Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | voters you want 'Baan' or 'Khan'

‘बाण हवाय की खान’ऐवजी यंदा परभणीत खासदाराच्या फाटक्या तोंडाचीच चर्चा

दीपक पटवे | Update - Apr 16, 2019, 08:28 AM IST

शेवटच्या दोन, तीन दिवसांत काय उपाय करता येतील, या विवंचनेत सारी शिवसेना दिसतेय.

  • voters you want 'Baan' or 'Khan'

    परभणी- ‘खान हवाय की बाण?’ असा भावनिक प्रश्न उपस्थित करून दर निवडणुकीत परभणी मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. १९८९ पासून २०१४ पर्यंतच्या लोकसभेच्या ८ निवडणुकांपैकी १९९८ चा अपवाद वगळला तर कायम शिवसेनेचाच उमेदवार इथे निवडून आला आहे. १९९८ मध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर विजयी झाले होते, त्याची यंदा पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती शिवसेनेच्या गोटात आहे. त्यामुळे शेवटच्या दोन, तीन दिवसांत काय उपाय करता येतील, या विवंचनेत सारी शिवसेना दिसतेय.


    परभणी मतदारसंघात अशी अनेक गावे आहेत जिथे अपवादानेच शिवसेनेशिवाय अन्य पक्षांना मतदान होते. अशा काही गावांना आम्ही भेट दिली तेव्हा या वेळची नाराजी किती खोलवर पोहोचलेली आहे याची जाणीव झाली. धर्मापूर गावात पारावर बसलेल्या काही वयस्क व तरुणांच्या घोळक्यात जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विद्यमान खासदारांविषयीच्या नाराजीचे प्रत्यंतर आले. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेली ही मंडळी. कधी काळी गावातली वारकरी मंडळी खासदारांना भेटायला गेली तेव्हा त्यांच्याकडून अपमानित होऊन परतली. तो राग त्या प्रत्येकाच्या मनात होता. ‘काम होत नसेल तर नका करू, पण म्हाताऱ्या-कोताऱ्यांचा अपमान कशाला करता? आमच्या मतांवरच निवडून येतात आणि आमचाच अपमान करतात?’ असा राग ही मंडळी व्यक्त करत होती. आता आम्ही बदल करणार, असे ते ठामपणे सांगत होते. हाच अनुभव टाकळी कुंभकर्ण गावातही आला. ‘या माणसाचं (खासदाराचं) तोंड फाटकं आहे हो. खूप लोकांना नाराज करून ठेवलंय. आता लोक बदला घ्यायचं म्हणताहेत. समोरचा उमेदवार कसाही असो, त्याला मतदान करायचं..’ अशाच प्रतिक्रिया आहेत. आमच्या गावातलं निम्मं तरी मतदान या वेळी फिरेल, असं एका दुकानाबाहेरच्या बाकावर बसलेल्या दोघातिघांनी सांगितलं. इतरत्र मात्र फक्त मोदींसाठी नावडत्या उमेदवारालाही मतदान करण्याची मानसिकता आहे. ‘तुमच्याकडेही तसे होऊ शकते?’ असे म्हणताच ठामपणे नाही असेच उत्तर आले. ‘मोदी तर पाहिजेच. पण एकट्या परभणीच्या खासदारावर थोडी ते बसले आहेत. देशभरातून त्यांना मिळतीलच की खासदार’, त्यांचे स्पष्टीकरण. परभणीतल्या अनेक गावांत असेच वातावरण होते.


    ‘वंचित’ची शिवसेनेलाच धास्ती : परभणीत मुस्लिमांची मते प्रभावी आहेत. पण वंचित आघाडीने हैदराबादचा उमेदवार आयात केल्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव जाणवेल असे नाही. कधी काळी या जिल्ह्याशी त्यांची नाळ जोडलेली होती, असे सांगतात. पण लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. ‘हा उमेदवार अचानक अवतरलाय. त्याला कधी पाहिले नाही की नावही ऐकलेले नाही. अशा उमेदवाराला मतदान करणे म्हणजे शिवसेनेला निवडून येण्यासाठी मदत करण्यासारखेच आहे, त्यामुळे बहुतांश मुस्लिम राष्ट्रवादीलाच पसंती देतील,’ अशा प्रतिक्रिया या समाजात आहेत. हीच भीती शिवसेनेलाही वाटतेय. वंचितने स्थानिक मुस्लिमाला उमेदवारी दिली असती तर आमच्यासाठी बरे झाले असते, असे शिवसेनेतील एक पदाधिकारी सांगत होते. किमान मागासवर्गीयांची एकगठ्ठा मते वंचितकडे जातील, असाही त्यांचा होरा आहे. ही चर्चा सुरू असतानाच एका व्हायरल ऑडिओ क्लिपची बातमी आली. त्या क्लिपमध्ये एका सरपंचांशी खासदार आणि शिवसेना उमेदवार संजय जाधव बोलत आहेत, असा दावा करण्यात येत होता. त्यात मागासवर्गाविषयी अपशब्द वापरल्याचेही ऐकू येत होते. त्या क्लिपच्या सत्यतेबाबत खात्री होऊ शकली नाही. पण त्या बातमीने त्या शिवसेना पदाधिकाऱ्याने कपाळावर हात मारून घेतला. ‘आम्ही खासदारांचे फाटके तोंड शिवणार आहोत,’ असे पालकमंत्र्यांनीही एका सभेत सांगितले होते.


    रावतेंचीही प्रचाराकडे पाठ : एकेकाळी शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे प्रताप बांगर ‘तुम्ही प्रचारात नाहीत?’ या प्रश्नावर म्हणाले, ‘आमच्यासारख्यांना कामच दिले नाही काही.’ बांगर हे ओबीसींमधील प्रमुख नेतृत्व. अशा अनेकांना खासदारांनी दुखावल्याचे पदोपदी दिसून आले. अनेकांनी मंत्री दिवाकर रावते यांचेही संदर्भ दिले. त्यांनी जिल्ह्यात उत्तम संघटन करून ठेवलेले दिसत होते. पण ते प्रचारात कुठेच नव्हते. खासदार जाधव यांनीच त्यांचे परभणीचे पालकमंत्रिपद घालवले, असा संदर्भ काही शिवसैनिकांनीच दिला.

Trending