आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणदणीत विजयांचा दौरा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघाच्या ताकदीचा मुकुटमणी खरं तर कप्तान विराट कोहली आहे, जो पराभूत व्हायला घाबरत नाही. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर तो डावपेचांचे अनेक फासे टाकू शकतो. डावपेच चुकल्यानंतरही तो निराश होत नाही. कारण त्याच्याकडे प्लॅन 'ए' फसला तर प्लॅन 'बी' तयार असतो. 'बी'ला प्लॅन 'सी'चा पर्याय सज्ज असतो. विराटकडे संघातील खेळाडूंसाठीचे पर्यायही सज्ज असतात. कोण काय बोलेल याची पर्वा न करता तो आपल्या खेळाडूंची निवड करत असतो. 
गल्लीच्या दादाला त्याच्या घरात जाऊन हरवण्यातच खरी ताकद पणास लागते. वर्षभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कालखंड पाहिला की 'टीम इंडिया'चा संघच सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला दिसत आहे. भारत याआधीही क्रिकेटच्या शिखरावर होता. मात्र, त्या शिखरावर पोहोचूनही, आपल्या संघाकडे सार्वभौमत्वाचा रुबाब नव्हता. जरब नव्हती. मैदानात उतरल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरत नव्हती. क्रमांक अव्वल होता, पण 'सिंघम'चा रुबाब नव्हता. दहशत नव्हती. संघ कोणताही असो, प्रतिस्पर्धी संघ आधीच पराभूत व्हायचा. अगदी धोनीच्या २००७च्या ट्वेंटी-२० विश्वचषक विजेत्या संघाची अशी प्रतिभा नव्हती. दादागिरी नव्हती. २०११चा विश्वचषक जिंकणारा भारतीय संघही त्या ताकदीचा वाटत नव्हता. गेल्या वर्ष-दीड वर्षात मात्र असे चित्र दिसले नाही. इंग्लंडमध्ये १-४ अशी कसोटी मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाचेच इंग्लंडपेक्षा चाहते वाढले होते. दहशत वाढली होती. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावल्यानंतरही ५-१ अशी एकदिवसीय मालिका जिंकताना टीम इंडियानेच क्रिकेट रसिकांना विचार करायला लावले होते की, हाच का तो दक्षिण आफ्रिकेचा संघ ज्याने भारताला कसोटीत हरवले होते? 
आजपर्यंत आपल्या मायभूमीवर ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या कोणत्याही संघाला प्रबळ मानत नव्हता. या वेळीही ऑस्ट्रेलियाच्या माजी, दिग्गज खेळाडूंनी आणि क्रिकेट समीक्षकांनी सध्याच्या भारतीय संघांला मोठे लेखले नव्हते. अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत, भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट रसिकांचा अहंकार दुखावला गेला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पराभवाने खचले. तमाम ऑस्ट्रेलियन प्रसिद्धी माध्यमांनी प्रथमच आपल्या संघाच्या कचखाऊ व डरपोक वृत्तीवर टीका केली. भारताच्या गोलंदाजीविरुद्ध धावांचा पाठलाग करायला ऑस्ट्रेलियन संघ घाबरत होता. तब्बल कित्येक दशकांनंतर क्रिकेटमध्ये असे दृश्य पाहावयास मिळाले. याचे कारण अर्थातच भारताची भेदक आणि कल्पक गोलंदाजी. या गोलंदाजीला विराट कोहलीच्या आक्रमक नेतृत्वाचे बळ मिळाले आहे. त्या बळासोबतच सुधारलेले क्षेत्ररक्षण हीदेखील जमेची बाजू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी या साऱ्या गोष्टींची आवश्यकता असते. 
