Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Vinayak Mete helping BJP in state but in district they helping NCP

राज्यात आ. विनायक मेेटेंकडून महायुतीचा नारा, मात्र बीड जिल्ह्यात घड्याळाचा गजर

दिनेश लिंबेकर | Update - Apr 12, 2019, 10:31 AM IST

दुहेरी भूमिकेमुळे राज्यमंत्रिपदात अडथळे येणार

 • Vinayak Mete helping BJP in state but in district they helping NCP

  बीड - मागील विधानसभेच्या वेळी भाजपने केलेले पाडापाडीचे राजकारण मंत्रिपदाची तीन वेळा संधी येऊनही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेला विरोध, मुख्यमंत्र्यांच्या इच्छेमुळे बीड जिल्हा परिषदेच्या सत्तांतरात शिवसंग्रामने भाजपला मदत करूनही साडेचार वर्षांत केवळ पदरी दोन वेळा निधी आला. चारा छावण्या मंजूर करताना केलेले राजकारण त्याचबरोबर कार्यकर्त्यांची फोडाफोडी करत विरोधकांना मदत याच कारणामुळे बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामने बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या पुत्राला मदत करा, अशी भूमिका घेऊन घड्याळाचा गजर केला. राज्यात मात्र आमदार विनायक मेटे यांनी शिवसंग्राम महायुतीच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे . आमदार मेटे यांच्या दुहेरी भूमिकेमुळे बीड लोकसभा निवडणूक निर्णायक वळणावर पोहोचली आहे.


  बीड जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व आमदार विनायक मेटे यांच्यातील हाडवैर नवे नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मेटे व पंकजा यांच्यात फारसे पटेनासे झाले. मंत्री पंकजा मुंडे या बीड मतदार संघात मेटे यांना डावलून विकास कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना व्यासपीठावर संधी देऊ लागल्याने हा विषय मेटेंना खटकू लागला. त्यातच तीन वेळा मंत्रिपदाची संधी येऊनही पंकजा मुंडे यांनी केलेल्या विरोधामुळे मेटे यांना राज्यमंत्रिपद मिळू शकले नाही. एकीकडे राज्यातील सत्तेत महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्रामचा बीड जिल्हा परिषदेतही भाजपला पाठिंबा असतानाही भाजपकडून शिवसंग्रामला निधी वाटपात दूर ठेवले जात असल्याने याच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी आमदार मेटेंचे विश्वासू जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना बाजूला करत त्यांना विविध विकास कामांसाठी निधी दिला. त्यानंतर मेटे यांनी बीड जिल्हा परिषदेत शिवसंग्रामचा पाठिंबा काढून घेतला. हा संघर्ष वाढतच गेला. लोकसभेच्या तोंडावर आमदार विनायक मेटे हे मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत असताना इकडे बीड जिल्ह्यात त्यांचेच दोन सदस्य फोडून भाजपत आणण्यात आले. त्यामुळे आमदार मेटे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बीड वगळता राज्यात सर्वच ठिकाणी भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी त्यावर शिक्कामोर्तब करून शेतकरी पुत्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मदत करण्याचा निर्णय मेटे यांनी जाहीर केला.

  दुहेरी भूमिकेमुळे राज्यमंत्रिपदात अडथळे येणार

  बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मदत तर राज्यात महायुतीच्या पाठीशी राहण्याची दुहेरी भूमिका आमदार मेटे यांनी घेतली आहे. मेटे यांच्या भूमिकेमुळे बीड जिल्ह्यातील बराचसा मराठा समाज राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशीही राहील. परंतु या निर्णयामुळे महायुतीत आमदार मेटे यांच्या अडचणी वाढणार असून राज्यमंत्रिपद मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. त्याच बरोबर आगामी बीड विधानसभा मतदारसंघात त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणे जड जाणार आहे.

  छावण्यांतील राजकारण लागले जिव्हारी
  बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू असून शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी गुरांच्या छावण्या सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले होते. परंतु छावण्या मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांना असल्याने मंत्री पंकजा मुंडे यांनी दीड महिने मेटे यांच्या कार्यकर्त्यांचे प्रस्ताव मंजूरच केलेच नाहीत. मुख्यमंत्र्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र काढून चार वेळा फोनही केले होते. परंतु छावण्या मंजूर होत नव्हत्या. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी चारा छावण्यांत केलेले राजकारण आमदार मेटे यांच्या जिव्हारी लागले.

Trending