आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परमार्थ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वास देशपांडे

परमार्थ ही खूप कठीण किंवा तात्त्विक संकल्पना आहे, परमार्थ समजून घेण्यासाठी खूप वाचन वगैरे करावं लागतं, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण परमार्थ समजून घेण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आपल्या घासातला घास वाटून घेणं हाही परमार्थच की...

माझ्या लहानपणी आमच्या गावात भिक्षा मागण्यासाठी फकीर यायचा. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. आमच्या घराजवळ आला की मला म्हणायचा, दे दे बेटा, अल्ला के नाम पे. मी त्याला कधीच रिक्त हस्ताने पाठवले नाही. पण कधी कोणी त्याला भिक्षा दिली नाही तरी  तो चिडत नसे. हसतमुखाने पुढे जात म्हणत असे, ‘ देगा उसका भला, ना देगा उसका भी भला.’ मला त्या वेळी त्याचे उद्गार फारसे कळायचे नाहीत. देगा उसका भला, हे तर ठीक आहे. कळण्यासारखे आहे. पण ना देगा उसका भी भला हे कसे काय? यावर आई मला सांगायची, अरे आपण फक्त स्वार्थापुरता विचार करतो. दुसऱ्याचा विचार करतो का ? त्या फकिराच्या उद्गारामागे सर्वांचेच भले होवो ही शुभकामना आहे. किती सुंदर होते त्या फकिराचे तत्त्वज्ञान ! तो तर भिक्षा मागणारा फकीर होता, दुस‍ऱ्यांना देण्यासारखे त्याच्याकडे काय होते? पण जे होते ते तो भरभरून देत होता. 

आपल्याकडे संतांनी स्वार्थ आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला आहे. आपले कर्तव्य करता करता नकळत परमार्थदेखील करता येतो. बागेत फुलांवर बसून मधमाशा मध गोळा करतात. खरं तर त्या आपला स्वार्थ साधत असतात. पण हे करताना त्यांच्याकडून नकळत परागीभवनही होते. ज्याचा  वनस्पतींना उपयोग होतो. याच पद्धतीने जंगलातील पक्ष्यांकडून फळे भक्षण केल्यानंतर, त्यांच्या विष्ठेतून बाहेर टाकल्या जाणाऱ्या बियांमुळे वनस्पती वाढीसाठी आपोआप मदत होते. 

गांडूळ जमीन भुसभुशीत करून झाडांसाठी ती जमीन उपयुक्त करतात. असे हे निसर्ग आणि प्राणी यांचे ‘सहनाववतु सह नौ भुनक्तु’ असे  नाते. जणू उपनिषदातील मंत्राचे पालनच!  जो स्वत:साठी जगताना इतरांसाठीही आनंदाची कामना करतो, परमेश्वर त्याच्या झोळीत भरभरून आनंद टाकतो. मग अशा वेळी ‘देणाऱ्य‍ाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ 

अशी आपली अवस्था होते. आपल्याजवळ जे आहे त्यातूनच थोडे इतरांनाही देणे म्हणजेच परमार्थ साधणे नव्हे काय...?
 

बातम्या आणखी आहेत...