आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेटे यांनी जाता जाता केली फडणवीसांची गोची, समुद्रातील शिवस्मारक वर्षातून तीन महिने बंद राहण्याची बाब केली उघड

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • फडणवीस यांनी मुंडे यांची बाजू घेतल्याने मेटे आणि फडणवीस यांच्यातील सख्य संपुष्टात आले
  • मेटे यांची ही कृती फडणवीस यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यात बोलले जाते

मुंबई - शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीवरून पायउतार होताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोची केली आहे. शिवस्मारकाला पावसाळ्यात जाण्यासाठी गिरगाव ते स्मारक असा बोगदा बांधल्याशिवाय गत्यंतर नाही, अन्यथा वर्षातले तीन महिने स्मारक बंद ठेवावे लागणार आहे, ही बाब मेटे यांनी एक बैठक घेऊन उघड केली आहे. मेटे यांची ही कृती फडणवीस यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यात बोलले जाते.मेटे यांची तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१५ मध्ये स्मारकाच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, समन्वय समितीला विशेष अधिकार नसल्याने मेटे नाराज होते. त्यात लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात बीड जिल्ह्यात वाद उद्भवला. त्यात पक्षाध्यक्ष या नात्याने फडणवीस यांनी मुंडे यांची बाजू घेतली.  तेव्हापासून मेटे आणि फडणवीस यांच्यातील सख्य संपुष्टात आले. त्यामुळे शिवस्मारक समितीमध्ये मेटे आणि फडणवीस अशी अधिकाऱ्यांत दुफळी पडली होती. स्मारकाच्या कामात अनियमितता असून त्याची चौकशी करण्याची मागणी मध्यंतरी मेटे यांनी फडणवीस यांच्याकडे  केली होती.  त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. पण, मेटे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. उलट मेटे यांनी २७ जानेवारी २०२० रोजी स्मारक समितीची बैठक घेतली. आणि पावसाळ्यातील तीन महिने स्मारक बंद ठेवावे लागेल. त्यामुळे गिरगाव चौपाटी ते स्मारक असा ४ किमी समुद्राखालून बोगदा केला पाहिजे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अभ्यास करावा, असे आदेश दिले.  मेटे यांच्या चालीने फडणवीस खोटे पडले. स्मारकाची जागा चुकीची आहे, ही बाब समोर आली. तसेच चार किमी समुद्राखालून बोगदा खणण्यासाठी पुन्हा एक हजार कोटीचा खर्च वाढणार आहे, या सर्व बाबी आजपर्यंत दडवून ठेवल्या होत्या. त्या मेटे यांनी समिती अध्यक्षपदावरून पायउतार होता होता पुढे आणल्या. मेटे यांनी फडणवीस यांच्या कारभाराचे वाभाडे काढल्याचे बोलले जात आहे.तब्बल २८ व्या बैठकीत आली उपरती
 
शिवस्मारकाचा सध्याचा खर्च ३६०० कोटी असून स्मारकाची एकूण उंची २१२ मीटर असणार आहे.   विनायक मेटे यांनी समन्वय समितीचे अध्यक्ष या नात्याने २८ बैठका घेतल्या. शेवटच्या बैठकीत स्मारक पावसाळ्यात बंद ठेवावे लागेल, या बाबी उघड केल्या.  आपली मुंबई या स्वयंसेवी संस्थेने स्मारकाची जागा बदलावी, अशी मागणी केली होती. मात्र, फडणवीस सरकार जागा योग्य असल्याचे सांगत राहिले.  दैनंदिन १० हजार पर्यंटक स्मारकापर्यंत जाण्यासाठी समुद्राखालून  बोगदा  असला पाहिजे, अशी उपरती मेटे यांना २८ व्या  बैठकीत कशी आली, असा सवाल केला जात आहे.