भारतीयांचे क्षेत्ररक्षण सुधारले कसे? संघांचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी ते गुपित सांगितले. श्रीधर म्हणत होते, चेंडूचा ठाव घेण्यासाठी अंतर्मनाची क्षमता वाढवण्याचा प्रयोग केला. प्रतिक्षिप्त क्रियेतील अवधी कमी करण्याचे उपाय योजले. वेगवेगळ्या वजनाचे आणि आकाराचे चामड्याचे चेंडू वेगवेगळ्या हवेच्या झोतांमध्ये वापरून क्षेत्ररक्षणाचा सराव केला गेला. स्लीपमधील झेलांचा सराव करण्यासाठी मशिन्सचा वापर करून चेंडू फेकण्याचा प्रयोग केला. फक्त क्रिकेटसाठी उपयुक्त ठरणारे सराव तंत्रज्ञान वापरले नाही, तर अन्य संयुक्तिक खेळांमध्ये वापरात असलेले तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उष्ण हवामानातून न्यूझीलंडमधील थंड आणि वेगवान वारे वाहणाऱ्या स्टेडियम्सवर भारतीय खेळाडूंना अडचण आली नाही. कारण न्यूझीलंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यास पुरेसा अवधी टीम इंडियाच्या खेळाडूंकडे नव्हता. न्यूझीलंडमधील वेगात घोंगावणारे वारे हे फलंदाज आणि गोलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकांसाठीही आव्हान होते. त्याचे अनुमान आधीच बांधल्यामुळे न्यूझीलंडमध्ये भारतीयांना त्रास झाला नाही. 
एकूणात क्षेत्ररक्षण सुधारल्यामुळे गोलंदाजीची धार अधिक तेज बनली. भारतीय संघ आपल्या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देऊ शकला. जी गोष्ट करणे आजपर्यंत एक श्रीमंती थाट समजला जात होता. भारताकडे फलंदाजी व गोलंदाजीत राखीव खेळाडू आहेत ही गोष्टच संघाची ताकद स्पष्ट करणारी आहे. संघाच्या ताकदीचा मुकुटमणी खरं तर कप्तान विराट कोहली आहे, जो पराभूत व्हायला घाबरत नाही. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर तो डावपेचांचे अनेक फासे टाकू शकतो. डावपेच चुकल्यानंतरही तो निराश होत नाही. कारण त्याच्याकडे प्लॅन 'ए' फसला तर प्लॅन 'बी' तयार असतो. 'बी'ला प्लॅन 'सी'चा पर्याय सज्ज असतो. विराटकडे संघातील खेळाडूंसाठीचे पर्यायही सज्ज असतात. कोण काय बोलेल याची पर्वा न करता तो आपल्या खेळाडूंची निवड करत असतो. फिरकी गोलंदाजीच्या आक्रमणाची आर. अश्विन व रवींद्र जाडेजा ही प्रथितयश जोडी फोडताना तो कचरला नाही. त्याने या दोघांना पर्याय म्हणून यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन मनगटी फिरकी गोलंदाजांचा यशस्वी वापर करून घेतला. २०१९चा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये चहल-कुलदीप जोडी त्याने आजमावून पाहिली. त्यातही तो यशस्वी ठरला. विराटने कसोटीमध्ये वेगवान गोलंदाजीत इशांत शर्माच्या अनुभवाचा हुशारीने वापर करून घेतला. जसप्रीत बुमराह हा एकदिवसीय क्रिकेटच्या गोलंदाजीसाठीच योग्य आहे, असा शिक्का त्याच्यावर मारण्यात आला होता. जसप्रीत बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी करून तो समज विराटने खोटा ठरवला. अंबाती रायडूला चौथा क्रमांक देण्याच्या प्रयोगावरही तो ठाम आहे. केदार जाधवची उपयुक्तता त्याने फलंदाजीतच नव्हे, तर कामचलाऊ फिरकी गोलंदाजीचा वापर करून सिद्ध केली. अष्टपैलू खेळाडूंची त्याला गरज आहे. भुवनेश्वर की हार्दिक पंड्या, हा महत्त्वाचा निर्णय त्याला विश्वचषकादरम्यान घ्यायचा आहे. धोनीच्या यष्टीमागच्या अनुभवाला तो महत्त्व देतो. त्याच्या यष्टीमागच्या निरीक्षणाचा लाभ विराटला घ्यायचा आहे. त्यामुळे दिनेश कार्तिकला यष्टीपाठी ठेवण्याऐवजी तो निव्वळ फलंदाज म्हणून खेळवणे पसंत करतो. रवींद्र जडेजा, चहल, कुलदीप यांच्या फिरकीचा खेळपट्टी व वातावरण पाहून तो वापर करतो. चहलच्या फिरकीला त्याने जास्त उघड होऊ दिले नाही. विश्वचषकातील तो त्याचा हुकमी एक्का असेल. शमीचा वाढलेला फिटनेस कोहलीची वेगवान गोलंदाजीची चिंता दूर करणारा आहे. शुभमन गिलसारख्या खेळाडूवर विराटने विश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. भारताच्या युवा संघातील खेळाडूंवर तो लक्ष ठेवून आहे. सध्याच्या क्रिकेट मालिकांपेक्षाही त्याचे लक्ष विश्वचषक स्पर्धेवर आहे. त्या स्पर्धेच्या दृष्टीने तो तयारी करत आहे. 
