Home | Mukt Vyaspith | voice therapy treatment experience

अंतर्मुख करणारा अनुभव

सोनाली लोहार | Update - Jul 20, 2011, 01:21 PM IST

दोघेही पती-पत्नी अतिशय इमोशनल झाले होते. परत एकदा एक अनुभव मला अंतर्मुख करून गेला.

  • voice therapy treatment experience

    माझ्याकडे बाहेरगावाहून एक पेशंट आला. मध्यमवर्गीय, अतिशय साधी आणि सुस्वभावी व्यक्ती. वय साधारण 30 च्या आसपास. आवाज संपूर्ण बायकी. माझ्याकडे आल्यावर आम्ही लगेच व्हॉइस थेरपी उपचार सुरू केले आणि हळूहळू आवाज सुधारून काही सीटिंग्जनंतर जवळजवळ नॉर्मल झाला. खास ट्रीटमेंटसाठी हे गृहस्थ प्रत्येक आठवड्याला खूप लांबून यायचे. पण एकही अपॉइंटमेंट कधी चुकवली नाही किंवा कधी 5 मिनिटेसुद्धा उशिरा आले नाहीत. मला अतिशय कौतुक वाटायचं, पण कधीही व्यक्तिगत स्तरावर त्यांच्याशी मी बोलले नाही. थेरपी यशस्वीपणे संपली. ते गृहस्थ परत गेले. मध्ये काही आठवडे गेले आणि अचानक मला फोन आला, ‘मॅडम, नुसतं भेटायचं आहे, येऊ का?’ मी लगेच त्यांना बोलावलं. ते गृहस्थ आले. अतिशय छान पुरुषी आवाज. मला माझ्याच नकळत स्वत:चा अभिमान वाटला. ते थोडा वेळ शांत बसले. मग म्हणाले, ‘बायकी आवाजामुळे माझी अवहेलना झाली तेवढी पुरे झाली, पण माझ्या आवाजामुळे माझ्या बाळाची जगाकडून थट्टा झाली असती तर मी सहन करू शकलो नसतो. म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून तुमच्याकडे आलो होतो. माझ्या पत्नीलाही तुमच्याशी बोलायचं आहे. मी तुम्हाला फोन लावून देऊ का? बोलाल का तुम्ही? तिला खूप बरं वाटेल.’ मी अक्षरश: बधिर झाले होते. त्याच अवस्थेत मी त्यांच्या पत्नीशी बोलले. दोघेही पती-पत्नी अतिशय इमोशनल झाले होते. परत एकदा एक अनुभव मला अंतर्मुख करून गेला. उपचार केवळ एका व्याधीवर केला गेला नव्हता, त्या व्याधीशी जोडलेली तीन आयुष्ये होती, त्या तिन्ही आयुष्यांवर त्याचा परिणाम झाला होता.

Trending