आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकर प्रकाशन समिती वादावर तावडेंचे उत्तर, म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आंबेडकरप्रेमी आहे, हे आता तरी समजून घ्यावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आस्था, आदर आणि प्रेम बाळगणारे आंबेडकरप्रेमी आहेत, याचा शोध जर या निमित्ताने कोणाला लागला असेल तर त्याचे स्वागतच आहे,' अशी खोचक प्रतिक्रिया राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ चरित्र साधने प्रकाशन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष विनोद तावडे यांनी दिली. राज्य शासनाने या समितीवर नव्याने केलेल्या नियुक्त्यांना विराेध हाेत करणाऱ्यांना तावडेंनी ही उत्तर दिले. 

 

'शासकीय समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हा नियमित कामकाजाचा भाग असतो. यामध्ये कोणी राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही. कोणती व्यक्ती कोणत्या विचारधारेशी बांधील वगैरे कोणताही विचार करण्याचे कारण नाही. डॉ. आंबेडकरांचे महान कार्य जगात पोहोचवण्याचा दृष्टिकोन ठेवून ताज्या दमाच्या, सक्षम व्यक्तींकडे ही जबाबदारी सोपवण्याचा विचार शासनाने केला. बाकी कोणताही हेतू नाही. 'संघाची माणसे नेमली' हा दावा निरर्थक अाहे,' असे तावडेंनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. 


डॉ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त उपकुलसचिव डॉ. सुधाकर बोकेफोडे यांना समितीचे सचिव करण्यात आले आहे. त्यांच्यापूर्वी ही जबाबदारी दिवंगत प्रा. अविनाश डोळस यांच्याकडे होती. 'कोणत्या निकषांवर आपली निवड झाली?' या प्रश्नावर डॉ. बोकेफोडे यांनी सांगितले, "गेली ३२ वर्षे मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. व्यवस्थापनात माझा हातखंडा आहे. आंबेडकरी चळवळीशी मी निगडित आहे. याच विषयावर माझी दुसरी पीएचडीदेखील चालू आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी जोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल अधिक न बोलणेच इष्ट ठरेल. डॉ. आंबेडकरांचे सर्व उपलब्ध साहित्य जगभरच्या नव्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. इंटरनेटच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे विचार आणखी विस्तृतपणे जगापुढे कसे ठेवता येतील यावर आमचा भर असेल. डॉ. आंबेडकरांचे अजूनही काही लेखन अप्रकाशित राहिले असेल तर त्याचा शोध घेण्याचाही प्रयत्न समिती करेल,' असे ते म्हणाले. 

 

हिणवऱ्यांबद्दल बाेलणार नाही : मिलिंद कांबळे 
नूतन समिती सदस्य मिलिंद कांबळे म्हणाले की, आम्हाला 'नवआंबेडकरवादी' किंवा 'जातीयवादी' म्हणून हिणवणाऱ्यांबद्दल मी काहीच बोलणार नाही. परंतु, डॉ. आंबेडकर यांचे सर्व उपलब्ध जगभर पोहोचवणारे खास संकेतस्थळ मी सर्वात पहिल्यांदा अठरा वर्षांपूर्वीच सुरू केले. 

डॉ. बाबासाहेबांचा अर्थक्रांतीचा, उद्यमशीलतेचा विचार देशभरच्या दलितांमध्ये रुजवून त्यांच्यात उद्योजक घडवण्यासाठी 'दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'ची मुहूर्तमेढ मी रोवली. केवळ 'बोलका विचारवंत' न राहता डॉ. आंबेडकरांचे विचार जास्तीत जास्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याने कदाचित माझी निवड या समितीवर झाली असे मला वाटते.' असेही कांबळे यांनी या वेळी बोलताना सांगितले. 

 

नेमका वाद आहे तरी काय ? 
डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचा प्रचार करणारी समिती संघ स्वयंसेवकांच्या ताब्यात गेली आहे, डॉ. आंबेडकरांच्या साहित्याशी फारसा संबंध नसलेली मंडळी या समितीवर आल्याचे सांगून वाद निर्माण केला जात आहे. डॉ. भीमराव भोसले, प्रा. रमेश पांडव, डॉ. सुनील भंडगे, प्रा. वैजनाथ सुरनर, डॉ. राजन गवस, डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. श्यामराव अत्रे, मिलिंद कांबळे आणि इतर नवे सदस्य संघाशी संबंधित असल्याचा आरोप हाेत आहे. 

 

समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात : हरी नरके 
साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. आंबेडकर समितीवर यापूर्वी काम केलेले हरी नरके आदींनी नव्या नेमणुकांवर नाराजी व्यक्त केली आहे. 'अपरिचित लोकांची समिती' या शब्दांत डॉ. वाघमारे यांनी टीका केली, तर नरके यांनी 'नव आंबेडकरवाद्यांच्या समितीला हार्दिक शुभेच्छा' अशी बोचरी प्रतिक्रिया साेशल मीडियातून व्यक्त करत ही संपूर्ण समिती रा. स्व. संघाच्या ताब्यात गेल्याचे म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...