आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट रचून तोडफोड : 61 कोटींचे नुकसान, 49 कंपन्यांमध्ये इन कॅमेरा पंचनामे, दोन दिवसांत 1500 जणांवर गुन्हे, 36 अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज, औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी  पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान गुरुवारी वाळूज एमआयडीसीतील ७० कंपन्यांची तोडफोड करण्यात आली.  शनिवारपर्यंत या प्रकरणात ४९ कंपन्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात अाले असून प्रथमदर्शनी ६१ कोटींचे नुकसान झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, कंपन्यांनी अद्याप नुकसानीचा आकडा जाहीर केला नाही. महसूल विभाग आणि पोलिसांकडून इन कॅमेरा पंचनामे सुरू असून सहा पथके नेमण्यात आली आहेत. दोन दिवसांत दीड हजार जणांवर सात गुन्हे दाखल होऊन पोलिसांनी ३६ जणांना अटक केली आहे.

   
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोडफोड करणाऱ्या अनेक तरुणांची ओळख पटली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे शनिवारीदेखील वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले होते. तसेच परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून नव्याने सूत्रे हाती घेतलेले निकेश खाटमोटे यांनी या भागाची पाहणी केली.  तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक राहुल रोडे, चौधरी यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. तांत्रिक तपासासाठी सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हेमंत तोडकर हे सध्या वाळूज पोलिस ठाण्यातच आहेत.

 

सूत्रधार नेमके कोण?

हेल्मेट घालून तरुणांना चिथावणी देणारे काही लोक सीसीटीव्हीत दिसत आहेत. याशिवाय कंपनीच्या सुरक्षा रक्षकांचा माइक हातात घेऊन सूचना देण्याचा प्रकारही चित्रित झाला आहे. यापाठीमागे एक संघटना असल्याचा दावा उद्योजकांनी केला आहे. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता. तरुणांना घटनास्थळी दारू वाटल्याचेसुद्धा तपासात समोर आले अाहे. काही लहान मुले रुमालावर कुठला तरी पदार्थ टाकून नशा करत असल्याचेदेखील सीसीटीव्हीत दिसत आहे.

 

शहरात येऊन उद्योजकांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट   
उद्योजकांच्या एका  शिष्टमंडळाने शनिवारी शहरात येऊन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट  घेतली. नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन करावे. त्यासाठी चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही शिष्टमंडळाच्या वतीने मानसिंह पवार यांनी दिली. या वेळी सुनील किर्दक, जगन्नाथ काळे, अशोक बेडसे पाटील, बालाजी शिंदे, भारत मोतिंगे, अमित राजळे, राहुल घोगरे, कृष्णा गायकवाड, विजयराज शिंदे, बाबूराव खोडे, सुनील भोसले, विंग कमांडर जाधव, नारायण पवार आदी उपस्थित होते. वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही.  उद्योजकांना पोलिस सहकार्य करतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

 

जिल्हाधिकाऱ्यांसह, आमदार, खासदारांनी केली पाहणी   
जिल्हाधिकारी उदय चौधरी, खासदार चंद्रकांत खैरे,  आमदार प्रशांत बंंब, सतीश चव्हाण, संजय शिरसाट यांनी तोडफोड झालेल्या कंपन्यांना भेटी दिल्या. दिवसभरात ही सगळी मंडळी टप्प्याटप्प्याने एमआयडीसीत येत होती. आकार टूल्स, सीमेन्स, एंड्युरन्स, व्हेरॉक, मॅन डिझेल, स्टरलाइट यासह इतर दहा ते पंधरा कंपन्यांना भेट दिली.

 

कलम १२० ब वाढवले  
वाळूज येथील कंपन्यांची तोडफोड केल्याप्रकरणी शुक्रवारपर्यंत कलम ३०७, ४५२, ३९५ व दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. शनिवारी यात १२० ब हे कलम वाढवण्यात आले असून ३६ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.   


इन कॅमेरा पंचनामे  
शनिवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी तसेच वैजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्यासह औरंगाबाद आणि गंगापूरच्या तहसीलदारांनी नुकसान झालेल्या कंपन्यांची पाहणी केली. विशेष म्हणजे महसूलचे दोन, पोलिसांचा एक अशा तीन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत.    


दोन दिवसांत अहवाल
तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले की, पोलिस आणि महसूलच्या माध्यमातून संयुक्त पंचनामे करण्यात येत आहेत. तहसीलदारांसह गंगापूरचे सहा तलाठी, दोन मंडळ अधिकारी तसेच औरंगाबादच्या तीन तलाठी आणि एका मंडळ अधिकाऱ्यासह ही पाहणी करण्यात आली. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...