आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनचाकी सायकलवर उभारला जीवनाचा डोलारा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. आई, चार भाऊ व एक बहीण अशा परिवारात वाढताना जन्मतः:च दोन्ही पायांना आलेल्या अपंगत्वावर मात करीत कात्नेश्वर (ता.पूर्णा) येथील विठ्ठल वामनराव चापके (वय ३२) याने व्यवसायाचा मार्ग निवडला. त्यातही विवाहानंतर पत्नीच्या अपंगत्वाने वैद्यकीय उपचारांवर झालेला खर्च करताना जीव मेटाकुटीस आला. अशा स्थितीतही न हारता परिस्थितीशी चार हात करण्याचे ठरवत विठ्ठलने मशरुमच्या मार्केटिंगचा व्यवसाय निवडला. तीन चाकी सायकलवर चालता फिरता मशरुम व मसाला विक्रीचा व्यवसाय दोघा पती-पत्नीला चरितार्थ चालवण्यास मोठा सहाय्यभूत ठरला आहे. 


येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासमोर दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत एक अपंग तरुण तीन चाकी सायकलवर पदार्थ विक्रीस ठेवतो. त्याच्या जवळ मशरुमचे बॉक्स व घरी तयार केलेल्या मसाल्याची पाकिटे दिसून येतात. सकाळ संध्याकाळ फिरण्यास आलेल्या गृहिणी, नागरिक आवर्जून खरेदी करतात. त्याच बरोबर कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या संत सावता शेतीमाल बाजारात एका कोपऱ्यात आपला सायकलवरचा स्टॉल लावून विठ्ठल चापके आपला व्यवसाय चालवतो. चैतन्य मशरुम होलसेल व रिटेल अशा नावाने त्याचा हा व्यवसाय आहे.  


कात्नेश्वरमध्ये जेमतेम शेती असलेल्या चापके कुटुंबीयातील विठ्ठल हा जन्मत: दोन्ही पायांनी अपंग आहे. कसेबसे आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाकडे त्याची वाटचाल सुरू झाली. 


ग्राहकांकडूनही प्रतिसाद
मुंबई, लातूर, अकोला, नागपूर येथून बटन मशरुम आणून त्याची विक्री करण्यास सुरुवात केली. या मशरुमला  दहा ते वीस डिग्री तापमानात ठेवावे लागत असल्याने त्याने सायकलवरच आईस बॉक्सची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मशरुमचे तापमान नियंत्रित राहून त्याच्या विक्रीतून चांगला नफा कमवण्यास सुरुवात झाली. शहरात  बटन मशरुमला मोठी मागणी असते. 


थेट दिल्ली गाठली | अपंगासाठी राज्य सरकारने व्यवसाय करण्यासाठी दिलेल्या व्हॅनवरून त्याने २००६ ते २००८ पर्यंत चालती फिरती एस.टी.डी. चालवली. या व्यवसायात त्याने थेट दिली गाठली. त्यानंतर पुन्हा परभणी गाठली. या ठिकाणी झेरॉक्स, सर्व प्रकारच्या रिचार्जचे छोटेसे दुकान टाकले. २०१५ मध्ये विठ्ठलचा विवाह पार्वतीशी झाला. मात्र पत्नीही एका पायाने अपंग आहे. त्यातच खुर्चीवरून पडल्याने झालेल्या अपघातात विठ्ठलने जमा केलेली जमापुंजी तिच्या उपचारावर खर्च झाली. 


प्रकल्प उभारण्याचा संकल्प 
व्यवसायातील यश पाहता लवकरच मशरुम प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प विठ्ठलने सोडला आहे. तीन चाकी सायकलवरून मशरुम विक्रीच्या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. मात्र याही पुढे जाऊन येत्या दिवाळीपासून आयस्टर मशरूमचा प्रकल्प सुरू करणार असल्याचे विठ्ठलने सांगितले.  सध्या घरी मसाला तयार करून तो या सायकलवरूनच विक्री केला जात आहे.  

बातम्या आणखी आहेत...