आयपीएल : विराट काेहलीचे तीन वर्षे आणि ३५ डावांनंतर झंझावाती शतक

वृत्तसंस्था

Apr 20,2019 09:29:00 AM IST

काेलकाता - विराट काेहलीच्या (१००) झंझावाती शतकाच्या बळावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ईडन गार्डन मैदानावर दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्स संघाला धूळ चारली. बंगळुरूने १० धावांनी लीगमधील आपला नववा सामना जिंकला. यासह बंगळुरूला दुसऱ्या विजयाची नाेंद करता अाली.काेहलीचे हे ३ वर्ष आणि ३५ डावानंतरचे शतक ठरले.


पाहुण्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या माेबदल्यात यजमान काेलकाता टीमसमाेर २१४ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात काेलकाता संघाला घरच्या मैदानावर २०३ धावांपर्यंत मजल मारता आली. आंद्रे रसेल (६५) आणि नितीश राणा (नाबाद ८५) यांनी केलेली झंझावाती अर्धशतकी भागीदारी व्यर्थ ठरली. त्यांना आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. यादरम्यान त्यांनी वैयक्तिक अर्धशतकेही साजरी केली. नितीशचे हे सातवे आयपीएल अर्धशतक ठरले.


पाचवे शतक ठाेकणारा पहिला भारतीय फलंदाज : राॅयल चॅलेंजर्स बंगळरूच्या कर्णधार विराट काेहलीने स्फाेटक खेळी करताना झंझावाती शतक ठाेकले. त्याचे हे अायपीएलच्या करिअरमधील पाचवे शतक ठरले. त्याने ५८ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकार अाणि ४ षटकारांच्या अाधारे १०० धावांची खेळी केली. यासह ताे आयपीएलमध्ये पाच शतके ठाेकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.


बंगळुरूचा दुसरा विजय : काेहलीच्या झंझावाती शतकाच्या बळावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदाच्या सत्रामध्ये दुसऱ्या विजयाची नाेंद केली. तळात आठव्या स्थानावर असलेल्या बंगळुरूचे आता नऊ सामन्यांत दाेन विजय झाले आहेत.


काेलकाता टीमची घसरण : दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता संघाला सत्रात समाधानकारक खेळी करता आली नाही. त्यामुळे सुरुवात चांगली करणाऱ्या काेलकाता संघाच्या कामगिरीचा दर्जा घसरला. त्यामुळे टीमला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.

X
COMMENT