आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसलाही खिंडार, वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकरांनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, 31 जुलैला घेणार भाजप प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज(29 जुलै) काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोळंबकरांनी आपला राजीनामा सोपवला. आता 31 जुलैला कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

 

मागील काही दिवसांपासून कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. "मागील साडेचार वर्षात काँग्रेसने माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात मदत केली नाही. त्यामुळेच मी काँग्रेस सोडतोय असे कोळंबकरांनी याआधीच सांगितले होते. तसेच माझी कामे मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. फक्त नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन", असे कालिदास कोळंबकर म्हणाले होते. 


येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आधीच काँग्रेसला फटका बसत आहे. त्यातच आता वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच उद्या(30 जुलै) ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यानंतर येत्या बुधवारी म्हणजे 31 जुलैला भाजपात प्रवेश करतील.
 

बातम्या आणखी आहेत...