आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेसवर ठरेल संघाचे यशापयश  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धा चार वर्षांनी एकदा येते तर आयपीएल दरवर्षी असते,’ हे विधान दुसऱ्या कुणाचे नाही, तर दस्तुरखुद्द टीम इंडियाच्या कप्तान विराट कोहलीचे आहे. दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवल्याचा भारतीय खेळाडूंमधला जोश २-३ अशा भारतातच गमावलेल्या मालिकेत दिसला नाही. गेले वर्षभर सतत क्रिकेट खेळलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंवर खेळाचा पडलेला ताण आता स्पष्ट होऊ लागला आहे. कोहलीपाठोपाठ भुवनेश्वर कुमारनेही आयपीएल स्पर्धेतील संभाव्य ताणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.  
देश की फ्रँचायझी मोठी? या प्रश्नाचे उत्तर भारतीय खेळाडूंनी स्वत:च स्वत:ला द्यायचे आहे. कोहलीएवढा धीटपणा इतर खेळाडूंमध्ये आहे का? स्पष्ट बोलण्याची हिंमत अन्य खेळाडूंना दाखवता येईल का? हा प्रश्न आहे. आपल्या संघाचा फ्रँचायझींचाच विचार करणाऱ्या संघ मालकांना हे रुचेल का? कोहली, भुवनेश्वरच्या मतप्रदर्शनानंतर कोणत्याही आयपीएल संघाने देशहिताला प्राधान्य दिले जाईल, असे अद्याप तरी म्हटलेले नाही.  


आयपीएलपेक्षा देशहिताला महत्त्व देणाऱ्या कोहलीने आयपीएल स्पर्धेच्या कामगिरीचा विश्वचषकाच्या संघनिवडीसाठी विचार होऊ नये, असेही स्पष्ट केले होते. एका अर्थी ही गोष्ट खरी आहे. ट्वेंटी-२० क्रिकेट आणि ५० षटकांचे किंवा कसोटी क्रिकेट यामध्ये क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेचा खरा कस लागतो. मात्र, त्याच वेळी एक गोष्टही खटकते, ती म्हणजे यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, के. एल. राहुल, भुमरा हे भारतीय संघातील विद्यमान खेळाडूही आयपीएलमध्येच सापडले. त्याच फॉर्मवर ते संघात आले.   
कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या समारोपालाच भारतीय संघातील अंतिम निवड जवळजवळ निश्चित केल्याचे विधान केले. एखाद् दुसरा बदल फार तर करण्याची गरज आहे, असं तो म्हणतो.  


भारतीय कप्तानाच्या मताचा आदर केल्यास निवड समितीची आता गरजच नाही. संघात जे खेळत आहेत, त्यांनाच आळीपाळीने खेळवले पाहिजे. याचाच अर्थ असा की भारताकडे राखीव फळी नाही किंवा अन्य खेळाडूंकडे विद्यमान संघ व्यवस्थापनाला कोहली-शास्त्री आणि कंपनीला पाहायचेच नाही. स्थानिक क्रिकेटच्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना वेळीच संधी द्यायची नाही. फॉर्म संपला की खेळवून त्याच्या अपयशाकडे बोट दाखवायचे. अंबाती रायडूबाबत असेच झाले. हनुमा विहारीला भावी खेळाडू म्हणून घेतले आणि बाजूलाही केले. मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला संघात स्थान देताना केवढा गाजावाजा केला. सध्या पृथ्वी शॉ कुठे आहे? ना भारताच्या कोणत्याही संघात वा ‘सेंट्रल काँट्रॅक्ट’मध्येही. युवा खेळाडूना अचानक निवडायचे आणि अचानक वगळायचे हे धोरण भारताच्या क्रिकेट भवितव्याच्या दृष्टीने मारक आहे.  


अंतिम संघाची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे, असे भारतीय संघाच्या कप्तानाने विधान करणेही भवितव्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. संघ निवड निश्चित आहे, मग अन्य स्पर्धा किंवा निवडीचा फार्स तरी कशाला करायचा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ठेवली गेली. त्यासाठी काही पर्यायी, राखीव खेळाडूंना संधी देऊन पाहिली. यष्टिरक्षणात निवृत्तीकडे झुकलेल्या धोनीच्या बरोबरीचा यष्टिरक्षक आपल्याकडे अद्याप नाही, हे दुर्दैव. तरुण ऋषभ पंत चौथ्या-पाचव्या क्रमांकावर येऊन धावा काढू शकला तर चांगलेच आहे. पण यष्टीपाठी त्याने झेल सोडले. धावचीतच्या संधी गमावल्या तर ती गोष्ट त्याने काढलेल्या धावांपेक्षाही अधिक नुकसान करणारी आहे.  


