आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षित सामाजिक, आर्थिक बदलांसाठी हवी प्रतीक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाऊ लोखंडे   मुस्लिम, ख्रिस्ती असे अन्य धर्म न स्वीकारता डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कारण हा धर्म इथल्या मातीतला होता. दलित समाजाचा सामाजिक व आर्थिक विकास पूर्णपणे होऊ शकला नाही. कारण संपूर्ण समाजाने हे बदल स्वीकारले नाहीत. कोल्हापुरातील कांबळे नामक व्यक्तीचे उदाहरण याबाबतीत पुरेसे बोलके आहे. शाहू महाराजांनी कांबळे या अस्पृश्य माणसाला एक हाॅटेल उघडून दिले. परंतु, त्या हाॅटेलमध्ये कोणीच जात नसे. त्यामुळे स्वत: शाहू महाराज त्यांच्या कारभाऱ्यांसह कांबळेच्या हाॅटेलात चहापाण्यासाठी जात. पण, इतरांनी जाणे टाळले ते टाळलेच. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश डाॅ. बाबासाहेबांनी दिला. शिकल्यामुळे यांना पदव्या मिळतील आणि पदव्या मिळाल्यानंतर हे शहाणे होतील आणि संघटित होण्याचा प्रयत्न करतील, असे त्यांना वाटत होते. समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हेच धर्मांतराचे मूळ होते. पण, त्याचेही पूर्णपणे पालन होताना दिसत नाही. शाहू महाराजांनी त्यांच्या काळात ५० टक्के आरक्षण दिले होते. सर्व जाती-धर्मांना प्राधान्य दिले होते. त्या आधारावरच त्यांनी आपला राज्यकारभार केला. परंतु, तेवढ्याने सगळ्या समाजाचे परिवर्तन झाले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. पेशवाईनंतर लोकांवर आलेल्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक बंधनांमुळे दडपल्यासारखे झाले. हिंदू धर्मातील जातीयता आणि वर्णभेद काढून टाकला तर याच्यासारखा चांगला दुसरा धर्म नाही, असे डाॅ. बाबासाहेबांचे मत होते. दुसरे, आपण प्रोटेस्टंट हिंदू म्हणून राहायला तयार आहोत, असे ते म्हणत. पण, दुर्दैवाने या गोष्टी हिंदू धर्मात कायम राहिल्या. म्हणूनच त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगणे नाकारणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग केला. पाच वर्षे सत्याग्रह करूनही नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळू शकला नाही. आपण दुर्बल आणि अशक्त आहोत. आपल्याला दुसरीकडून ताकद आणि शक्ती मिळवावी लागेल. म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आपल्या समाजाला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी डाॅ. बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्था उभारल्या. त्यासाठी ब्रह्मदेशच्या राजाला पत्रही लिहिले. विषमता नष्ट करण्यासाठी समता हा त्यांचा संदेश होता. आज दृष्टिपथात असलेले बदल आणि काही प्रमाणात झालेली प्रगती हे त्याचेच फलित होय.  दलितांना इतक्या सवलती आणि आरक्षण कशाला हवे, असा प्रश्न आज विचारला जातो, आणि पूर्वीही विचारला जात होता. शाहू महाराजांच्या एका उच्चवर्णीय वकिलांनीही त्यांना हाच प्रश्न विचारला. त्या वेळी शाहू महाराजांनी एका सतरंजीवर चणे पसरवले आणि त्यांच्या तबेल्यातील घोड्यांना सोडले. ताकदवान घोड्यांनी मुसंडी मारून चणे खायला सुरुवात केली, तर म्हातारी घोडी व लहान घोडे मागेच राहिले. त्यांना ताकदवर घोड्यांच्या लाथा खाव्या लागल्या. ते दाखवत शाहू महाराज वकिलांना म्हणाले, यासाठी मला मागासवर्गीयांना आरक्षण द्यायचे आहे. आज आरक्षण आर्थिक निकषावर हवे असे नवेच पिल्लू सोडण्यात आले आहे. “सेव्ह मेरिट, सेव्ह नेेशन’ असे मोर्चे काढण्यात येत आहेत. आरक्षणामुळे गुणवत्तेवर अन्याय होत असल्याची ओरड करण्यात येत आहे. अशांनी शाहू महाराजांचे हे उदाहरण समजून घेण्याची गरज आहे. शहरी भागात निश्चितच आरक्षणामुळे काही प्रमाणात का हाेईना, सामाजिक व आर्थिक बदल झालेले आहेत. पण, ग्रामीण भाग यापासून बराच दूर आहे. त्यामुळे दलित समाजाची पूर्ण प्रगती होईपर्यंत आरक्षण असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.  शिक्षणाच्या बळावर दलित समाजातील तरुणांना नाेकऱ्या मिळाल्या. त्यातून काही प्रमाणात आर्थिक प्रगती झाली. पण, त्यातही चतुर्थ श्रेणीच्या जागा मोठ्या प्रमाणावर भरण्यात आल्या. इतर श्रेणींच्या जागा रिक्तच आहेत. खासगी क्षेत्रात अजूनही वाव नाही. त्यामुळे उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करायला हवे. राज्य समाजवादांतर्गत सरकारी जमिनी दलित, आदिवासी, भूमिहीन शेतमजुरांना कसायला देऊन त्यांना बैलांसह शेतीउपयोगी सर्व अवजारे देऊन सामूहिक शेती कसायला द्यावी. नदीजोड प्रकल्प राबवण्यात यावा. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती येणार नाहीत आणि शेतीला बारमाही पाणी मिळेल. त्यायोगे ग्रामीण भागात समृद्धी येईल. यातून सामाजिक व आर्थिक बदल घडून येतील.  बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर दोन महिन्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर डिसेंबरमध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने बौद्धांना सवलती दिल्या जाणार नाहीत, असा कायदा केला. बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्यांना आरक्षण मिळणार नाही, हा अन्याय होता. ५६ मध्ये बौद्ध झालेल्या पित्याने आपल्या मुला-मुलींची नावे जातीच्या रकान्यात बौद्ध लिहिली आणि नंतर डाॅक्टर, अभियंता, प्राध्यापक झालेली नोकरीत गेली असता त्यांना “तुम्हाला आरक्षण नाही,’ असे सांगण्यात आले. त्यांना परत येऊन महार लिहावे लागले. याचा मोठा सेटबॅक बसला... पण, पुढे आलेल्या सरकारांनी ही चूक दुरूस्त केली. यापुढे डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशानुसार संघटित होऊन संघर्ष करायला हवा.

शब्दांकन : अतुल पेठकर

बातम्या आणखी आहेत...