आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब रसायन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या शाळेतल्या विद्यार्थिनींचा लेखकांशी संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका शिक्षकाने सांगितलेली, नुकत्याच दिवंगत झालेल्या कविता महाजन यांची एक हृद्य आठवण.


"हॅलो, हा कविता महाजन यांचा नंबर आहे का?’
"बोलतेय. आपण”
"नमस्कार, मी विनोद गादेकर, उस्मानाबाद जिल्ह्यातील एक शिक्षक आहे.’
"बोला. काय काम आहे?’
"माझ्या विद्यार्थ्यांना आपल्याशी थोडं बोलायचं होतं. थोडा वेळ द्याल का?’
"अं. बरं बोला! मी दवाखान्यात निघालेली आहे. दोन-तीन मिनिटांत तुमचं काम आटोपतं घ्या.’ 
"मॅडम, मी तुम्हाला दोन-तीन मिनिटांनंतर फोन करतो. मुलं बाहेर मैदानात बसवून स्पीकरची व्यवस्था करतो.'
"बरं, ठीक आहे.’


...दोन वर्षांपूर्वी तीन जानेवारी राेजी, बालिका दिनानिमित्त एका यशस्वी महिलेचे मुलींना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांच्याशी मी संपर्क केला होता. त्यांचे ‘ग्राफिटी वॉल' हे पुस्तक वाचून मी अगदी भारावून गेलो होतो. त्या पुस्तकातील ‘झिगोलो' नावाचा वास्तवावर आधारित लेख वाचला आणि रात्रभर झोपू शकलो नाही. किती भयाण वास्तव लेखिकेने मांडले होते आणि त्यासाठी किती समस्यांचा सामना केला होता. स्त्री-पुरुषांच्या नात्यातील एक दुखरा बंध उकलण्यासाठी किंबहुना त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी त्या समस्येचा शोध घेण्यासाठी त्यांनी अनेक आव्हानं स्वीकारली होती. असं एक खंबीर मन असणारं ‘अजब रसायन' नेमकं कसं आहे हे जाणून घेण्यासाठी खूप शोध घेऊन मी त्यांचा मोबाइल नंबर मिळवला होता आणि फोन केला होता.
त्यांच्याशी फोनवर झालेल्या संवादानुसार विद्यार्थी बाहेर अंगणात बसवले. स्पीकर आणि मोबाइल यांची अशी व्यवस्था केली की, मुलांनी विचारलेला प्रश्न कविता महाजन यांना ऐकू जाईल आणि त्यांनी दिलेलं उत्तर सर्व विद्यार्थ्यांना ऐकता येईल. लागलीच त्यांना परत फोन केला.


"हॅलो, कविता मावशी का? मी श्रावणी बोलते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठेनगर, तालुका - वाशी येथील तिसरीची विद्यार्थिनी!’
"बोल बेटा, कशी आहेस?’
श्रावणीच्या ‘मावशी' या शब्दाने त्यांच्या ओठावर अलगद हसू फुटलं आणि हलक्याफुलक्या वाक्याने एका कौटुंबिक संवादास सुरुवात झाली. संवादासाठी दिलेला फक्त दोनतीन मिनिटांचा वेळ कविताजी विसरून गेल्या आणि या अनौपचारिक गप्पा तब्बल अर्धा तास रंगल्या. माझी मध्यस्थाची भूमिका संपली. मी एक शिक्षक आहे म्हटल्यावर त्यांच्या मनात माझ्याविषयी ‘सॉफ्ट कॉर्नर' निर्माण झाला. त्यांची आई नांदेडमध्ये एक शिक्षिका होती, त्यामुळे शिक्षकांविषयी त्यांच्या मनात आदर असल्याचेे त्यांंनी स्वतःहून सांगितले.


प्रश्न विचारण्यासाठी माइकजवळ १०-१२ मुलींनी एक रांगच केली. मुलींनी त्यांना दिलखुलास प्रश्न विचारले. ‘तुम्ही शाळेत असताना तुम्हाला कशाची भीती वाटत होती? तुमचा आवडता पदार्थ कोणता? तुम्ही आता दररोज किती वेळ लेखन करता? तुम्हाला कोणकोणती पुस्तके आवडतात? तुम्हाला खर्चायला पैसे कोण देतं? तुमच्या शाळेतल्या बाई तुमच्यावर रागावायच्या का? तुमच्या शाळेची सहल वनराई बंधारा बांधायला गेली होती का? तुम्ही आम्हाला भेटायला कधी याल?' बालविश्वाला पडलेले असे अनेक प्रश्न मुलांनी लेखिकेला विचारले, त्याचबरोबर त्यांनीदेखील मुलांना प्रतिप्रश्न विचारून त्यांचे भावविश्व जाणून घेतले. एका मुलीने सांगितले की, मला ‘भुता'ची भीती वाटते. त्या वेळेस त्यांनी सविस्तर समजावून सांगितलं की, ‘भूत वगैरे साफ खोटे आहे. जगात भूत कुठेही नाही. घाबरायचं नाही. खंबीरपणे बोलायचं. आवडणारी छानछान पुस्तके वाचायची. छोट्या छोट्या गोष्टी वाचायच्या. मनात येईल ते कागदावर लिहून काढायचं, गुरुजींना दाखवायचं.' अशा अनेक गोष्टींवर कविताजींनी मुलींना मार्गदर्शन केलं. मुलींना त्यांना येत असलेली एक कविताही संपूर्ण म्हणून दाखवायला सांगितली. त्या वेळेस मुलींनीही विचारलं की, तुम्हाला एखादी कविता येते का तेव्हा त्यांनी त्या शिकत असतानाची चौथीची एक कविता तालासुरात म्हणून दाखवली. तसेच महावीर जोंधळे यांचीदेखील एक बालकविता म्हणून दाखवली. ‘खूप खूप शिका आणि मोठे व्हा. कोणालाही घाबरू नका,' हा बाळबोध संदेशही त्यांनी दिला. ‘मला तुमच्या शाळेचा पत्ता द्या मी तुम्हाला माझ्याकडून ‘कुहू' व माझ्याकडील इतर गोष्टींची पुस्तके पाठवते,' असेदेखील त्यांनी आश्वासन दिलं. परंतु त्यांनी त्यांचा दिलेला वसईच्या घराचा पत्ता गहाळ झाल्यामुळे मी त्यांना उलट टपालाने शाळेचा पत्ता पाठवू शकलो नाही; त्यामुळे त्यांची भेट घेणे राहून गेले. ‘पुढे मागे कधी तरी बार्शी किंवा उस्मानाबादला आल्यावर तुमच्या शाळेला नक्की भेट देईन,' हे वचन अधुरेच राहिले.

- विनोद गादेकर, कुसळंब, बार्शी
gvinod80@gmail.com

बातम्या आणखी आहेत...