आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशर्टाची कॉलर वर करून राजहंसाच्या रुबाबदार चालीने खेळपट्टीवर येणारे अजित वाडेकर पाहणे म्हणजे एक अभूतपूर्व योग असायचा. त्यांच्या भात्यातील कव्हर्स व स्क्वेअरच्या पट्ट्यातील ड्राइव्हज पाहणे म्हणजे मेजवानी होती. उजव्या यष्टीबाहेरील चेंडू ज्या सफाईने ‘स्वीप’ करायचे त्या फटक्याची तुलना फक्त एका दर्जेदार शतकाशीच होऊ शकेल. त्यांच्या धावांच्या पासबुकातील प्रत्येक धावेवर फलंदाजीच्या फटक्यांच्या सौंदर्याची मोहोर होती.
अजित वाडेकर संघात आले आणि परदेशातील कसोटी जिंकण्याचा आनंद काय असतो ते भारतीयांना उमगले. अजित वाडेकर कप्तान झाले आणि विजयाचा परीसस्पर्श काय असतो हे तमाम भारतीयांनी अनुभवले. अजित वाडेकर क्रिकेट व्यवस्थापक-प्रशिक्षक झाले आणि सततचा पराभव पाचवीला पुजलेल्या भारतीय संघांला विजयाची चटक लागली. जगज्जेता बनण्याची स्वप्ने पडायला लागली. भारतीय क्रिकेटला तीन वेगवेगळ्या भूमिकांमधून वेगळ्याच उंचीवर नेणारा हा मसीहा गेला.
वाडेकर कप्तान असताना संघातील सहकाऱ्यांचे मित्र होते. प्रशिक्षक असताना खेळाडूंचे पालक होते. क्रिकेटपलीकडच्या विश्वात अनेकांना मदतीचा हात देणारा हा दाता होता.
स्वत:च्या धावांच्या पासबुकात वाढ व्हावी हे वगळता त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरंच काही केलं. १९६७-६८च्या सुमारास दर्जेदार वेगवान गोलंदाजीच्या माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणारी कमकुवत भारतीय फलंदाजी त्यांनी थोपवून धरली. त्यांच्या एकमेव शतकाचे योगदान पाहा किती मोठे होते! न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथील कसोटी जिंकण्यासाठी ते कारणीभूत ठरले. क्रिकेटपटू म्हणून यशाचा परिसस्पर्श घेऊनच त्यांनी भारतीय संघात पाऊल टाकले तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांद्वारे ते यशाचा अविभाज्य भाग बनून राहिले.
राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष विजय मर्चंट यांच्या अध्यक्षाच्या ‘कास्टिंग व्होट’मुळे अजित वाडेकर कप्तान झाले. टायगर पतौडीच्या राजेशाही नेतृत्वाचा शेवट झाला आणि वाडेकरांच्या रूपाने जनसामान्यांच्या क्रिकेटच्या वर्चस्वाचे वारे वाहू लागले. पतौडी कप्तान असताना मोजक्याच खेळाडूंशी बोलायचा. संघातील खेळाडूंमध्ये फारसा मिसळायचाही नाही. अजितच्या आगमनाबरोबरच ती प्रथा मोडली गेली. अजित प्रत्येकाला सहकारी, मित्र अगदी जवळचा वाटायला लागले. एकनाथ सोलकरसारख्या माळ्याच्या मुलाला ते जवळचे वाटू लागले. सुनील गावसकरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात विश्वविक्रमी धावसंख्येसाठी विश्वास निर्माण करणारा तो कप्तान होता.
हा सिलसिला त्यांच्या प्रत्येक बदललेल्या भूमिकेनंतरही कायम राहिला. त्यांनी भारतीय संघांचे नेतृत्व स्वीकारले त्या वेळी संघ गटांगळ्या खात होता. गारफिल्ड सोबर्सच्या बलाढ्य विंडीज संघाला कसोटीत पराभूत केल्यानंतर सर्वांच्या भुवया प्रथम उंचावल्या. विंडीजमध्ये मालिका जिंकून भारतीय संघ परतल्यानंतरही क्रिकेटविश्वाची पुढील इंग्लंड दौऱ्यातील यशाबाबत खात्री नव्हती. धूर्त इंग्लंडला, इंग्लिश हवामानात वाडेकरांचा संघ हरवू शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. इंग्लंडमध्येही त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. परदेशात सलग दोन कसोटी मालिका जिंकण्याचा तो पराक्रम अजूनही कुणालाही सध्या करता आला नाही.
