आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंती आणि तटबंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयदेव डोळे 

ज्या ज्या राजांनी शहरे वसवली, त्यांनी एक तटबंदी त्या त्या शहरांभोवती बांधून टाकली. सुरक्षितता, चोरांची घुसखोरी, जंगली जनावरांचा संचार, शत्रूच्या हल्ल्याची भीती आदी कारणे त्या तटांच्या पायाशी असत. इंग्रजांनी अशा शहरांचे वर्णन ‘वॉल्ड सिटीज’ असे केलेले आहे. औरंगाबाद, अहमदाबाद, अहमदनगर अशा काही शहरांत या तटबंदीचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात. बाकीच्या शहरांची  माहिती नाही, परंतु औरंगाबादची तटबंदी जिथे जिथे आहे तिथे आज गरिबांची, दलितांची वस्ती आहे. जणू गावकुसाबाहेरच्याच त्या वस्त्या. तटाला जिथे दरवाजा असेल त्यालगत त्या उभ्या राहिलेल्या. आज ना त्या लांबलचक भिंती आहेत, ना ते राजे. पण गावकूस आहे, गावकुसाबाहेरचे आहेत. गरिबी आहेच...

अशी एक तटबंदी अमेरिका–मेक्सिको सरहद्दीवर उभी आहे. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी सुरू केलेली व आताचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेली ही भिंत. तिचा हेतू मेक्सिकोतून अमेरिकेत होणारी अमली पदार्थ व माणसे यांची चोरटी वाहतूक थांबवण्याचा होता. पुढे मेक्सिकोतील गरीब, बेकार, गुन्हेगार अमेरिकेच्या आश्रयार्थ येण्याचे प्रमाण वाढले. ट्रम्प यांनी मग ही भिंत आणखी वाढवण्याचे ठरवले. गरीब अमेरिकेत येत. पडेल ती कामे करीत. अमेरिकेचे या स्वस्त, आयातीत, देशांतरित मजुरांनी भलेच केले. गरीब असेच सर्वांचे भले करतात. कष्टाने जगत स्वतःलाही भल्यांच्या दुनियेत दाखल करवून घेतात. गरिबीची लाज त्यांना नसते. आपले भले झाल्यावरही बाकीचे जे गरीब असतात त्यांना मदतीचा, सहानुभूतीचा हात देतात.

अहमदाबादेत कोणाला तरी गरिबाच्या एका वस्तीची भलती लाज वाटली. इतकी की, नकोत हे गरीब डोळ्यापुढे अशी त्यांची चिडचीड झाली. हिटलरची आठवण झाली काहींना. त्याने कसे कित्येकांना दूर हाकलले आणि चक्क स्वर्गीय यमसदनी निवास करण्यास धाडले! इथे भारतात एकदम तसे कसे करता येईलॽ शिल्लक काही पत्रकार, कार्यकर्ते, पक्ष, न्यायाधीश, नागरिक आहेत. त्यांना माणसाबद्दल आदर, प्रेम वाटते. असेनात का गरीब; पण हक्क, अधिकार असतात ना त्यांनाॽ त्यासाठी भांडणारे थोडेच आहेत आता भारतात. त्यांच्या उरल्यासुरल्या धाकाने मग या गरिबांवर चिडलेल्यांनी ही गरिबीच झाकायची ठरवली. डोनाल्ड ट्रम्प यांना गरिबी मुळीच आवडत नाही! पाहायलासुद्धा नाही! त्यांचा ताफा विमानतळावरून स्टेडियमकडे जाताना एके ठिकाणी या गरिबांची वस्ती येते. ती दिसली तर प्रधानसेवक म्हणवून घेणाऱ्याचे अपयश नाही का ठळक दिसणारॽ आपला पराजय झाकून टाकण्याचे कसब अंगी बाणवणाऱ्याला मग एक आयडिया सुचली. ट्रम्प साहेबांपासूनच ती निघाली. संपूर्ण गरीब वस्ती झाकून टाकणारी एक उंच वा लांबलचक भिंत बांधली. झाले! भिंत झटक्यात उभीही राहिली. तिच्यावर घोषणा, मोदी-ट्रम्प यांची चित्रे अन् काय काय छान छान दिसू लागले. ते गरीब रागावले. म्हणू लागले, आमची वाटच बंद केली हो. भिंतीवर खर्च केला खरा, पण तो पैसा आम्हाला दिला असता तर आम्ही नसती का ठाकठीक, रंगरंगोटी व स्वच्छता करवलीॽ गरिबीच ती, पण थोडी झगमगीत अन् आकर्षक.

