आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांचा बालेकिल्ला राखण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचे विश्वजित कदम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश जोशी | सांगली
तब्बल ५० वर्षे सांगली जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने बहुमत राखले होते. परंतु १९९४ च्या निवडणुकीपासून काँग्रेसला काही मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पलूस हा काँग्रेसचा एकमेव उरलेला बालेकिल्ला राखण्यासाठी डॉ. विश्वजित कदम प्रयत्नात आहेत. भाजपने जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्याऐवजी शिवसेनेचे संजय विभूते यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक एकतर्फीच होईल, असे भाकीत व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या पुनर्रचनेमध्ये भिलवडी वांगीऐवजी पलूस हा नवा मतदारसंघ निर्माण झाला. २०१४ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी विजयश्री खेचून आणली. पतंगरावांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव विश्वजित बिनविरोध निवडून आले. यंदाही संग्राम देशमुखांचा पत्ता कट करून विभूतेंनाच उमेदवारी मिळवण्याचे त्यांचे राजकीय डावपेच यशस्वी झाल्याचे म्हटले जात आहे.

५० वर्षे सांगलीतील ९ विधानसभा जागांवर काँग्रेसचे वर्चस्व
- मंत्रिमंडळात पतंगराव कदम यांची वर्णी लागल्यानंतर ते शरद पवार यांना काहीसे डोईजड वाटू लागले. १९९५ मध्ये पतंगरावांना काँग्रेसचे तिकीट मिळाल्यानंतर पवारांनी सहकारी संपतराव देशमुखांना बंडखोरी करायला लावून पाठीशी आपला गट भक्कमपणे उभा केला. पतंगराव १० हजार मतांनी पराभूत झाले होते.

- राज्यात मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार स्थापन झाले आणि संपतराव यांच्यासह ४१ आमदारांनी युतीला पाठिंबा जाहीर केला. परंतु अवघ्या ३ वर्षांतच संपतरावांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. संपतराव यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांनी पतंगराव यांचा पुन्हा एकदा पराभव केला होता. त्यानंतर १९९९ मध्ये पतंगरावांनी विजयश्री खेचून आणली होती.

वर्षभरात विश्वजित यांचा संपर्क कमी
विश्वजित हे पुण्याचे नेतृत्व आहे,असे विरोधक बिंबवत आहेत. या मतदारसंघाची सारी भिस्त पतंगरावांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव यांच्या खांद्यावर असायची. पतंगरावही दर शनिवारी, रविवारी आपल्या मतदारसंघात ठिय्या टाकून असायचे. परंतु गेल्या वर्षभरात त्या मानाने विश्वजित यांचा संपर्क कमीच आहे.

जातीय समीकरणे : मराठा समाजाचे प्राबल्य
या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. घाटाखालील विभागात जैन समाजाचे बऱ्यापैकी मतदान आहे. हा मतदारसंघ घाटावरचा आणि घाटाखालचा म्हणून ओळखला जातो. घाटावरच्या भागात पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांचे वर्चस्व, तर खालील भागात पतंगराव आणि जी.डी. बापू लाड यांचे वर्चस्व होते. दोघांच्या निधनानंतर विश्वजित व जी.डी. बापूंचे चिरंजीव अरुण लाड, यांनी मोर्चेबांधणी केली आहे. जी. डी. बापू लाड कम्युनिस्ट विचारांचे होते. परंतु त्यांचे चिरंजीव अरुण लाड हे राष्ट्रवादीत सहभागी झाले आहेत. कदम व लाड कुटुंबीयांत राजकीय संघर्ष हा गेली दोन तपे सुरू आहे.