आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाको राखे सांइया...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवन जगत असताना व्यक्तीच्या आयुष्यात अनेक वेळा मरता मरता वाचलो, मरण अगदी जवळून पाहिले, असे म्हणण्याचा प्रसंग कधी ना कधी येतोच. पट्टीचा पोहणारा अनेकदा पाण्यात बुडून मरतो. सर्पमित्राचा मृत्यू सर्पदंशाने होतो, असेही घडते. असाच प्रसंग माझ्या आयुष्यात वयाच्या 50 व्या वर्षी आला. तसा मी पट्टीचा नसलो तरी चांगला पोहणारा आहेच आणि त्याबद्दल माझा आत्मविश्वास कायम असतो. गणेश विसर्जनाच्या वेळी दरवर्षी हातात गणपतीची मूर्ती घेऊन विहिरीत उडी मारून विसर्जन करीत असे. त्यानंतर यथेच्छ पोहणे असा कार्यक्रम असायचा. नेहमीप्रमाणे हातात मूर्ती घेऊन विहिरीत उडी मारली, मूर्ती खाली सोडली पण एव्हाना हातापायातील शक्ती निघून गेली होती. हातापायाची हालचाल मंदावली. आता आपण बुडणार की काय, असे वाटू लागले. काय करावे काही सुचेना. मरण डोळ्यासमोर दिसू लागले.
विहिरीच्या काठावर उभे राहून अनेक मित्र हा प्रसंग पाहत होते. त्यांना कदाचित माझ्या बिकट परिस्थितीची कल्पना नसावी. मनाची घालमेल होत असताना लक्षात आले की मला पाण्यावर झोपता येते. हात पाय न हलवता श्वासावर नियंत्रण ठेवून बराच वेळ पाण्यावर तरंगू शकतो. त्यामुळे अचानक धीर आला, मन स्थिरावले, डोळे मिटले. काही वेळानंतर काठावरील बघ्यांना काही तरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यांनी दोर विहिरीत सोडला. दोराला घट्ट धरून अर्धा तास पाण्यातच स्थिरावलो. हातापायातील गोळे कमी झाले. तरीही विहिरीतच थांबलो. ब-याच वेळाने दोराच्या साहाय्याने बाहेर आलो. बाका प्रसंग जीवनात आला होता. आजही तो प्रसंग आठवला की मन थरथरते. त्या क्षणी जागृत मनाने योग्य दिशा दाखविली नसती तर आज 70 वे वर्ष कदाचित अनुभवू शकलो नसतो. अशा प्रसंगातून ईश्वरी लीलेचा मथितार्थ कळतो. जीवनाचा दोर ईश्वराच्याच हाती आहे हेही लक्षात येते. असे प्रसंग जीवन जगण्याची कला देखील शिकवून जातात.