आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरेंद्र तावडेच दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार; सीबीआयचा न्यायालयात दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार हा वीरेंद्र तावडेच आहे. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरेची पोलिस कोठडी मागताना रविवारी सीबीआयने विशेष न्यायालयात हा दावा केला आहे. मात्र, या संपूर्ण कटात कोणावर कोणती जबाबदारी दिली आहे, कोणी काय केले, संपूर्ण कटात कोण कोण सहभागी आहेत याची संपूर्ण माहिती कुण्या एका व्यक्तीला नसल्याची बाबही आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आली आहे. कटात सहभागी असलेल्या प्रत्येकाला त्याच्याशी संबंधित मोजकीच माहिती देण्याच्या या ‘नीड टू नो’ पद्धतीमुळे तावडे हाच या कटाचा सूत्रधार असल्याचे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर असणार आहे.   


दुचाकीवरून येऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे दोघे म्हणजे संशयित सचिन अंदुरे आणि शरद कळसकर असल्याचा दावा तपास यंत्रणा करत आहेत. खुद्द अंदुरे आणि कळसकरनेच एटीएस आणि सीबीआयकडे चौकशीदरम्यान दाभोलकरांच्या खुनाची कबुली दिल्याचे समजते. आपल्याला एक व्यक्ती पडद्याआड राहून हे काम कसे करायचे, कुठे जायचे, हत्यार कसे पुरवले जाईल, अशा सर्व सूचना देत असल्याचे अंदुरेने चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते. ही व्यक्ती सध्या अटकेत असलेला संशयित वीरेंद्र तावडेच असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्या अनुषंगानेच रविवारी विशेष न्यायालयात अंदुरेची पोलिस कोठडी मागताना सीबीआयच्या वतीने तावडे हाच या कटाचा सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे.   


पिस्तूल एकच की साचा एक
अंदुरे आणि कळसकर यांनी दिलेल्या कबुलीमुळे दाभोलकर यांच्या हत्येची उकल जवळपास झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच दाभोलकर, काॅ.पानसरे, गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्या एकाच हत्याराने झाल्याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आहे. मात्र नालासोपारात जप्त केलेल्या हत्यारांमध्ये एकाच बनावटीची काही अर्धवट तयार पिस्तुले सापडल्याने पोलिस यंत्रणांनी तपासाची दिशा बदलल्याचे समजते. या सर्व हत्या एकाच हत्याराने झाल्या आहेत की एकाच साच्यातून बनवलेल्या ४ वेगवेगळ्या रिव्हाॅलव्हरने झाल्यात याचा शोध एटीएस आणि सीबीआयने सुरू केला आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून वैभव राऊतच्या नालासोपारा येथील घर आणि दुकानातून मिळालेल्या पिस्तुलांच्या दहा नळ्या, सहा अर्धवट तयार केलेली पिस्तुले, ३ अर्धवट मॅगझिन, ७ अर्धवट पिस्तुलांच्या स्लाइड, १६ रिले स्विच, तसेच स्फोटके आणि बंदूक बनवण्याबाबत सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून मिळालेली पुस्तके हे सर्व साहित्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...