आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केरळात हिंसाचार सुरूच, 1 हजारावर अटकेत, श्रीलंकन महिलेचा प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम- केरळमधील सबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षीय महिलांनी प्रवेश करण्यावरून सुरू असलेला वाद आता संसदेत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यभरात हिंसक धुमश्चक्रीच्या ८०१ घटनांत १ हजार ३६९ जणांना अटक झाली. ७१७ जणांना नजरबंद करण्यात आले. दरम्यान ४७ वर्षीय श्रीलंकेच्या एका महिला भाविकाने गुरुवारी रात्री अय्यप्पा मंदिरात प्रवेश केला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तसेच पाेलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. गुरुवारी रात्री उशिरा प्रार्थना करणाऱ्या महिलेचे नाव शशिकला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शशिकला यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे दिसून येते. मात्र, तिला प्रत्यक्ष पूजा करण्याची परवानगी मात्र देण्यात आली नव्हती. या महिलेने पूजा साहित्य घेऊन प्रवेश केल्याचा दावा काही स्थानिक टीव्ही वाहिन्यांनी केला होता. 

 

२ जानेवारी रोजी बिंदू व कनकदुर्गा यांनी पहाटेच यशस्वी पूजा केली होती. त्यामुळे ८०० वर्षांची परंपरा मोडीत निघाली होती. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथे हिंसाचार वाढला. दरम्यान, बुधवारी मंदिर प्रवेशावरून शांततामय मार्गाने आंदोलनास सुरूवात झाली होती. मात्र आता डावे व उजव्या समर्थकांतील संघर्षाचे रूपांतर हिंसक धुमश्चक्रीत झाले आहे. 

 

दुसऱ्या दिवशीही गावठी बाॅम्ब फुटले, अनेक ठिकाणे युद्धभूमीत परिवर्तित 
राज्यात सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) तसेच भारतीय जनता पार्टी (भाजप) या पक्षांच्या कार्यालयांवर हल्ले झाले. दोन गटांतील धुमश्चक्रीत गावठी बाँबचा वापर करण्यात आला. हिंसाचार वाढल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणे जणू युद्धभूमित परिवर्तित झाली आहेत. तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मलयिन्किझ, प्रवलचंबलम तसेच नेदुमंगड व कन्नूर जिल्ह्यातील थालासेरीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण माकप तसेच भाजप कार्यकर्त्यांनी परस्परांवर बाँबफेक केली. या प्रकरणी २०० जणांना अटक झाली आहे. मोबाईल दुकानांवरही बाँबफेक झाली. 

 

राज्यपालांनी जनतेला केले शांततेचे आवाहन 
केरळचे राज्यपाल तथा निवृत्त न्यायाधीश पी. सदाशिवम यांनी ट्विट करून सांगितले की, सबरीमाला मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशानंतर राज्यात झालेल्या हिंसक घटना तसेच खासगी व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रकरणात मी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे अहवाल मागवला. लोकांनी शांतता राखण्याचे मी आवाहन करतो. 

 

केरळमधील परिस्थिती अत्यंत गंभीर, सरकारने कडक पावले उचलावीत 
काँग्रेस खासदार के.के. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी संसदेत सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या हिंसक घटनांचा मुद्दा शून्यप्रहरी उपस्थित केला. वेणुगोपाल म्हणाले, भाजपने बंद पुकारला हाेता. या दरम्यान हिंसक घटना घडल्या. आता परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे व शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. त्यावर भाजप नेत्या मिनाक्षी लेखी म्हणाल्या, हिंदुत्व समजू न शकणारे लोकच या गोष्टीची चुकीची व्याख्या करू लागले आहेत. असे लोक भगवान अयप्पांचे उपासक नाहीत. ते धर्मविरोधी आहेत. 

 

पलक्कड, मंजेस्वरम शहरांत कलम १४४ लागू 
पलक्कड व मंजेस्वरममधील हिंसाचाराच्या घटनांनंतर दोन्ही शहरात हे आदेश लागू झाले आहेत. आंदोलक समर्थक व विरोधी गटांत गुरूवारी आणि शुक्रवारी हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यात किमान १०० हून अधिक लोक जखमी झाले.