आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामहोत्सव क्रिकेटचा की बाजारपेठेचा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ब्रेक्झिट’मुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडले आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला उभारी येण्यासाठीच विश्वचषक क्रिकेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे नजिकच्या काळात लक्षात येईल. जागतिक बाजारपेठ ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठीच मैदानात उतरली आहे, असे वाटते. क्रिकेटच्या रूढी, परंपरा, नितीमुल्य बाजूला सारून ब्रिटिशांनी विश्वचषकाचे आयोजन केले गेले आहे. क्रिकेट या खेळाच्या प्राथमिक मुल्यांशी प्रतारणा करणाऱ्या अनेक गोष्टींची, समारंभांची, कल्पनांची जोड या महोत्सवाला लाभली आहे.
 

 

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा म्हणजे या पृथ्वीवरच्या क्रिकेट या खेळाचा महामहोत्सव. दर चार वर्षांनी क्रिकेट विश्वाचा जगज्जेता कोण? या गहन प्रश्नाचे उत्तर देणारा महोत्सव. मात्र यंदाच्या इंग्लंडमधील स्पर्धेपासून या खेळाची ओळख बदलली जाईल. क्रिकेटचा हा महामहोत्सव यंदापासून अर्थव्यवस्थेच्या ताब्यात जाणार आहे. बाजारपेठेचा महामहोत्सव अशी या महोत्सवाची नवी ओळख जगासमोर येईल. ‘ब्रेक्झिट’मुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडले आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला उभारी येण्यासाठीच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे नजिकच्या काळात लक्षात येईल. जागतिक बाजारपेठ ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठीच मैदानात उतरली आहे, असे वाटते. क्रिकेटच्या रूढी, परंपरा, नितीमुल्य बाजूला सारून ब्रिटिशांनी विश्वचषकाचे आयोजन केले गेले आहे. १९७५ ते १९८३चे विश्वचषक, १९९९चा विश्वचषक आणि २०१९चा विश्वचषक यामध्ये वरील तफावत आहे. क्रिकेट या खेळाच्या प्राथमिक मुल्यांशी प्रतारणा करणाऱ्या अनेक गोष्टींची, समारंभांची, कल्पनांची जोड या महोत्सवाला लाभली आहे.]


‘ब्रेक्झिट’च्या संकटातून सावरण्यासाठी दिलेल्या ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या मुदतवाढीपर्यंत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये विश्वचषक २०१९चे आयोजन हा जालीम उपाय आहे. त्यासाठी सरकारी पातळीपासून, वैयक्तिक स्तरावर विविध योजना, आखल्या जात आहेत. ‘ब्रेझिट’चा फटका सुसह्य व्हावा यासाठीचे हे प्रयत्न आहेत. घटनेतली गुंतवणूक, संभाव्य बेरोजगारी, स्टर्लिंग पौंडची घसरगुंडी, वाढत्या महागाईचा धोका यावर क्रिकेटच्या विश्वातील लोकप्रियतेचा जालीम उपाय या स्पर्धेच्या निमित्ताने केला गेला आहे.

 

इंग्लंड फेव्हरेट..
इंग्लंडचा क्रिकेट संघ ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.  पाकिस्तानविरुद्ध मालिका ४-० अशी जिंकताना या संघाने आपल्या ताकदीची चुणूक दाखविली. कागदावरही त्यांचा संघ प्रबळ, समतोल आणि कोणतेही आव्हान स्वीकारण्याची क्षमता असलेला आहे. असे जरी असले तरीही इंग्लंड संघच विजेता व्हावा यासाठी तेथील संपूर्ण बाजारव्यवस्था कामाला लागणार आहे. कारण इंग्लंड संघाचे विश्वविजेतेपद देशाच्या सर्व व्यवस्थांना नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. 

 


इंग्लंडसारख्या संघाने सुरुवातीला बचाव करून विकेट शाबूत ठेवून मग आक्रमण करायचे हे डावपेच सोडून दिले आहेत. पहिल्या चेंडूपासूनच इंग्लंडचा संघ आक्रमण करतो. जे धाडस किंवा पद्धत श्रीलंकेने जयसूर्या- कालूविथराने यांच्या जोडीपासून सुरू केली होती. आज इंग्लंड हीच पद्धत अंगिकारत आहे. कारण त्यांच्याकडे विकेट पडल्यानंतरही डाव सावरण्यासाठी जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. विश्वचषक जिंकण्याची सर्वोत्तम संधी इंग्लंडला यावेळीच आहे. कोहलीप्रमाणेच उत्तम फॉर्म असलेला ज्यो रूट, आयपीएलचा फॉर्म घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेला जॉनी बेअरस्टो, मॉर्गन, जेसन रॉय, जोस बटलर, बेन स्टोक्स, यांच्या जोडीला, वोक्स, मोईन अली, टॉम करन, अशी मजबूत फलंदाजांची फळी इंग्लंडकडे आहे. यजमान इंग्लंडकडे गोलंदाजीचाही लाभ आहे.

 

आयेगा तो कोहलीही...
यंदाचा विश्वचषक जिंकणे हे तमाम भारतीयांचे म्हणजे सुमारे १३० कोटी भारतवासीयांचे स्वप्न आहे. कोहलीच्या संघाने देशवासियांना तसा भरवसा वाटावा अशी कामगिरीही अलिकडच्या काळात केली आहे. त्यामुळे विजेतेपदाची अपेक्षा करणे गैर नाही. मात्र भिती एका गोष्टीची वाटते. इंग्लंडमधील सध्याच्या खेळपट्‌ट्या पाटा, ठणठणीत, फलंदाजांना धार्जिण्या अशा तयार करण्यात आल्या आहेत. या खेळपट्‌ट्यांवर यंदा ५० षटकांमध्ये ५०० धावांची मुहूर्तमेढ कोणत्या तरी संघांकडून रोवली जाईल अशीही भविष्यवाणी वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत भारताच्या फिरकी गोलंदाजांची कामगिरीच निर्णायक ठरणार आहे. फिरकी गोलंदाजांचे यशापयश भारताच्या विजेतेपदावर परिणाम करणारे असेल.

 


फिरकी गोलंदाज चालले नाहीत तर भारत विश्वचषकापर्यंत पोहचू शकणार नाही. पाटा खेळपट्‌ट्यांवर मध्यमगती गोलंदाजांचे ‘स्पेल’ संपले, मोठ्या भागीदाऱ्या फिरकी गोलंदाजांना संपविता आल्या नाहीत तर ३५०च्या जवळपास उभारलेली धावसंख्या भारतीय फलंदाजांना पार करणे अवघड होणार आहे. कारण भारताला ३५० धावसंख्येपुढचे लक्ष्य गाठण्यासाठी १५०-२००च्या सलामीची गरज लागणार आहे. कारण भारताकडे मधल्या फळीनंतर फलंदाजांची स्फोटक फळी नाही. याचाच अर्थ असा की ‘टॉप’ पाच मधील फलंदाज अखेरपर्यंत टिकले नाहीत तर तळाच्या किंवा अष्टपैलू खेळाडूंकडून वेगात धावसंख्या उभारणे सातत्याने शक्य होणार नाही. पाटा खेळपट्‌टीवर भारताच्या पाचव्या गोलंदाजांच्या गोलंदाजीचे महत्व अधोरेखित होणार आहे. हार्दिक पंड्या किंवा विजय शंकर हे १०-१० षटकांचे संपूर्ण स्पेल गोलंदाजी करण्याइतपत क्षमतेचे नाहीत. त्यामुळे बुमरा, शामी आणि चेंडू स्वींग होत असल्यास प्रभावी ठरणारा भुवनेश्वर यांच्यानंतरच्या २० षटकांमध्ये भारताच्या सामन्याचे भवितव्य ठरणार आहे.
मधल्या  फळीत  अजिंक्य रहाणेसारखा अष्टपैलू खेळाडू गरजेचा होता. कारण एका टोकाला उभे राहून भागिदाऱ्या रचण्याची त्याची क्षमता आहे. केदार जाधव किंवा निवृत्तीकडे आलेल्या धोनीकडून तशी अपेक्षा करता येत नाही. केदार जाधवची मर्यादाही अर्धशतकापर्यंतचीच आहे हेही वारंवार सिद्ध झाले आहे. यष्टीरक्षण करून थकलेल्या धोनीकडून फलंदाजीत आपण किती अपेक्षा करायची यालाही मर्यादा आहे. भुवनेश्वरकुमार सोडला तर भारताच्या पाच गोलंदाजांनी भारताला वेगात आणि आवश्यक तेवढ्या धावा काढून जिंकून दिल्याचे एकही उदाहरण सापडत नाही. त्यामुळे फिरकी गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या रोखून धरली तरच भारतीय फलंदाजीला दडपणाखाली खेळता येईल.

 

हम किसी से कम नही...
सर्वाधिक विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियन संघ सावरला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथच्या आगमनामुळे त्यांच्या फलंदाजीला बळकटी प्राप्त झाली आहे. त्यांनी भारताप्रमाणे अजिंक्य राहणेला संघाबाहेर ठेवून खच्ची करण्याचे काम केले नाही; त्यांनी याउलट डावाला स्थैर्य देण्यासाठी उस्मान ख्वाजावर सातत्याने विश्वास टाकला. कप्तान अॅरॉन फिंच, शॉन मार्श, मॅक्सवेल, धोकादायक मार्कस स्टॉयनीस, या फलंदाजांना कमिन्स, स्टार्क, रिचर्डसन, कल्टर - नाईल, बेहरेनडॉर्फ, यांच्या जोडीला लायन व झम्पा ही फिरकी जोडी असा संघाचा समतोल साधला आहे.


डुफ्लेसीसचा दक्षिण आफ्रिकन संघही पूर्ण भरात आहे, फलंदाजी व गोलंदाजीत समतोल असणारा हा संघ इंग्लंडप्रमाणेच विश्वचषक विजेते पदाच्या प्रतिक्षेत आहे. श्रीलंकेचा संघ मात्र देशातील अंतर्गत घडामोडी संघातील भांडणे आणि माजी खेळाडूंवरील कारवाई यामुळे अद्विग्न झाला आहे. पाकिस्तान संघ धक्का देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. १९९२च्या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना अपेक्षांच्या विपरित हा संघ पुढे आला होता. सर्फराझ अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाकडे नवे, ताज्या दमाचे गोलंदाज व फलंदाज आहेत. 

 


दहा संघांच्या उर्वरित गोतावळ्यांमध्ये बलाढ्य संघाची झोप उडविण्याची क्षमता असलेली अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. त्यापैकी एक संघ निश्चितच उपांत्य किंवा बाद फेरीत पोहोचण्याची क्षमता राखून आहे.

 


ख्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, हेटमायर, शाही होप या फलंदाजीच्या तोफा आहेत. यापैकी एक-दोन तोफा धडधडत्या तरीही कोणत्याही संघाची धूळदाण उडवू शकतात. कप्तान जेसन होल्डरसोबत, ओशोने थॉमस, शॅनॉन गॅबिएल, केमार रोच यांचा भन्नाट वेगवान मारा कोणतेही प्रतिस्पर्धी गुंडाळू शकतो. त्यामुळे या विश्वचषकाचा ‘डार्क हॉर्स’ वेस्ट इंडिज संघच असेल.

 

ड्रॉप इन पिचेस
इंग्लंडने या स्पर्धेत अनेक परंपरा-रूढी मोडून नव्या बदलाचा कल्पनांचा स्वीकार केला आहे. ‘ड्रॉप इन पिचेस’ला त्यांनी अनुकूलता दर्शविली असून, सध्या इंग्लंडमधील तीन क्रिकेट मैदानांवर ड्रॉप इन खेळपट्‌ट्या आहेत. इंग्लंडमधील सर्व क्युरेटर्सना सध्या ड्रॉप इन खेळपट्यांबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.

