनी पाकिस्तानमधून एक गाणं राजस्थानमध्ये आणलं..
"मुझे ले चल सजनानाल टिकटा दो लेले'
हे गाणं सीकर आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांच्या मनात घर करून आहे. हे गाणं पाकिस्तानमधून आलंय म्हणून लोक त्याचा द्वेष करत नाहीत किवां कुठलीही व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी ते हद्दपार करू शकत नाही. 
मी मीर सत्तूला विचारलं...
खरं-खोटं ओळखण्यासाठी नोटेच्या आत तार असते..तसं माणसाच्या आत काय असतं?
तो म्हणाला..
बुल्लेशाह कहते हंै..इन्सान के अंदर भी तार ही होता है जो ऊपर जोड़ देता है.
असाच एक तार जोडणारा भेटला. त्याचं नाव अन्वर खान... सायबेरियन पक्षी राजस्थानात येतात ते ठरावीक कालावधीसाठी. ऋतू बदलला की निघून जातात.. ऋतू बदलतोय हे पक्ष्यांना कळतं, माणसांना कळत नाही...मग साचलेपण येतं. अशा आशयाचं भजन त्याने गायलं...आम्ही शांत झालो...भजन ऐकताना कळलं नाही की आपण ऐकत होतो. ध्यानातून बाहेर आल्यावर कळतं आपण ध्यानात होतो. असे अनुभव यापूर्वी फक्त दोनदा आले. पुण्या-मुंबईत मन रमण्याच्या खूप कमी वेळा असतात..अशाच वेळी भुवनेश्वरला गेलो...कॅबने "धौली हिल्स' बघून परत चाललो होतो. धौली हिल्स म्हणजे ती जागा जिथे कलिंगा युद्धानंतर सम्राट अशोकाने शस्त्र टाकले आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला..अशी जागा जेथे अशोकाचे मतपरिवर्तन झाले.
 कॅब ड्रायव्हर म्हणाला, साहब, भुवनेश्वर का मतलब जानते हो? म्हटलं..नही.
भुवनेश्वर माने सारे भुवन के ईश्वर जहां इकठ्ठे रहते हैं..
मला फार काही नवल वाटलं नाही. लोक आपापल्या शहराच्या नावाच्या अशा फोडी करून सांगतात. त्याबद्दलच्या रोचक कहाण्या ऐकवतात...
मात्र त्यानंतर तो कॅब ड्रायव्हर म्हणाला... "सर यहां आकर अगर अशोक का मन बदल सकता है तो किसी का भी बदल सकता है....."
त्याच्या या वाक्याने मी शांत झालो...हातपाय थंड पडले. मी त्याच्याकडे न बघताच गाडी थांबवायला लावली. खाली उतरलो..पुलावर..खाली भुवनेश्वरच्या मधोमध वाहणारी "दया' नदी वाहत होती...त्यात मला खूप सारे कासव दिसले...मला प्रश्न पडू लागले.
ह्याने हे वाक्य आपल्यालाच का म्हटले? यात काही संकेत आहे का? हा माणूस नक्की ड्रायव्हर आहे का?
त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्या माणसाचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करतो..आठवत नाही. मी कॅब ड्रायव्हरशी सांभाळून बोलतो. ते कधीही तुमच्या आतल्या तारेला धक्का लावू शकतात. 
अशीच शांतता श्रीनगरला हजरतबल दर्ग्यात गवसली होती. थंड, शांत, सुफी.
भजन ऐकल्यावर अन्वर खानशी बोलण्यासारखे काहीच उरले नाही..तो म्हणाला..हम आपकी हालत समझ सकते हैं. आप सुनने वाले हैं..लोग आजकल सुनते नहीं.
मला जौन एलियाचा शेर आठवला..
एक ही हादसा तो है और वो ये कि आज तक
बात नहीं कही गई बात नहीं सुनी गई.
तो म्हणाला...ये हमारा सौभाग्य है आप जैसे सुननेवाले हमें मिले.

"कुएं को कुआं नहीं मिलता 
आदमी को आदमी मिल जाता है’

कबीर यात्रेत ज्या गायक-वादकांना भेटलो त्यांची कला, त्यांची गायकी कुठल्या साच्यात बांधता येण्यासारखी नाही..तिला घराणेशाहीची मोठी परंपरा नाही..त्या गायकीला प्रमाण गायकीची मोजपट्टी लावण्यात अर्थ नाही...ती अर्थ पोहोचवते...ती तुमची स्वतःशी गाठ घालून देते. गोष्टी जोपर्यंत शब्दात येत नाहीत तोपर्यंत त्या जास्त सुंदर असतात, शब्दात आल्या की त्यांचे सौंदर्य सीमित होते. न लिहिल्या गेलेल्या गोष्टी आपल्याला वाचता आल्या पाहिजेत. इथल्या गायकीच्या जशा दंतकथा बनतात तशा इथल्या गायकांच्याही बनतात. "बक्कू खान' नावाचे गायक होते. त्यांना मैफिलीच्या आधी ताप आला की लोक खुश होत. त्यांनी आयुष्यात कधीही औषध घेतले नाही. बक्कू खान अशा काही अफाट एनर्जीने गात की त्यांचा ताप निघून जाई...ते आपला ताप गाण्यातून घालवत. त्यामुळे लोकांना उमदी गायकी ऐकायला मिळे. "अब्दुल जब्बार' नावाचा गायक, तबलावादक यात्रेत आम्हाला विचारतो, गाणारा श्रेष्ठ की ऐकणारा? पुढे तो अकबराच्या दरबारातली गोष्ट सांगतो. एकदा अकबराच्या दरबारात बहस झाली, गाणारा श्रेष्ठ की ऐकणारा? तानसेन म्हणाला, गाणारा श्रेष्ठ.  बिरबल म्हणाला, ऐकणारा श्रेष्ठ. एकदा अकबर बिरबल आणि तानसेन शिकारीला निघाले. वाटेत बकऱ्या चारणाऱ्या माणसाकडे त्यांचा मुक्काम होता. रात्री तानसेन गायला लागला..जसा तानसेन हरकती घ्यायचा तसतसा तो बकरीवाला जळत्या चुलीत लोखंडी सळया टाकायचा...तानसेनची गायकी रंगात आलेली असता बकरीवाला आणखी त्वेषाने सळया चुलीत टाकू लागला. अकबराने न राहवून शेवटी त्या बकरीवाल्याला विचारलेच, तू सळया चुलीत का टाकतोयस?

तो म्हणाला, तानसेनला जो रोग झालाय तोच रोग माझ्या बकऱ्यांना झाला होता..त्याही अशाच केकाटायच्या.. मग मी या लोखंडी सळया वितळवून त्यांचा डाग बकऱ्याच्या मानेला दिला तेव्हा कुठे त्यांचे केकाटणे बंद झाले. मला तानसेनच्या मानेलाही असाच डाग द्यायचा आहे.
कबीर यात्रेचा सारांश एका लेखात लिहिणे शक्य नाही. हेरिटेज साइटमधला काही भाग आम लोकांसाठी खुला असत नाही..तो भाग मी माझ्यापुरता राखीव ठेवलाय. निघताना मी मित्राला म्हणतो, परत जाण्याचं मन होत नाही.
मित्र म्हणतो लीळाचरित्रात एक वचन आहे.
दिवस संध्या जाऊ नेदीजे : 
एका झाडाची सवे ना होवावी :
एका स्थळाची सवे ना होवावी :

लेखकाचा संपर्क - 9096100140

बातम्या आणखी आहेत...