आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉलमार्ट फ्लिपकार्टमधील भागीदारी विकण्याची शक्यता 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नव्या नियमांमुळे वॉलमार्ट आणि अमेझाॅनसारख्या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. वॉल स्ट्रीट दिग्गज मॉर्गन स्टॅनलीनुसार नव्या नियमांमुळे अमेरिकी रिटेल कंपनी वॉलमार्ट फ्लिपकार्टमधील नुकतीच घेतलेली भागीदारी विक्री करून, ज्याप्रमाणे अमेझॉनने २०१७ च्या अखेरीस चीन सोडले होते, त्याचप्रमाणे बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

 

नवीन नियमांमुळे भारतातील ई-कॉमर्स क्षेत्र अत्यंत किचकट झाले असल्याचे मत ब्रोकरेज संस्थेच्या वतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिकेतील दिग्गज रिटेल कंपनी वॉलमार्ट बाहेर निघण्याची शक्यता वाढली आहे. वॉलमार्टने काही महिन्यांपूर्वी मे २०१८ मध्ये भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये ७७ टक्के भागीदारी १,६०० कोटी डॉलर (सुमारे १.०७ लाख कोटी रुपये) मध्ये खरेदी केली होती. मॉर्गन स्टॅनलीने हा अहवाल भारतात ई-कॉमर्स क्षेत्रात नवीन एफडीआय नियम लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जारी केला आहे. यानुसार नवीन नियमांतर्गत फ्लिपकार्टला त्यांच्या वेबसाइटवर सुमारे २५ टक्के उत्पादने काढावी लागणार आहेत. यामध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचाही समावेश असून या वस्तूंची या कंपनीच्या एकूण विक्रीत मोठा वाटा आहे. पुरवठा चेन आणि एक्सक्लुझिव्ह डील्ससंदर्भत नियमांमध्ये बदल झाल्याने स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक श्रेणीवर याचा तेजीने आणि मोठा परिणाम होईल. या अहवालानुसार फ्लिपकार्टचा ५० टक्के महसूल याच श्रेणीच्या वस्तूमधून येतो.
 
एफडीआय असलेल्या कंपन्या एक्सक्लुझिव्ह विक्री करू शकत नाहीत 
अमेझॉन-फ्लिपकार्टची विक्री २५-३० % घटली 

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट भारतात दोन सर्वात मोठे ऑनलाइन मार्केटप्लेस आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन नियम लागू झाल्यानंतर त्यांच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. अनेक उत्पादने सध्या कंपनी त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध नसल्याचे दाखवत आहे. विशेष म्हणजे अमेझॉनला त्यांचे दोन टॉप सेलर्स - क्लाउडटेल आणि एपॅरिओला काढून टाकावे लागले आहे, कारण या उत्पादनामध्ये अमेझॉनची भागीदारी होती. 

 

एक फेब्रुवारीपासून लागू झाले नवे नियम 
भारत सरकारने हे नियम २६ डिसेंबर रोजी जारी केले होते. एक फेब्रुवारीपासून ते लागू झाले. त्यानुसार एफडीआय असलेल्या ई-कॉमर्स कंपन्या मार्केटप्लेसवर त्यांची स्वत:ची गुंतवणूक असलेल्या वस्तूंची विक्री करू शकणार नाहीत. याव्यतिरिक्त यावर एक्सक्लुझिव्ह विक्रीसाठी करार करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोणताही विक्रेता त्याच मार्केटप्लेसच्या समूह कंपनीकडून २५ टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादनाची खरेदी करू शकणार नाही. 

 

किराणा वस्तूंची विक्री बंद करू नये, ग्राहकांची विनंती 
नवीन नियम लागू झाल्यानंतर अमेझॉनने त्यांच्या वेबसाइटवरून किराणा वस्तूंची विक्री एक फेब्रुवारीपासून बंद केली आहे. मात्र, सोशल मीडियावर भारतीय ग्राहकांनी अमेझॉनला ही सेवा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. याच्या उत्तरात अमेझॉनने एक ट्विट करून स्थिती समजून घेण्यासाठी ग्राहकांचे आभार मानले आहेत. मात्र, सध्या या वस्तू अमेझॉनच्या वेबसाइटवर उपलब्ध नसल्याचे सांगत अधिक माहितीसाठी सोबत राहण्याची विनंती केली आहे. 

 

वॉलमार्टला १० वर्षांत ई-कॉमर्सची भागीदारी सहापट वाढण्याची अपेक्षा 
भारतात नवीन नियम लागू झाल्यानंतरही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्राबाबत वॉलमार्टने सकारात्मक मत व्यक्त केले आहे. देशाच्या रिटेल क्षेत्रात ई-कॉमर्सची भागीदारी पुढील १० वर्षांत सहापट वाढणार असल्याचे अपेक्षा वॉलमार्टने व्यक्त केली आहे. वॉलमार्ट इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ कृश अय्यर यांनी हे मत व्यक्त केले आहे. अय्यर इंडिया फूड फोरमचे अध्यक्षही आहेत. ते मंगळवारी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी सांगितले की, भारताच्या रिटेल क्षेत्रात ई-कॉमर्स भागीदारी सध्या दोन टक्के आहे. २०१९ पर्यंत ही भागीदारी वाढून १२ टक्क्यांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. पुढील १० वर्षे देश ९ टक्क्यांच्या दराने विकास साध्य करणार आहे. त्याचबरोबर देशाचा जीडीपी ६.३ लाख कोटी डॉलर (सुमारे ४५२ लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 

- कृश अय्यर 
 

बातम्या आणखी आहेत...