छे! छे! असे फुकट काही मागू नये, देऊ नये या मताचे प्रधानसेवक आहेत. घराणेशाहीवर त्यांचा फार राग. इथे गरिबीसुद्धा घराण्यातून घराण्यात फिरते, तेही त्यांना आवडत नाही. ते स्वतः नाही का गरीब असायचेॽ गरिबी हटवायची म्हणून तर ते भर संसारातून दूर हिमालयात गेले. अाध्यात्मिक झाले. विरागी  बनले. पुढे मां भारतीने त्यांना बोलावून स्वतःची सेवा करायला बजावले. मग ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झाले. तेच तर आपले प्रधानसेवक. जगातला एक श्रीमंत पाहुणा त्यांच्या गावी येणार म्हणून जरा त्यांनी गरिबांना लपून बसायला सांगितलं तर त्याचा राग का यावाॽ गरीबही हट्टी. मग अहमदाबाद महापालिकेलाच म्हणे या गरिबांची दया आली व तिने या लांबचलांब भिंतीमागे साऱ्या गरीब वस्तीला लपवले. शिवाय ट्रम्पसाहेब गेल्यावर ही भिंत मुळीच पाडली जाणार नाही. त्या भिंतीसमोरून जाणाऱ्या प्रत्येकाला आपला भारत केवढा महान आहे, त्याची अन् श्रीमंत देशाची मैत्री कशी अभंग आहे, याचा केवढा अभिमान वाटत राहील! त्या भिंतीपुढे नुसते उभे ठाकताच राष्ट्रभक्ती, महाशक्ती, विश्वगुरू, प्राचीन वैभव, महासत्ता या शब्दांची आपोआप उजळणी होत राहील. छाती फुगवलेले हजारो अहमदाबादकर मग आपापल्या कामी असे जुंपतील की, २०२४ ला पुन्हा प्रधानसेवकाचे राज्य येईल. बघा, केवढा दूरचा विचार करणारी ही भिंत ठरली! आत्ता अशी छाती फुगण्याची संधी भिंतीपलीकडच्यांच्या हिश्श्याला जाणार नाही हे ओघाने आलेच. फारच वाटले  त्यांना, तर ते आपला देश महासत्ता होण्यासाठी आपले श्रम वेचू शकतात. नाही तरी त्यांना दुसरे काय जमेलॽ त्यांच्या घराकडे पाहून कैक अहमदाबादकर निराशेच्या गर्तेत फेकले जायचे. काहींना भयंकर हताशेचे ॲटॅक्स यायचे. अनेकांना आपली लाज वाटायची. आपलेही असेच होईल का, अशी काहींना भीती वाटायची. पण आता सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकलाय. ही भिंतही आहे अन् तटबंदीही याची खात्री अनेकांना पटलीय. गरिबांपासून आपले संरक्षण करणारी ही योजना गावोगावी राबवावी अशी मागणी मूळ धरू लागल्यास नवल नाही. किती दिवस हा देश गरीब आहे, मागासलेला आहे, विकसनशील आहे हे ऐकत राहायचे बरेॽ गरिबीवर पुस्तक लिहिणारे नोबेल विजेते अर्थशास्त्री दांपत्य अभिजित बॅनर्जी व एस्थर डफ्लो यांनी या भिंतीला आता पाठ टेकून बसावे. गरिबी हटवायचे त्यांचे उपाय चुकले हे त्यांनी मान्य करावे. सोबतीला त्यांनी तमाम डाव्या, पुरोगामी, काँग्रेस नेत्यांनाही या भिंतीपाशी बसवून घ्यावे. त्यांना पाहूनही अहमदाबादकरांना प्रधानसेवकांविषयी अभिमान द्विगुणित होईल...

ता. क. : गरिबी लपवणाऱ्या या भिंतीचा पर्यटनासाठी उपयोग करण्याच्या सूचना येऊ लागल्या आहेत. सेल्फी पॉइंट्स निर्माण करणे, डॉक्युमेंटरीचे चित्रीकरण करणे, भिंतीपुढ्यात कॅटवॉक करणे, फॅशन शो आखणे अशाही कल्पक सूचना येत आहेत.