आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीव्हीपॅट मशीनमध्येही छेडछाड होणे शक्य; कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- व्हीव्हीपॅट मशीन सदोष असून काही टप्प्यांवर त्यातही छेडछाड केली जाऊ शकते, असा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी वापरली जाणारी व्हीव्हीपॅटसारखी मतदान यंत्रे दोषविरहित असावीत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणीही या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. 

 

प्रशांत यादव असे याचिकाकर्त्याचे नाव असून याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार व्हीव्हीपॅट मशीनही संपूर्णत: दोषविरहित नसून दोन टप्प्यांवर त्यातही छेडछाड केली जाऊ शकते. यापैकी पहिला टप्पा म्हणजे संबंधित यंत्राचे उत्पादन करताना त्यामधील सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन अपलोड करताना त्यामध्ये छेडछाड करणे हा असून निवडणुकीपूर्वी प्राधिकृत निवडणूक अधिकाऱ्याद्वारे उमेदवारांची निवडणूक चिन्हे फीड करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही मशीनमध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण गेल्या वर्षभरापासून निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करत असून निवडणूक आयोगाद्वारे आपल्या दाव्याची योग्य ती दखल घेतली जात नसल्याचेही याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्या. एन.एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली असून याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याबाबतची नोटीस न्यायालयाने निवडणूक आयोगाला बजावली आहे. तसेच याबाबत काही उपययोजना असतील तर त्याबाबतच्या सूचना आयोगासमोर सादर करण्याचे निर्देशही याचिकाकर्त्यांना दिले आहेत.
 
निवडणूक आयोगाच्या उत्तराकडे लक्ष 
काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मशीनमधील छेडछाडीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेला आला होता. निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्समधील हॅकिंगबाबतची माहिती गोपीनाथ मुंडेंच्या हाती लागल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजा याने केला होता. त्यामुळे ईव्हीएमऐवजी व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे आगामी लोकसभा निवडणुका घ्या, अशी मागणी जोर धरत आहे. मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केलेल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाची प्रत व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्राप्त होऊन ती मतपेटीत पडत असते. त्यामुळे मतदान अधिक पारदर्शक पद्धतीने होत असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, आता व्हीव्हीपॅट मशीनवरच संशय उपस्थित झाल्याने निवडणूक आयोगाच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...