Wall-mart / लाचखाेरी प्रकरण बंद करण्यासाठी अमेरिकी कंपनी वॉलमार्ट देणार १,९७४ काेटी रुपये

भारत, चीन, मेक्सिको आणि ब्राझीलमध्ये अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आराेप
 

वृत्तसंस्था

Jun 22,2019 11:15:00 AM IST

वाॅशिंग्टन - विदेशात लाच देण्याची प्रकरणे बंद करण्यासाठी अमेरिकी रिटेल कंपनी वॉलमार्ट २८.२ काेटी डॉलर (सुमारे १,९७४ काेटी रुपये) भरण्यास तयार झाली आहे. कंपनी ही रक्कम अमेरिकी बाजार नियामकाला देणार आहे. वाॅलमार्टवर भारत, चीन, मेक्सिकाे आणि ब्राझीलमध्ये व्यवसाय चालवण्यासाठी अमेरिकी भ्रष्टाचारविराेधी नियमांचे उल्लंघन करून तेथील अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आराेप आहे. “अमेरिकी सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशन’ (एसईसी) नुसार, नियमांचे उल्लंघन वॉलमार्टच्या मध्यस्थाने केले आहे. मध्यस्थाने मंजुरी न घेताच दुसऱ्या देशातील सरकारी अधिकाऱ्यांना पैसे दिले आहेत. यामध्ये त्याने “फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट’ (एफसीपीए)च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. एसईसीच्या एफसीपीए विभागाच्या अंमलबजावणी विभागाचे प्रमुख चार्ल्स कॅन यांनी ही माहिती दिली.


त्यांनी सांगितले की, वाॅलमार्टने आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यात नियमांचे पालन करण्याला जास्त महत्त्व दिले आहे. एसईसीने वॉलमार्टवर एफसीपीए नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता. त्यानुसार कंपनी १० वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत भ्रष्टाचारविरोधी अनुपालन कार्यक्रम लागू करण्यात अपयशी ठरली आहे. यादरम्यान कंपनीने आंतरराष्ट्रीय पातळीवर तेजीने व्यावसायिक विस्तार केला आहे.

एसईसीने सांगितले की, वॉलमार्ट या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी १४.४ कोटी डॉलर (सुमारे १,००८ कोटी रुपये) आणि गुन्हेगारी खटला बंद करण्यासाठी सुमारे १३.८ कोटी डॉलर (सुमारे ९६६ कोटी रुपये) देण्यास तयार झाली आहे. याप्रमाणे एकूण रक्कम २८ कोटी डॉलर (सुमारे १,९७४ कोटी रुपये) होईल.

X
COMMENT