आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद : पानिपतची लढाई हा विजय आहे की पराजय असा प्रश्न उपस्थित केला जातो. तो पराजय जरी असला तरी विजय आहे. तो धुराआडच्या धगीचा विजय असल्याचे मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी या कादंबरीवरील मुक्त संवादात व्यक्त केले.
ते म्हणाले की, पानिपतसारखी दुसरी लढाई कुठलीही झाली नाही. तीन, चार तासांत तीन लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरांचा मृत्यू झाला. संपूर्ण इतिहास उकरून काढला तरी एखाद्या राज्यातील एवढ्या मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडलेले कुठेही सापडत नाही. हिरोशिमा-नागासाकी यावर बॉम्ब पडले असतानाही हानी झाली, पण त्यात झालेली हानी किरणोत्सर्गामुळे पुढे दहा दिवस सुरू होती. पण पानिपतात झालेली हानी ही तीन चार तासांत झालेली हानी आहे.
पाटील यांनी सांगितले, कादंबरी लिहायला घेतली तेव्हा मला एकेक कॅरेक्टर डोळ्यापुढे दिसू लागले. भाऊसाहेब, जनकोजी, विश्वासराव अशा अनेक पात्रांशी मी एकटाच संवाद साधायला लागलो. तीन-तीन तास दोन दोन तास झोपायचं आणि अचानक मला माझी पात्र दिसायची आणि मी लिहायला घ्यायचो. त्याचवेळी मी खूप आजारी पडलो होतो. पण आपला संसार जेवढा महत्त्वाचा त्यापेक्षाही शब्द संसार अधिक महत्त्वाचा आहे, असे मी बायकोला सांगितलं आणि पुढे पानिपत मी लिहितच गेलो. लोक म्हणायचे काय मेलेल्या लोकांवर लिहिता, कालचे मुद्दे बाहेर कशाला काढता? पण मला सांगावसं वाटतं आम्ही स्फूर्ती देणाऱ्यांना उकरून काढतो आहोत. याच संदर्भात बाळ कोल्हटकर म्हणाले होते की, तुम्ही लिहीत आहेत. पण तिला पानिपत हे नाव देऊ नका. कादंबरी छापण्यासाठी ही जात होती पण मग त्याच वेळी मी माजगावकर साहेबांना फोन करून सांगितलं की, साहेब पुस्तकाचं नाव पानिपतच ठेवा, जगेन तर पानिपत सोबत आणि मरेनही पानिपतबरोबरच' हे सांगतानाच विश्वास पाटील यांनी संपूर्ण पानिपतची लढाई उपस्थितांसमोर उलगडली. ही लढाई फक्त हिंदू, मुस्लिम अशी लढाई नव्हती तर ही लढाई स्वाभिमानाची, धैर्याची आणि शौर्याची होती. असं सांगतानाच त्यांनी दत्ताजी शिंदे, भाऊसाहेब, नानासाहेब, गोपिकाबाई ,पार्वतीबाई, राघोबादादा अशा पात्रांसह त्यांच्यातील भाऊबंदकी, पानिपतला जाताना न मिळालेली रसद, मोठा फौजफाटा घेऊन जाताना आलेल्या अडचणी. नानासाहेबांची एक चूक, युद्धाच्या वेळी असलेलं दक्षिणायन असं सगळं उलगडून दाखवलं आणि शेवटी एवढं सगळं झाल्यावर आपण पानिपताचे युद्ध पराजित म्हणायचं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पानिपतातील असे एकेक प्रसंग उलगडताना पाटील यांचे डोळे अनेकदा पाणावले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.