आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही डोळ्यांनी अधू शेख हमीद यांनी पत्नीच्या मदतीने मिळवली पीएचडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकास पाटील 

जळगाव - दाेन्ही डोळ्यांनी अधू असलेले तळोदा येथील प्रा. शेख हमीद शेख महेबूब पिंजारी यांनी पत्नीच्या मदतीने ‘खान्देशातील शेतकरी चळवळीचा इतिहास’ या विषयावर सलग सात वर्षे संशोधन केले. त्याबाबतचा अहवाल सादर करत कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना १० आॅक्टोबर रोजी पीएचडी बहाल केली आहे. ब्रेल लिपीचा आधार न घेता लेखनिकाच्या मदतीने दोन्ही डोळ्यांनी अधू असलेले प्रा. शेख हे पीएचडी करणारे खान्देशातील पहिले प्राध्यापक. जिद्द, चिकाटी, मेहनत व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही गाेष्ट अशक्य नाही, हे प्रा. शेख हमीद यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

शेख हमीद शेख महेबूब पिंजारी हे मूळचे नरडाणा येथील रहिवासी. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती. त्यात हमीद हे दोन्ही डोळ्यांनी अधू. मात्र, आई झरिनाबी यांनी मुलाला शिकवण्याचा चंग बांधला. सर्वसामान्य मुलाप्रमाणे शाळेत पाठवले. हमीद हे वर्गात शिक्षक जे शिकवायचे ते मन लावून एेकायचे. परीक्षेच्या वेळी भाऊ बशीर शेख लेखनिक म्हणून जबाबदारी पार पाडायचे, असे करत हमीद यांनी दहावी, बारावी, बीए, एमएचे शिक्षण पूर्ण केले. बारावी व बीएला पहिला क्रमांक मिळवला. एमएला इतिहास स्पेशल विषय घेतला. त्यात महाविद्यालयात पहिले, तर विद्यापीठात द्वितीय आले. मराठ्यांचा इतिहासामध्ये प्रसिद्ध चिमणाजी वाड पारितोषिक व जगाच्या इतिहासात शंकर नरहर स्मृती पारितोषिकही पटकावले. डोळस विद्यार्थ्यांना लाजवेल अशी हमीद यांची ही कामगिरी. आईने दाखवलेला विश्वास हमीद यांनी सार्थ करून दाखवला. 

दृष्टिबाधितांसाठी स्वतंत्र शाळा आहेत. त्यात ब्रेल लिपीच्या माध्यमातून आज हजारो मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, हमीद यांनी ना ब्रेल लिपी अवगत केली ना दृष्टिबाधितांसाठीच्या शाळेत प्रवेश घेतला. सर्वसामान्य मुले ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत, हायस्कूल, महाविद्यालयात शिक्षण घेतात तेथे शिकले. न्यूनगंडाला कधी जवळ येऊ दिले नाही. 

एमएनंतर लग्न झाले. पत्नी आयेशाबी शेख यांच्या मदतीने पुढील शिक्षण पूर्ण केले. तळोदा येथील आर्ट््स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयात इतिहासाचे शिक्षक म्हणून रुजू झाले व ज्ञानदानाचा यज्ञ सुरू झाला. तो आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

यशाचा अालेख सतत उंचावत होता. तो हमीद यांनी थांबू दिला नाही. पुढे इतिहासाचे गाढे अभ्यासक, केंद्र शासनाच्या हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशनचे सदस्य प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पीएच.डी. करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले. खान्देशातील शेतकरी चळवळीचा इतिहास हा त्यांच्या संशोधनाचा विषय. २०१२मध्ये विद्यापीठात रजिस्ट्रेशन केले. खान्देशातील शेतकरी चळवळीच्या अभ्यासासाठी खान्देश पालथा घातला. 

सतत ७ वर्षे केला अभ्यास
मुंबईचे अभिलेखागार, पोलिस मुख्यालयात जुन्या संदर्भासाठी धाव घेतली. पत्नी पुस्तकांचे वाचन करायच्या अन् हमीद एेकून लक्षात ठेवायचे. सतत सात वर्षे अभ्यास, संशोधन केले व १० ऑक्टोबर रोजी कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना पीएचडी बहाल केली. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 

दृष्टिबाधित एक मुलगी डबल नेट-सेट, तर दुसरी डॉक्टर : 
हमीद यांना आरजू, नीलिमा, फेमिना या तीन मुली व इम्रान हा मुलगा आहे. आरजूही दृष्टिबाधित आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेही घवघवीत यश मिळवले आहे. ती इतिहास विषयात डबल नेट-सेट आहे, तर नीलिमा ही एमएस (स्त्रीरोगतज्ज्ञ) करत आहे. 
 

विद्यार्थी असावा तर असा
हमीद शेख पिंजारी हे प्रचंड मेहनती आहेत. वर्गात एकदा शिकवलेले ते लक्षात ठेवायचे. त्या जोरावर त्यांनी आयुष्यात यशाची एक‌‌-एक पायरी गाठली. डोळ्यांनी अधू असतानाही त्याचा कधी बाऊ केला नाही. अडचणींवर मात करत यश मिळवले. त्यांचा शिक्षक व मार्गदर्शक म्हणून मला अभिमान आहे. विद्यार्थी असावा तर असा. ‌‌‌
-प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे, हमीद शेख पिंजारी यांचे मार्गदर्शक 
 
 

दिव्यांगांनी अडचणींवर मात करावी
आई, भाऊ, मामा, पत्नी व चेअरमन सुदामभाई पटेल, सुधीरकुमार राठी, प्राचार्य पी. व्ही. रामय्या यांच्या सहकार्याने आज येथपर्यंत पोहाेचू शकलो. दिव्यांग बांधवांनीही अडचणींवर मात करावी, यश हमखास मिळते. 
-शेख हमीद पिंजारी

बातम्या आणखी आहेत...