ऋषभ पंतकडून खूप अपेक्षा आहेत. त्याची तुलना तर चक्क ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टची केली जाते. दुर्दैवाने तो यष्टिरक्षणात खूप कच्चा असल्याचे भारताच्या अनेक माजी यष्टिरक्षकांचे मत आहे. मुळात त्याच्या ट्वेंटी-२०च्या यष्टिरक्षणावरून ५० षटकांच्या सामन्यासाठी, कसोटी सामन्यासाठी योग्यता ठरवणे चुकीचे आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याला फिरकी गोलंदाजांच्या षटकांसाठी यष्टिरक्षण करावे लागत नाही. जेव्हा ५० षटकांमध्ये २० ते २५ षटके फिरकी गोलंदाजांसमोर यष्टिरक्षण करताना त्या वेळी त्याचे कच्चे दुवे उघडे पडताहेत. फिरक्या खेळपट्टीवर फलंदाज फिरकी घेतलेल्या चेंडूवर चुकला की पंतही चुकतो. तो चेंडूला मिळणारी फिरकी पाहत नाही आणि चेंडूवरची नजर हटवतो, असेही माजी यष्टिरक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चेंडू त्याच्या ग्लोव्हज््मध्ये येत नाही. दुसरा आक्षेप म्हणजे पंतची बोटे चेंडूवर झडप घालताना पुढे येतात. त्यामुळे कधी कधी चेंडू बोटांवर आपटून उडतो व ग्लोव्हज््मधून निसटतो.  
धोनीकडे असणारी चपळाई, धूर्तपणा त्याच्यामध्ये यायला बराच वेळ लागेल. त्यामुळे यष्टिरक्षणाचा प्रश्न अनुत्तरितच आहे. फलंदाजांना धावचीत करतानाची धोनीची कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू पकडण्यासाठी धावचीतची संधी निर्माण करण्याकरिता कोणती ‘पोझिशन’ हवी याचे अचूक ज्ञान धोनीला आहे. त्यामुळेच तो काही अशक्य कोटीतील धावचीतचे बळी सहज टिपताना पाहायला मिळतो. विश्वचषक स्पर्धेत भारताला यष्टिरक्षण करणारा फलंदाज नको, तर यष्टिरक्षण उत्तम करणारा कामचलाऊ फलंदाज हवा आहे. धोनीनंतर कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही समाधानकारक मिळत नाही, हीच खंत आहे. महंमद शमी, कुलदीप यादव आणि बुमराह हे अखेरचे तीन फलंदाज अनपेक्षितरीत्या उत्तम फलंदाजी करून भारताला जिंकवू शकतील, अशी आशा करताच येणार नाही, एवढा उत्तम फलंदाजीचा दर्जा आणि गतकामगिरीचा आदर्श या तिघांनी ठेवला आहे.  याचाच अर्थ भारताची फलंदाजी विराट कोहलीपासून सुरू होते आणि विराट कोहलीनंतर संपते.  


अजिंक्य रहाणेला दोन वर्षांपासून जबरदस्तीने एकदिवसीय क्रिकेटमधून हद्दपार केल्याची शिक्षा आपण भोगत आहोत. पुजारासारख्या फलंदाजालाही संथ खेळाचे लेबल लावून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. खरं तर भारतीय संघातील तथाकथित फटकेबाज फलंदाजही अनेकदा संथच खेळतात आणि संधी मिळताच फटकेबाजी करून नंतर धावा वाढवतात, हा अनुभव आहे. राहणे-पुजारा यांना मात्र वेगळा न्याय आहे.  


इंग्लंडमध्ये स्विंग गोलंदाजी खेळण्यासाठी, स्वैर फटकेबाजी करणारे नव्हे तर तंत्रशुद्ध फलंदाजी करण्याची क्षमता नव्हे लायकी असणारे फलंदाज हवे आहेत. अजिंक्य रहाणे त्या वेळी उपयुक्त ठरला असता. गतवर्षी भारताला, इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात २०० धावांचे आव्हानही पार करता आले नव्हते, हा इतिहास अगदी ताजा आहे. त्यामुळे एका सामन्यात धावांचा डोंगर उभारायचा आणि नंतरच्या सामन्यात कोसळायचे, ही वृत्तीही बदलावी लागेल. गोलंदाजीच्या बाबतीतही तीच बोंब आहे. खरं तर कागदावर, जगातील सर्वोत्तम मध्यमगती व फिरकी गोलंदाजी फक्त भारताकडेच आहे. मात्र, आपण जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पूर्णपणे अवलंबून राहून चालणार नाही. त्याचे दोन साथीदार गोलंदाजी कशी टाकतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. भुवनेश्वर कुमार इंग्लंडच्या वातावरणात उत्तम आहेच. मात्र, त्याच्या फिटनेसबाबत कायम शंका असेल. कारण तो सलग किती सामने खेळू शकतो हे कुणीच सांगू शकणार नाही. दुखापतीनंतर महंमद शमीने पुनरागमन करून आजतागायत उत्तम फिटनेस दाखवला आहे. त्यामुळेच भीती वाटते की, तो दुखापत होण्याचा कालावधीच्या जवळ तर आला नाही ना?  


ऑस्ट्रेलियाच्या नवोदित संघाने भारताच्या फिरकी गोलंदाजीचा भारतातच नक्षा उतरवला हे बरे झाले. कारण, किमान त्यामुळे आपल्या फिरकीचा सामना कुणी करूच शकणार नाही, असा खोटा विश्वास तरी आपण यापुढे बाळगणार नाही.  
इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर तर नाहीच नाही, आपण कधी नव्हे एवढ्या वरच्या दर्जाच्या अपेक्षेने या वेळी विश्वचषक स्पर्धेत उतरत आहोत. आत्तापर्यंत सर्व संघांशी खेळण्याच्या धाटणीच्या १९९२ व १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेत आपण यशस्वी ठरलो नव्हतो. कारण प्रदीर्घ काळ चालणाऱ्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना अखेरच्या क्षणापर्यंत सुरुवातीचा फॉर्म कायम राखता आला नव्हता. स्पर्धेच्या उत्तरार्धात भारतीय खेळाडूंची दमछाक होते. आपली आत्ताच दमछाक झाल्यासारखे वाटत आहे. म्हणून इंग्लंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलियात भारतीय खेळाडूंनी दाखवलेला फॉर्म या वेळी भारतातील स्पर्धेत दिसला नाही. आयपीएल स्पर्धेत दमछाक होणार आहे, हेही निश्चित आहे. म्हणूनच दीड महिना चालणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा ‘फिटनेसच’ स्पर्धेतील यशापयश ठरवणारा असेल.


विनायक दळवी  
vinayakdalvi41@gmail.com  
(ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

बातम्या आणखी आहेत...