आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील मतविभागणीचा फटका काँग्रेसला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - तब्बल ३० वर्षांपासून शिवसेनेकडे असलेल्या परभणी मतदारसंघात काँग्रेस बंडखोराने रिंगणात तळ ठोकून चालवलेली प्रचार मोहीम व एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यामुळे मतविभाजन अटळ आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघात शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर उभे आहे.

महायुतीचे आ. डॉ.राहुल पाटील, काँग्रेसचे रविराज देशमुख, काँग्रेस बंडखोर सुरेश नागरे, एमआयएमचे अलीखान, वंचितचे मोहम्मद गौस झैन असे प्रमुख उमेदवार परभणी मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणे अपेक्षित असताना महायुती आपली हिंदू व्होट बँक सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने भक्कमपणे प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी अन्य मतांचे विभाजन होत असल्याने काँग्रेसचे देशमुख यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यातही बंडखोर नागरे यांच्यामुळे काँग्रेसचा एक गट फुटलेला आहे.

१९९० पासून  काँग्रेसने प्रत्येक वेळी निकराची लढाई देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आलेले नाही. त्यामुळे हा बालेकिल्ला शिवसेनेकडे अबाधित राहिला आहे. २०१४ मध्येही युती नसताना डॉ.राहुल पाटील २३ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यावेळी एमआयएमकडून असलेले सज्जुलाला हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर भाजपचे आनंद भरोसे यांनीही ४३ हजार हजार मते मिळवत तिसरे स्थान पटकावले होते. या उलट यावेळी डॉ.पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भरोसे हे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून युतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. शिवसेनेची व्होट बँक शाबूत राखण्याबरोबर भाजपचाही असलेला मोठा मतदार व पक्षीय कार्यकर्त्यांची असलेली फळी डॉ.पाटील यांच्या प्रचारार्थ  उतरली आहे.  त्याचबरोबर डॉ.पाटील हे गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या रूपाने मतदारांसमोर जात आहेत. विशेषतः हिंदू व्होट बँकेला छेद देणारा प्रखर दावेदार उमेदवार रिंगणात नसल्याने डॉ.पाटील यांना केवळ या व्होट बॅँकेवरच लक्ष केंद्रीत ठेवावे लागणार आहे.
 

एमआयएमच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह
२०१४ एमआयएमचे सज्जुलाला यांनी दुसरे स्थान पटकावल्याने यावेळी मुस्लीम बहुल असलेल्या या मतदारसंघात एमआयएम तगडे आव्हान उभे करेल असे चित्र दिसत होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले अली खान यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीकडूनही मुस्लिम उमेदवारच रिंगणात असल्याने या मतांचे विभाजन निश्चितच आहे. त्याचबरोबर समाजातील काही पदाधिकारी नागरे यांच्याकडेही असल्याने या मतांचे विभाजन होणार  असल्याने एमआयएमच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.