आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातुरात मद्यधुंद टोळक्याकडून मुलीचा विनयभंग; ऑटोरिक्षातून बाहेर ओढून केले कृत्य

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - शहरात मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता गजबजलेल्या गंजगोलाईत चार तरुणांनी ऑटोरिक्षातून घराकडे जाणाऱ्या सोळा वर्षे वयाच्या मुलीला रिक्षाबाहेर ओढून तिचा विनयभंग केला. टोळक्याच्या दहशतीमुळे कुणीही त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. त्या मुलीनेच आरडाओरडा करत आपली सुटका केली. योगायोगाने तेथून जाणाऱ्या माजी खासदार सुनील गायकवाड यांनी गोंधळ पाहून गाडी थांबवली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणांचा पाठलाग केला, परंतु ते फरार झाले.लातूर शहरात आता भर रस्त्यावर महिला आणि मुलींचा विनयभंग करण्याच्या घटना वाढल्या आहेत. गंजगोलाई, कापड लाइन, मशीद रोड, औसा रोड, अंबाजोगाई रोड, दयानंद गेट जवळील भाजी बाजार येथे महिलांची छेड काढणे असे प्रकार वाढले आहेत. महाविद्यालये, शाळा सुटण्याच्या वेळेला टारगट मुले सर्रास तेथे जाऊन थांबतात आणि मुलींची छेड काढतात. या कडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा टारगटांचा आत्मविश्वास वाढत चालला आहे. त्यातूनच मंगळवारी रात्री गजबजलेली बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत एकट्याने प्रवास करणाऱ्या सोळा वर्षाच्या मुलीला रिक्षातून खाली ओढून तिचा विनयभंग करण्यात आला. जेथे दररोज पोलिस व्हॅन थांबलेली असते तेथेच ही घटना घडली. मुलीने आरडाओरड करून आपली सुटका करून घेतली. परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा प्रकारांना आळा घातला नाही तर परीस्थिती गंभीर होऊ शकते.

पोलिसांनी घेतली गंभीर दखल :


दरम्यान, माजी खासदार सुनील गायकवाड यांनी या प्रकाराची माहिती फेसबुकवर पोस्ट करून सर्वांना दिली. त्यानंतर या प्रकाराची पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपाधीक्षक सचिन सांगळे यांनी गंभीर दखल घेत पोलिस पथके तपासासाठी पाठवली आहेत. निधीअभावी सीसीटीव्हर कॅमेरे बनले शोभेच्या वस्तू

तीन वर्षांपूर्वी मनपाने गाजावाजा करीत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये अतिउच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी त्या कक्षाचे उद्घाटनही केले होते.  मात्र देखभालीअभावी हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांना गुन्हेगारांना ओळखण्यासाठी त्याची मोठी मदत होते. परंतु निधीअभावी हे कॅमेरे केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत.