आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धीराचे फळ मिळतेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1972 मध्ये मी एनसीसी सीनियर डिव्हिजन छात्र असतानाची गोष्ट. नवी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी शिबिरासाठी निवड होणे छात्र आणि अधिकारी फार प्रतिष्ठेचे मानतात. निवड झालेल्या छात्रांना जून ते डिसेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने खडतर प्रशिक्षण दिले जाते. विविध चाचण्यांतून पथकांची निवड होते. या अग्निदिव्यातून जात असताना कॉलेज शिक्षणाचे तीनतेरा वाजतात. डिसेंबरअखेर पथक नवी दिल्लीकरिता रवाना होते. डिसेंबरमध्ये होणा-या पीएन-आरडीसी शिबिरात छात्राची निवड झाली नाही तर त्याची अवस्था पार ‘न घर का ना घाट का’ अशी होते. दिल्लीला जाणारे ‘कुछ खोने के लिए कुछ पाना पडता है,’ असे मानून कॉलेज शिक्षणाकडे दुर्लक्ष करत दिल्लीला जातात. यात आजही बदल झालेला नाही. 1972 दरम्यान माझी निवड प्री-आरडीसीपर्यंत झाली. शेवटचा प्री-आरडीसी कँप नागपूरला चालू होता, परंतु बॅनेट फायटिंगमध्ये निवड सिलेक्टेड यादीत माझे नाव होते.

बॅनेट फायटिंग म्हणजे दारूगोळा संपल्यानंतर बॅनेट आणि संगीनचा वापर करून शत्रूला भोसकून यमसदनाला धाडणे. यात मी फार त्वेषाने चढाई करत असे. परंतु अंतिम निवड चाचणीत मला डच्चू मिळाला. सात महिन्यांची मेहनत वाया गेली. सैन्य दलात काही संवेदनशील अधिकारीही आहेत. माझी गच्छंती ब-याच अधिका-यांना धक्का देणारी ठरली. कर्नल अरोरा एक संवेदनशील अधिकारी होते. मला म्हणाले, ‘बेटा, नाराज नहीं होना. तूम आरडीसी जरूर हो जाओगे, लेकिन अफसर बनके!’ त्यांचा दृष्टिकोन किती विधायक आणि सकारात्मक होता याचा अनुभव मला 1995 मध्ये आला. प्रजासत्ताक दिनासाठी माझी निवड झाली. महाराष्ट्र संचलनाचे नेतृत्व केले. परंतु माझी छात्र म्हणून असताना हुकलेली संधी मला अधिकारी झाल्यावर मिळाली. ‘सब्र का फल हमेशा मीठा होता है’ हेच खरे! म्हणून माणसाने निराश न होता सतत प्रयत्नशील राहावे.