याचे मुख्य कारण म्हणजे ते चाणाक्ष कप्तान होते. धूर्तपणा त्यांच्या डावपेचांमधून डोकावत होता. प्रत्येक खेळाडूची कुवत व क्षमता जाणून घेण्याचे कसब त्यांच्याकडे होते. प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच ओळखून त्यावर प्रतिडावपेच आखण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. दौऱ्याआधीच प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूचा अभ्यास ते करायचे. त्यांचे कच्चे दुवे व शक्तिस्थाने ओळखून रणनीती आखायचे.
व्यवस्थापकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही त्यांनी तोच ‘फॉर्म्युला’ वापरला. सध्याच्या क्रिकेट प्रशिक्षकांसारखे ते तंबूत बसून शिकवत नव्हते. मैदानात उतरायचे. ‘नेट’समोर उभे राहायचे. फलंदाज, गोलंदाजांच्या चुका स्वत: पाहायचे व त्या सुधारायच्या कशा ते स्वत: दाखवायचे. वाडेकरांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली त्या वेळीही संघ अपयशी ठरत होता. आजच्यासारखा डझनभर तज्ज्ञांचा सपोर्ट स्टाफ वाडेकरांच्या काळात नव्हता. प्रशिक्षक-व्यवस्थापक आणि सर्वेसर्वा तेच होते. हॉटेल व्यवस्थेपासून खेळाडूंच्या प्रशिक्षण कार्यक्रमापर्यंत त्यांनाच लक्ष ठेवावे लागायचे.
सचिन, कांबळीसारख्या खेळाडूंच्या बाबतीत पालकांचीही भूमिका बजावायला लागायची. घरापासून दूर आल्यामुळे, प्रियजनांपासून लांब आल्यामुळे कोवळी मुले कधी कधी नैराश्यात असायची. त्यांना हळुवारपणे हाताळण्याचे काम त्यांनी केले. मला आठवतंय - त्यांनी मुंबईच्या खेळाडूंना तर वडिलकीचेही सल्ले दिले होते. श्रीलंका दौऱ्यात विनोद कांबळी मैदानावर यशस्वी ठरत होता. शतकांवर शतके काढत होता, परंतु पत्नीच्या विरहाने व्याकूळ होऊन बसायचा. अशा वेळी वाडेकरच त्याला धीर द्यायचे. अपप्रवृत्तींच्या विळख्यात खेळाडू सापडू नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून असायचे.
हे सारे काम क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी पेलवत असताना करावे लागायचे. त्यामुळेच त्या काळातील सर्व भारतीय क्रिकेटपटू आणि अजित वाडेकरांचे एक वेगळेच नाते तयार झाले होते. प्रशिक्षकपदाची त्यांची कारकीर्द म्हणूनच यशस्वी ठरली होती. त्यांनी अपंगांच्या क्रिकेट संघटनेचे नेतृत्व हाती घेतले.
‘लातूर’ला भूकंप झाल्यानंतर त्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन सर्व भारतीय क्रिकेटपटूंना एकत्र आणून अवघ्या पाच दिवसांत एका क्रिकेट सामन्याचे आयोजन त्यावेळचे क्रीडामंत्री अरुण दिवेकर यांच्या मदतीने केले होते. सामाजिक बांधिलकी जपणारा हा क्रिकेटपटू होता. बॅट म्यान केल्यानंतर समालोचनाच्या पाठी न जाता त्यांनी समाजासाठी भरभरून दिले. अखेरपर्यंत देत राहिले. अगदी काल-परवापर्यंत प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी काही संस्थांना मदतीचे आश्वासन दिले होते. खायचे, खाऊ घालायचे त्यासाठीचा बाजारहाटही ते स्वत:च करायचे. सचिन-विनोदसह अनेक क्रिकेटपटूंना खास मासे खाण्यासाठी घरी निमंत्रित करायचे. सर्वांसाठी अखेरपर्यंत सारे काही करणारा असा क्रिकेटपटू सापडणे दुर्मिळ आहे.
vinayakdalvi41@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.