आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील मानाच्या ५ गणपतींचे कृत्रिम हौदात होणार विसर्जन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी देशविदेशातून माेठी गर्दी होत असते. मात्र, मागील काही वर्षांपासून मिरवणूक लांबली जाऊन त्याचा ताण पोलिसावर पडतो. यंदा मात्र मानाच्या ५ गणपती मंडळांनी मिरवणूक वेळेत काढण्याचा आणि २ मंडळांत केवळ १५ मिनिटे अंतर राहील, अशा प्रकारे नियोजन केले आहे. मानाच्या गणपतींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटेंनी दिली आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक उद्देशाने 'दिव्य मराठी'नेसुद्धा भाविकांनी घरच्या घरीच गणेशाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. 


पुण्यातील मंडईतील टिळक पुतळ्यापासून रविवारी सकाळी १०.३० वाजता मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. सुरुवातीला मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची पूजा पालकमंत्री, महापौर, आयुक्तांचा हस्ते होईल. त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात होईल. त्यानंतर अनुक्रमे तांबडा जोगेश्वरी, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरी वाडा गणपती मार्गस्थ होतील. यंदाच्या वर्षीपासून मंडईऐवजी बेलबाग चौकातून गणपती मंडळाची पथके लावण्यात येणार आहेत. 

 

प्रत्येक मंडळाची तीन पथके असणार असून त्यातील ढोल ताशा पथक, बँड, दिंड्या यातील सदस्यांची संख्या सीमित करण्यात आली आहे. ढोलताशा पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारक आणि मदतीसाठी ३० जण असणार आहेत. अलका टॉकीज चौकात मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या मिरवणुकीत दरवर्षीपेक्षा कमी वेळेत मिरवणूक संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासन आणि पोलिस यांनी मिरवणुकीत सहकार्य करावे, पोलिसांनी मिरवणूक सुरू असताना अतिरेकीपणा करू नये, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 


कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास उत्तम प्रतिसाद 
पाचही मानाचे गणपती पंधरा- पंधरा मिनिटांच्या अंतराने डेक्कनच्या लकडी पुलाजवळ कृत्रिम हौदात गणपती विसर्जन करतील. लक्ष्मी रस्त्यावर २ मंडळांतील अंतर कमी करून वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन करण्याच्या योजनेस मागील वर्षीपासून नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...