आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर : येथील विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीच्या दिवशी (ता.३०) श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि शाहीथाटामाटात संपन्न झाला. वसंत पंचमीपासून देवाच्या रंगपंचमीस सुरुवात झाली. त्यामुळे आजपासून ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.
अशा प्रकारे पार पडला विवाह सोहळा
श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र परिधान करण्यात आलेले होते. या बरोबरच रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ,हिरवा चुडा आणि विविध पारंपारिक अलंकाराने सजविले गेले. सकाळी अकरा वाजता रुक्मिणीमातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण झाली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण होते. दोन्ही ठिकाणी गुलालाची उधळण पार पडल्या नंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची अलंकाराने सजविलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणण्यात आली.
या दोन्ही उत्सव मूर्तींना मंडावळ्या बांधण्यात आलेल्या होत्या. उपस्थितितांना फुलांच्या पाकळ्या आणि अक्षतांचे वाटप करण्यात आलेले होते. दोन्ही उत्सवमूर्तीच्या समोर अंतरपाट धरुन मंगलाष्टका म्हणण्यास सुरुवात झाली. शेवटी आता सावध सावधान ... ही मंगलाष्टक म्हणल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून विठ्ठल रुक्मिणीच्या अंगावर अक्षता टाकल्या. मंदिरात टाळ-मृदुंगाच्या जयघोषात झाला. उपस्थित भाविकांनी चक्क लाडक्या विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा याचि देहि याचि डोळा अनुभवला.
हा विवाह सोहळा झाल्यावर सांयकाळी विठ्ठलरुक्मिणीच्या उत्सव मूर्तीची शहरातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.
येथील विठ्ठल मंदिरामध्ये गुरुवारी वसंतपंचमीच्या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झालेली होती.
अशी आहे विवाह सोहळ्याची कथा
भगवान कृष्ण म्हणजे विठ्ठलच होय. कौडिंण्यपुरात रुक्मिणीमातेचे अपहरण झाल्यानंतर तिचा भगवान श्री कृष्णाबरोबर व्दारकेजवळ विवाह सोहळा संपन्न झालेला होता. तो वसंत पंचमीचा दिवस होता. त्यामुळे आज विठ्ठल - रुक्मिणीच्या लग्नाचा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्या पूर्वी येथील प्रसिध्द कीर्तनकार अनुराधा शेटे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी स्वयंवराची कथा आपल्या कीर्तनातून सांगितली. या वेळी सर्व जण सुखावले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.