आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याने उलटी केल्याने विषप्रयोग झाल्याचा संशय, घटनास्थळी सापडले मांसाचे दोन तुकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुसावळ : मान्सूनमध्ये झालेला अल्प पाऊस आणि निर्माण झालेला दुष्काळ, वनविभागाकडील अल्प मनुष्यबळ, वनक्षेत्रावर होत असलेले अतिक्रमण यास र्व कारणांमुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांशेजारील वावर वाढला आहे. सुरक्षित अधिवासाच्या अभावामुळे वरणगाव शिवारातील मन्यारखेडा नाल्याजवळ बिबट्याचा बळी गेल्याची घटना रविवारी सकाळी उघड झाली. घटनास्थळी बिबट्याच्या उलटीतून निघालेल्या मांसाच्या दोन तुकड्यांना उग्र वास येत असल्याने संशय बळावला. 


माजी सैनिक अनिल पाटील यांच्या वरणगाव शिवारातील गट क्रमांक ६९२ मधील केळीबागेत अंदाजे चार वर्ष वयाच्या ठिपकेदार बिबट्याचा मृतदेह रविवारी सकाळी आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी परिसरातील गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. जंगलाच्या भागात सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे, यामुळे वन्यजीव शेतीशिवाराकडे वळले आहे. प्रथमदर्शी बिबट्याची शिकार झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. मात्र बिबट्याची शिकार प्रामुख्याने कातडी व नखांसाठी केली जाते. 


मन्यारखेडा शिवारातील मृत बिबट्याची कातडी, नखे व इतर सर्व अवयव सुस्थितीत असल्याने शिकारीच्या उद्देश नसावा, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. रविवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर सोमवारी सकाळी शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. घटनास्थळी उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू. पगार, वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक राजेश दसरे, वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, फिरत्या पथकाचे वनक्षेत्र अधिकारी धनजंय पवार, वरणगावच्या वनरक्षक दीपाली जाधव, मुकेश बोरसे, वनपाल ललीत गवळी, शिपाई एन.एम.वानखेडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच बारीकसारिक नोंदी घेतल्या. 

 

वरणगाव शिवारात बिबट्याचा मृत्यू, शिकारीचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळला 

 

तीन घटना अशाप्रकारे 
२ मार्च २०१८ रोजी वढोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा शेती शिवारात शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्यावर हल्ला झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर २३ मार्च २०१८ रोजी तालुक्यातील सुकळी शिवारातील गट क्रमांक ४८ मधील केळी बागेत १५ वर्षीय पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती . तर १२ ऑगस्ट २०१८ रोजी वढोदा वनपरिक्षेत्रातील थेरोळा गावाजवळील नदीपात्रात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला होता. 


पाण्याचे दुर्भिक्ष वाढले 
बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण पीएमच्या रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. पण ज्या अर्थी मृत बिबट्याचे अवयव सुसस्थितीत आहेत, त्या अर्थी शिकारीचा उद्देश नसावा. पाण्याचे दुर्भिक्ष्य व जंगलात अतिक्रमण वाढल्याने वन्यप्राणी सुरक्षित नसून ते शेतीशिवाराकडे येत आहेत. राजेश ठोंबरे, वन्यजीव अभ्यासक, चाळीसगाव 


वन्यजीव सुरक्षित नाहीत, बिबट्याचा मृत्यू ही घटना संशयास्पद 
बिबट्याचा मृत्यू हा संशयास्पद वाटत आहे. शिकार झाली नसली तर विषप्रयोग झाला असावा, असे दिसून येत आहे. या भागात यापूर्वी बिबट्याचा वावर दिसून आलेला नाही. विल्हाळे परिसरात यापूर्वी बिबट्या दिसून आला आहे. वन्यजीव जंगलात सुरक्षीत नसल्याने ते शेती शिवाराकडे येण्याचे प्रकार उन्हाळ्यात आणखी वाढतील सतीश कांबळे, सदस्य, वन्यजीव संरक्षण संस्था 


नीलगायींपासून पिकांचा बचाव 
विल्हाळे परिसरात बिबट्यामुळे नीलगाई व अन्य वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचे प्रमाण कमी झाले आहे. या परिसरात नीलगाईंचे प्रमाणही कमी झाले. मात्र बकऱ्या व इतर जनावरे फस्त केल्याची घटना घडली नाही. मात्र, रविवारी उघड झालेल्या घटनेमुळे शेतकरी व मजूर रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे. बिबट्याचा मृत्यूमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 


शेतशिवारात वावर वाढला 
मुक्ताईनगर तालुक्यातील वनपरीक्षेत्रासह सातपुड्यात वाघाचा वावर आहे. सध्याच्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. यामुळे वाघ, बिबट्या आदी वन्य प्राण्यांची खाद्यासाठी भटकंती होत आहे. जंगलात कुत्रे, डुकरे, नीलगाई, हरिण आदींची शिकार मिळत नसल्याने हे हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. गावाजवळील शेत-शिवारात केळी, ऊस, कापूस व अन्य पिकांमध्ये आसरा घेत आहेत. केळी बागांमध्ये उन्हासह थंडीपासून बचाव होत असल्याने व सुरक्षित जागा असल्याने या जागांवर हिंस्त्र प्राणी आसरा घेतात. याच प्रकारातून मन्यारखेडा शिवारातील केळी बागेत बिबट्याने आसरा घेतला असावा, असाही अंदाज आहे. 

बातम्या आणखी आहेत...