चांगले फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांबरोबरच विराटला त्याच्या कल्पनाशक्तीशी योग्य ताळमेळ असणारा क्रिकेट प्रशिक्षकही मिळाला आहे. रवी शास्त्रींच्या प्रशिक्षण शैलीबाबत नेहमीच टीका होत आली आहे. मात्र जेव्हा जेव्हा विराट यशस्वी ठरला त्या वेळी त्याने न चुकता रवी शास्त्रींच्या प्रशिक्षण शैलीचे कौतुक केले आहे. कप्तान-प्रशिक्षकांमधील हा ताळमेळच भारतीय संघाला यशापर्यंत नेत आहे. रवी शास्त्री इतर प्रशिक्षकांप्रमाणे मैदानात, नेटसमोर उभे राहून फारसे शिकवताना दिसत नाहीत. त्यांचे खेळाडूंवर मानसशास्त्राचे प्रयोग सुरू असतात. खेळाडूंची मानसिक क्षमता वाढवण्याकडे त्यांचा कल आहे. क्रिकेटची काळजी घेण्यासाठी संजय बांगर, बी. अरुणकुमार, श्रीधर हे प्रशिक्षक आहेत. संघ हरला, वादविवाद झाले किंवा खडतर प्रसंगाच्या वेळी शास्त्री प्रसिद्धी माध्यमांना सामोरे जातात. ते खेळाडूंना पुढे करत नाहीत, ही या संघाच्या यशाची आणखी एक बाजू. 
सध्या तमाम क्रिकेटविश्व अडथळ्यांच्या शर्यतींमधून जात आहे. यजमान इंग्लंडने भारताला स्वगृही हरवले असले तरीही सध्या वेस्ट इंडीजमध्ये उडालेली दाणादाण त्यांची विश्वचषकातील काळजी वाढवणारी आहे. ऑस्ट्रेलियन संघ स्मिथ-वॉर्नर प्रकरणानंतर स्थिरावलेला नाही. पाकिस्तान संघाची नेहमीप्रमाणे उंच-सखल कामगिरी सुरू आहे. न्यूझीलंडकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये शाश्वत संघ म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या संघाला भारताने ज्या सहजतेने त्यांच्याच मैदानात हरवले ते पाहता भारतीय संघाच्या वाढलेल्या ताकदीचा अंदाज सर्वांनाच आला आहे. एकंदरीत वर्षभरापूर्वीच इंग्लंड दौरा केल्याने खेळपट्ट्या, हवामान आणि प्रत्येक मैदानाची उपयुक्तता यांचे भारतीय संघाला चांगलेच ज्ञान आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या विश्वचषकावेळी इंग्लंडमधील भारतीय प्रेक्षकांची प्रचंड साथ विराटच्या संघाला स्वगृही खेळत असल्याचा 'फील' देणारी आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...