E-Commerce / देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्याने वॉलमार्टला फोन-पेच्या स्वरूपात सुमारे ६८,००० कोटींची लॉटरी

फ्लिपकार्ट सोडून तीन मित्रांनी डिसेंबर २०१५ मध्ये सुरू केली होती फोन-पे कंपनी

वृत्तसंस्था

Jul 11,2019 10:09:00 AM IST

नवी दिल्ली - मागील वर्षी वाॅलमार्टने भारतातील सर्वात माेठी ई-कॉमर्स कंपनी १६ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती. या करारात त्यांना मिळालेल्या पेमेंट कंपनी फोन-पेकडे त्या वेळी कोणाचेही लक्ष गेले नाही. मात्र, आज फोन-पे देशातील प्रमुख स्टार्टअप कंपन्यांच्या यादीतील प्रभावशाली कंपनी ठरली आहे. हे वॉलमार्टचे सर्वात मोठे अधिग्रहण होते.


फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने अलीकडेच फोन-पेला नवीन कंपनीमध्ये रूपांतरित करण्यात आणि सुमारे ६,८०० कोटी रुपये जमवण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, यानंतर फोन-पेचे मूल्य सुमारे ६८,००० कोटी रुपये होईल. त्यांच्यानुसार पुढील एक ते दोन महिन्यांत करार होण्याची शक्यता आहे. फोन-पे देशातील डिजिटल पेमेंट क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे.
मागील काही दिवसांत ग्राहकांनी पैसे पाठवणे आणि व्यापाराच्या दृष्टीने या डिजिटल प्लॅटफॉर्मचा जास्त वापर करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षात कंपनीच्या मूल्यात तसेच व्यवहारात चारपट वाढ झाली आहे. फोन-पेला पेटीएमशी स्पर्धा करायची आहे.

एका वर्षाच्या आत फोन-पेची विक्री

फ्लिपकार्ट सोडून तीन मित्रांनी मिळून डिसेंबर २०१५ मध्ये फोन-पेची सुरुवात केली होती. ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंगची सुविधा देण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटचे महत्त्व समजून फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी एका वर्षाच्या आतच फोन-पे खरेदी केले.

फ्लिपकार्टच्या विक्रीत फोन-पे मूल्याकडे दुर्लक्ष

वॉलमार्टला फोन-पे फ्लिपकार्टच्या करारात मिळालेली आहे. ही कंपनी इतक्या लवकर प्रगती करेल आणि देशातील प्रमुख डिजिटल पेमेंट कंपनी ठरेल, याचा अंदाज कोणालाच नव्हता. आता ही कंपनी देशातील प्रमुख डिजिटल पेमेंट कंपनी बनली आहे.

जूनपर्यंत २९ कोटी ग्राहकांपर्यंत फोन-पेची पोहोच
कंपनीनुसार या वर्षी जूनमध्ये २९ कोटी लोकांपर्यंत फोन-पे पोहोचले होते. एकूण देवाणघेवाण सुमारे ८५ अब्ज डॉलरची राहिली. वास्तविक वर्षभरापूर्वी कंपनीकडे ७.१ कोटी ग्राहक होते आणि एकूण व्यवहार २२ अब्ज डॉलरचा होता. कंपनीने अलीकडेच म्युच्युअल फंड, चित्रपटाचे तिकीट आणि विमानाचे तिकीट बुकिंग सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याव्यतिरिक्त फोन-पेने अामिर खानला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात मोठी वाढ

क्रेडिट सुइसच्या एका अहवालानुसार २०२३ पर्यंत देशातील डिजिटल पेमेंट बाजाराचा आकार वाढून एक ट्रिलियन डॉलर होण्याची शक्यता आहे. सध्या हा बाजार २०० अब्ज डॉलरचा आहे. डिजिटल पेमेंट बाजारात सध्या पेटीएम ही कंपनी सर्वात पुढे आहे. फोन-पेव्यतिरिक्त मोबीक्विक, अमेझॉन-पे, गुगल-पे, पेपल अणि रेझर-पे इतर प्रमुख कंपन्या आहेत.

X
COMMENT