आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- "महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही", अशा शब्दात सांताक्रूज आंदोलनातील 'त्या' महिलेने आपली भूमिका मांडली आहे. "महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला, असा संदेश प्रसारित करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून त्यामागे विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणे हा त्यांचा हेतू आहे", असेही मत या महिलेने व्यक्त केले आहे. यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा, ही मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेली मागणीच फुसकी ठरली आहे.
गेल्या आठवड्यात सांताक्रूज पटेलनगर येथे विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी "आम्ही हातांची साखळी करून महापौरांना रस्त्यात रोखले असता महाडेश्वर सरांनी फक्त माझा हात बाजूला केला, त्यांनी माझा हात पिरगळला नाही" असे ‘त्या’ महिलेने स्पष्ट केले आहे. एका व्हिडिओद्वारे आपले हे मत या महिलेने व्यक्त केले आहे. "या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझी आणि महाडेश्वर सरांची विनाकारण बदनामी होत आहे. प्रत्यक्षात माझा विनयभंग झालेलाच नाही. मी महाडेश्वर सरांच्या विरोधात पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल करावी, यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी माझ्याकडे सतत आग्रह धरत आहेत. पण मला राजकारणात अजिबात रस नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही", असेही ‘या’ महिलेने व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे.
महापौरांनी महिलांना दमदाटी केली आणि त्यांचा विनयभंग केला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर काही पक्षांच्या महिला नेत्यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, "मी गेली तीन दशकं वांद्रे-खार-सांताक्रूज परिसरात शिवसैनिक म्हणून काम करत आहे. प्रत्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर राजकीय–सामाजिक संस्कार केले आहेत. मी माझ्या आजवरच्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही महिलांचा अवमान केलेला नाही. माझ्यावर ज्यांनी बिनबुडाचे आरोप केले, त्यांचा खोटेपणा सदर महिलेने स्वत:च उत्तर देऊन उघड केला आहे", असे मत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केले आहे. "माझ्या बदनामीचा कट रचला गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे तसंच शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते आणि विभागातील शिवसैनिक तसंच नागरिक हे माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले, त्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो", अशा शब्दांत महापौर महाडेश्वर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.