आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव विकणे आहे: दुष्काळामुळे ग्रामस्थांनी गावच काढले विक्रीला, उद्योगपतींनी मालमत्तेची किंमत देण्याचा आग्रह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांनी सततच्या दुष्काळी स्थितीला कंटाळून ‘ गाव विकणे आहे’,  असा बोर्ड ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावला. गाव विक्री काढलेल्या या ग्रामस्थांनी अंबानी, अदानी, महिंद्रा यासारख्या मोठ्या उद्योगपतींना गाव विकत घेण्याचे आवाहन केले आहे.


ताकतोडा येथे यावर्षी सर्वसाधारण पाऊस झाला असून या गाव परिसरातील सुमारे ५० टक्के पेरण्या आजही झालेल्या नाहीत. त्यामुळे आणि पाऊस होत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पाऊस होत नाही या नैसर्गिक आपत्तीसोबतच शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण कर्जमुक्ती मिळाली नाही. पीक विम्याचे पैसे मिळेनात, गावामध्ये रोजगार नाही आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागत आहे. या अशा गंभीर समस्यांमुळे गावातील शेतकरी चांगलेच वैतागून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी  गावच विकायला काढले असून ज्या कुणाला गाव विकत घ्यायचा आहे त्यांनी आमच्या घरादाराचा आणि शेतीचा मोबदला देऊन खुशाल विकत घ्यावे. वेळ आलीच तर आम्हाला पण विकत घेऊन कुठेही रोजगार द्या असे आवाहन या ग्रामस्थांनी केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर, गाव विकणे आहे, असा फलक लावून ग्रामस्थांनी गावात आजपासून कोणतेच काम न करण्याचा ठराव घेतला.   त्यामुळे आज दिवसभरात सर्व शेतकरी सर्व कामधंदे सोडून गावात बसून होते. 
 

 

गाव विकण्याचाच पर्याय 
गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. या परिस्थितीला पावसासह शासनसुद्धा जबाबदार आहे.   शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे गावात राहून खितपत पडण्यापेक्षा  गाव विकून बाहेर कुठेतरी निघून जावे, यासाठी आम्ही गाव विकण्यासाठी काढले आहे.  उद्योगपतींनी आमच्या शरीरासह संपूर्ण मालमत्तेची किंमत देऊन आम्हाला विकत घ्यावे.
-  नामदेव पतंगे,  ग्रामस्थ, ताकतोडा.