आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला परतवून लावत विंचूरदळवीच्या ‘मल्ला’ने बिबट्याला केले चितपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - पहाटे ४ च्या सुमारास पहिलवान रामदास (३९) फ्लाॅवरला पाणी भरण्यासाठी मळ्यात निघाले तेव्हा सुटीवर घरी अालेला सैन्यदलातील भाऊ विजय (३४) हाही मदतीला साेबत अाला. किर्रर्र अंधारात विजेरीच्या प्रकाशात त्यांचे काम सुरू झाले. १०० फुटांवर असलेल्या वाफ्याच्या टाेकाला पाणी पाेहाेचले की नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या विजयने वाफा भरल्याचे सांगितले तसे रामदासने फावड्याने बारे देऊन पाणी वळवले अाणि जरा वेळ बसावे म्हणून ताे खाली टेकला ताेच.. पाठीमागून गुरगुर अावाज अाणि दंडावर जाेरकस  फटका बसला.

 

ताे  मागे अाेढला जाऊ लागला. अचानक झालेल्या हल्ल्याने गाेंधळलेल्या रामदासला बिबट्याने हल्ला केल्याची जाणीव झाली. माेठ्याने अाेरडत त्याने प्रतिकारासाठी सगळी ताकद एकवटली. वळून पाहिले तर कमरेएवढा बिबट्या यमदूतासारखा अक्राळविक्राळ रूपात उभा. काही कळायच्या आत त्याने  डाव्या हाताचा दंड जबड्यात पकडला. प्रतिकार करूनही त्याचे टाेकदार सुळे दंडाच्या मांसात घट्ट रुतल्याने अाता झुंजलाे तरच ठीक, अन्यथा आपली खैर नसल्याची जाणीव रामदासला झाली. अापण पहिलवान असल्याची अाठवण त्याच्या अंतर्मनाने करून दिली अाणि बजरंगबलीचे स्मरण करत रामदासने प्रतिहल्ला चढवला.

 

पाठीमागे वळत उजव्या हाताने जाेरकसपणे बिबट्याच्या पायावर अाघात करून त्याने एकलांघी डावासारखा ताे फिरवला..  त्याच वेळी रामदास संकटात असल्याची जाणीव झालेल्या विजयने विजेरीचा प्रकाश टाकत अारडाअाेरड करत धाव घेतली.. त्यामुळे बिचकलेला बिबट्या या झटापटीत खाली अाेणवा झाला.. भाऊ मदतीला अाल्याने जाेशात अालेल्या रामदासने पुन्हा चाल करण्याचा पवित्रा घेत दाेन्ही हातांची शक्ती एकवटून शेतातली माती बिबट्याच्या ताेंडावरच उधळली. या प्रतिहल्ल्याने गांगरलेल्या बिबट्याने माघार घेतली अाणि धूम ठाेकत ताे ओहोळाच्या दिशेने ढांगा टाकत गडप झाला.  


अन् दोघेही भाऊ एकमेकांना बिलगले: विजयने धावत येऊन रामदासला सावरले तेव्हा  कुस्तीतले डाव बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी कामी आले आणि जीवन-मरणाच्या लढाईतून चितपट होता होता वाचलो, असे म्हणत दाेन्ही भाऊ एकमेकांना बिलगले. सैन्यात असल्याने सीमेवर जीवन-मरणाची झुंज नित्य पाहणाऱ्या विजयला अभावितपणे बिबट्याशी रामदासची झालेली जीवघेणी कुस्ती पाहण्याचे साक्षीदार व्हावे लागले. त्याने तातडीने  भावाला खांद्यावर अाधार देऊन दवाखान्याच्या दिशेने हलवले.    

 

अंगावरील जॅकेटने वाचवले  
कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धी मल्लांना चितपट करणारे हनुमानभक्त असलेले सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवीचे  पहिलवान रामदास किसन दळवी (३९) जिवावर बेतलेल्या संकटाचे वर्णन करत असताना एेकणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभे राहत होते. पहाटेच्या गारव्यात  अंगावर लपेटलेले कांबळे अाणि जाडजूड जर्कीन घातले असल्याने दात खोलवर घुसले नाहीत. अन्यथा  बिबट्याने हाताचा लचकाच ताेडला असता. पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने देवळाली येथील कँटोन्मेंट  रुग्णालयात प्राथमिक उपचार करून  त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पहिलवान रामदास विंचूरदळवीतील घरी परतले असून या जगावेगळ्या कुस्तीचे वर्णन एेकत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी  लाेकांची रिघ लागली अाहे.    

 

बिबट्याचा हल्ला परतवून लावत मल्ल रामदास दळवी यांनी जबड्यातून डावा हात साेडवला. अंगावर कांबळे अाणि जाड जर्किन घातले असल्याने थाेड्याशा जखमांवरच त्यांचे निभावले.

 

 

बातम्या आणखी आहेत...