Argentina / मालकाच्या प्रतीक्षेत मादी श्वानाने मांडले चक्क पाेलिस ठाण्याबाहेर ठाण

हल्ल्याच्या आरोपात ‘शाएला’च्या मालकास झालीय शिक्षा अन‌् अटक 

दिव्य मराठी

Jun 24,2019 11:12:00 AM IST

ब्युनस आयर्स - अर्जेंटिनात एका निष्ठावान व स्वामिभक्त कुत्र्याने त्याच्या मालकाच्या प्रतीक्षेत गत वर्षभरापासून एका पाेलिस ठाण्याबाहेर ठाण मांडले असून, त्या ठाण्यात त्याच्या मालकास अटक करून काेठडीत ठेवले गेले आहे. मालकाप्रति अशी निष्ठा पाहून आता पाेलिस कर्मचारीही ‘शाएला’ नावाच्या या मादी कुत्र्याचे चाहते बनले आहेत. ते कर्मचारी त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेत असून, अनेकदा त्याला पाेलिस ठाण्यातही झाेपू देतात. ब्युनस आयर्सजवळील टाऊन २५ डी माओच्या या कुत्र्याच्या मालकास गतवर्षी एका हल्ल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. मालकास पाेलिसांच्या वाहनातून ठाण्यात आणले तेव्हा ‘शाएला’देखील त्याच्यामागे आली असावी. तेव्हापासूून ती तेथेच घुटमळत असून, परत जाण्याचे नाव घेत नाहीये, असे पाेलिसांनी सांगितले. ‘शाएला’ची ही स्वामिभक्ती पाहून नागरिक तिला ‘अर्जेंटिनाची हाचिको’ही म्हणत आहेत. कारण जपानच्या टोकियोमधील शिबुआ पाेलिस ठाण्यात १९२० च्या दशकात मालकाची राेज प्रतीक्षा करणारा ‘हाचिको’ नावाचा कुत्रा मालकाचा मृत्यू हाेऊन १० वर्षे झाली तरी ठाण्याबाहेर बसून राहिला हाेता. तसेच त्याच्या मृत्यूनंतर पाेलिस ठाण्याच्या आवारात ‘हाचिकाे’चा पुतळा उभारण्यात आला. असेच एक प्रकरण गतवर्षी चीनमध्येही घडले हाेते. तेथे ‘जियोंगजियाेंग’ नामक कुत्रा मालक कामावर गेल्यानंतर रेल्वेस्थानकावर राेज १२ तास त्याच्या मालकाच्या प्रतीक्षेत बसून राहायचा व मालक आल्यावरच घरी जायचा. अशीच अवस्था ‘शाएला’चीही झाली आहे. याबाबत पाेलिस उपायुक्त जुआन जोस मार्टिनी यांनी सांगितले की, आम्ही मालकास येथे आणले तेव्हापासूनच ‘शाएला’ही त्याच्यामागे आली व त्यानंतर तिला कुठेही गेल्याचे पाहिले नाही. ती पाेलिस वाहनाचा पाठलाग करून येथे आली असावी. वर्षभरापासून येथेच ठाण मांडल्यामुळे ती आम्हा सर्वांची लाडकी बनली आहे. गस्तीवर जाताे तेव्हा आमच्या मागाेमाग येते व जाते. मालकाप्रति निष्ठा पाहून आम्ही तिला अनेकदा ठाण्यातच झाेपू व मालकाशी भेटू देताे, असेही त्यांनी सांगितले.


पाेलिस कर्मचारी म्हणतात- ‘शाएला’ची खूप आठवण येईल
मार्टिनी यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी एका बुलडॉगने ‘शाएला’ वर हल्ला केला हाेता. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिला १५ दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले हाेते. तिच्या उपचारांचा सर्व खर्च पाेलिसांनीच केला. सुदैवाने ती लवकर बरी झाली व त्यानंतर पुन्हा पाेलिस ठाण्याबाहेर येऊन बसली. आम्हाला तिचा खूप लळा लागला आहे. शिक्षा भाेगल्यानंतर मालक तिला घेऊन निघून जाईल तेव्हा आम्हाला तिची खूप आठवण येईल. तथापि, सध्या तरी आम्ही तिची चांगली काळजी घेत आहाेत व मालकाशी भेटही घालून देत आहाेत, याचा आम्हास आनंद आहे, असेही मार्टिनी यांनी सांगितले.

X