 

विविधांगी विश्वचषक
> पन्नास षटकांच्या क्रिकेट सामन्यांचा रोमांचक प्रवास या ब्रिटनच्या भूमीवर (१९७५) सुरू झाला. तेथे तब्बल दोन दशकानंतर  १९९९च्या विश्वचषकानंतर, पुन्हा एकदा पन्नास षटकांचे क्रिकेट परतत आहे. दरम्यानच्या काळात क्रिकेटने कात टाकली. ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटचे जबरदस्त आव्हान या क्रिकेट पुढे उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःचे अस्तित्व कायम राखतानाच या क्रिकेटला नवी झळाळी, नवे मापदंड क्रिकेट विश्वापुढे ठेवायचे आहेत. क्रिकेटच्या समुद्रमंथनातून बाहेर पडलेली दहा देशांची रत्ने. त्यांच्यामध्ये तब्बल सहा आठवडे होणारे घमासान युद्ध. सनसनाटी सामन्यांची अविट मेजवानी. ४६ दिवस चालणारा क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम जागर. सातासमुद्रापलीकडे ब्रिटनच्या भूमीवर होणारा हा रणसंग्राम भारताच्या सव्वाशे कोटी जनतेच्या हृदयाचे ठोके वाढविणारा असेल. प्रत्येक संघ साखळी साखळीत प्रत्येकाची दोन दोन हात करणार आहे. त्यामुळे एखाददुसऱ्या पराभवाने स्पर्धेबाहेर फेकले जाण्याचा धोका नाही. प्रत्येक संघाला प्रत्येक संघाशी आपले कौशल्य आजमावता येणार आहे. १९९२ चा विश्वचषक याच स्पर्धेच्या धर्तीवर खेळला गेला होता. त्यावेळी पूर्वार्धात धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या भारताची उत्तरार्धात मात्र दमछाक झाली आणि आपण बाद फेरीपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यामुळे भारतात विश्वचषक आणण्याचा असेल तर कोहली आणि कंपनीला खेळातील फॉर्मबरोबर स्टॅमिनाही कायम राखावा लागेल.

 

> विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम किंवा उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकिटांपेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांच्या तिकिटाला प्रचंड मागणी आहे. आता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारत-पाकिस्तान सामन्यातील प्रत्येक उपलब्ध तिकीटासाठी जगातील ६६ क्रिकेट रसिक प्रयत्न करीत आहेत. काळ्याबाजारात भारताच्या सामन्याची किंमत काही लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 

 

संघ परदेशी पुरस्कर्ते मात्र देशी
भारतातील अनेक पुरस्कर्त्यांनी परदेशी क्रिकेट संघांना वेगवेगळ्या स्तरावर पुरस्कृत केले आहे. त्यापैकी प्रमुख टायटल स्पॉन्सर्स आहेत. अमूल आणि केंट आर ओ या दोन कंपन्या ‘अमूल’ने अफगाणिस्तान संघाच्या प्रमुख पुरस्कर्त्याची भूमिका स्वीकारली आहे तर ‘केंट आरो’ने श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला पुरस्कृत केले आहे.

 

आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत.
1. ग्लोबल पार्टनर्स : निस्सान, ओप्पो, एमआरएफ टायर्स, एमिरेट्स एअरलाइन्स.
2. ग्लोबल पार्टनर्स : मनी ग्राम
3. टाईमिंग पार्टनर : ह्युब्लॉट
4. वाईन पार्टनर : वोल्फ ब्लास
5. त्याशिवाय आयसीसीने स्पोर्ट्स ट्रॅव्हल्स ग्रुपला पाहुणचार सोयी पुरविण्याचे अधिकार दिले आहेत.
6. आयसीसीच्या ब्रॅन्ड आणि स्मृतिचिन्हे याचे अधिकार वेलोसिटीला दिले आहेत.
 

विनायक दळवी
vinayakdalvi41@gmail.com

बातम्या आणखी आहेत...