आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज ते हर्सूलपर्यंत चोरट्यांचा धुमाकूळ; परिसरात दहशतीचे वातावरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- वाळूजपासून ते थेट हर्सूलपर्यंत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाळूज महानगरात मंगळवारी रात्री रांजणगाव येथे सहा दुकाने फोडण्यात आली, तर बजाजनगरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या. त्याप्रमाणे क्रांती चौक, सिडको, मुकुंदवाडी ते थेट हर्सूलपर्यंत विविध ठिकाणी चोरीच्या ३, तर घरफोडीच्या २ घटना घडल्या. दिवाळी सुटीत गावाला गेलेल्या कुटुंबांची घरे फाेडली, तर कुठे घरात कुटुंब असताना हजारो रुपयांचे मोबाइल घरात घुसून चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. 

 

क्रांती चौकात घरफोडी 
क्रांती चौक परिसरातील शक्तिनगरमध्ये राहणाऱ्या सुधाकर महादेव कुलकर्णी (७१) हे २० नोव्हेंबर रोजी मुलाला भेटण्यासाठी गावाला गेले होते. यादरम्यान चोरांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यात त्यांनी २० हजार रुपये रोख रक्कम व ५ हजार रुपयांच्या चांदीच्या वाट्या चोरून नेल्या. क्रांती चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मोबाइल चोरट्यांचा उच्छाद 

ज्ञानेश्वर मच्छिंद्रनाथ डांगे (४१, रा. मुकुंदवाडी) यांच्या घराचा २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबवला. दुसऱ्या घटनेत रणजित रतन शिंदे (२३, अंबिकानगर ) याचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाइल १८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चोरट्याने लंपास केला. तिसऱ्या घटनेत सिडकोतील रहिवासी प्रभाकर भाऊसाहेब मुठ्ठे (३५) यांचा मोबाइल चोरट्याने टीव्ही सेंटर येथील प्रभा इलेक्ट्रॉनिक्स येथून चोरून नेला. यासह विशाल रामकिसन मोहिते (२०, रा. बायजीपुरा) यांचा शिवशंकर कॉलनीतील शंकर चेस्ट हॉस्पिटलमध्ये असताना मोबाइल चोरीला गेला. 

 

कडी उघडून लॅपटॉप, कॅमेरा लंपास 
सिडको टाऊन सेंटरमधील हार्मोनी अपार्टमेंटमध्ये राहणारा महाविद्यालयीन तरुण निखिल सृजी तिप्पर्ती ( २२) घरात झोपलेले असताना २० नोव्हेंबर रोजी निखिलचा मित्र सकाळी सात वाजता दूध आणण्यासाठी दरवाजाला बाहेरून कडी लावून गेला होता. त्या वेळी चोरांनी कडी उघडून घरात प्रवेश केला व १५ हजारांचा लॅपटॉप, तीस हजार रुपयांचे मोबाइल व कॅनॉन चा डीएसएलआर कॅमेरा असा एेकून ५० हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेले. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

रांजणगावात ६ दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी ऐवज लंपास केला.

चोरट्यांची दहशत ६२ हजारांची रोख रक्कम अन् ५ ते ७ तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला 
रांजणगावात एक, वाळूजमध्ये दोन मेडिकल शॉप फोडल्याच्या घटनेला अवघे दोन दिवस होत नाहीत तोच पुन्हा भुरट्या चोरट्यांनी सक्रिय होत सलग चौथ्या दिवशी रांजणगाव शेणपुंजी येथे तब्बल सहा दुकानांचे शटर उचकटून आतील एकूण रोख ४८ हजार रुपयांची रक्कम व किरकोळ ऐवज लंपास केला, तर बजाजनगरातील दोन घरांचा कडी-कोंडा तोडून १४ हजार रुपये रोख रकमेसह ५ ते ७ तोळे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी तब्बल सहा दुकाने व दोन घरे फोडल्याने औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर फाट्यालगत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या कॉम्प्लेक्समधील दोन मोबाइल शॉपींचे शटर उचकटून आत प्रवेश करत एका मोबाइल शॉपीमधील रोख २५ हजार रुपये, फुटवेअर व इलेक्ट्रिकल्स दुकानातून चोरट्यांच्या काहीच हाती न लागल्याने त्यांनी पुढे आपला मोर्चा शहीद भगतसिंग शाळेसमोर असणाऱ्या ज्वेलर्स दुकानाकडे वळवला. दुकानाचे शटर उचकटून आतील रोख ५ हजार रुपये ६ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या अंगठ्या, ७ हजार रुपयांचे चांदीचे पैंजण आदी ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी श्री संत सावतानगरातील एका मेडिकल शॉपचे शटर उचकटून आतील रोख ५ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

बजाजनगरातील दोन घरांवर डल्ला : बजाजनगर येथील कृष्ण कमल हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या विष्णू शेषराव मोरे यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून कपाटातील रोख १४ हजार रुपये व अंदाजे ५ ते ७ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याच सोसायटीतील विजय गव्हाणकर यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी आतील ऐवज लंपास केला. मात्र, अद्याप गव्हाणकर गावाहून परत न आल्याने त्यांची किती रक्कम व ऐवज चोरीला गेला याबाबत कळू शकले नाही. विशेष म्हणजे दोन्ही भाडेकरू रहिवासी १९ नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, २० नोव्हेंबर रोजीच सायंकाळी गव्हाणकर यांच्या घरी चोरी झाल्याने रहिवासी नागरिकांच्या निदर्शनास येऊनही त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली नव्हती. दरम्यान, २१ नोव्हेंबर रोजी गावाहून परतलेल्या मोरे यांनी कुलूप उघडण्यासाठी पडदा बाजूला करताच कुलूप तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून दोन्ही घटना दोन दिवसांपूर्वीच घडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त होत आहे.

 

वाळूज औद्योगिक परिसरात-भुरट्या चोरट्यांचा हैदोस सुरूच 

रांजणगाव ग्रामपंचायतने चौका-चौकांत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची या वेळी वाळूज एमआयडीसी पोलिसांना मोठी मदत झाली. परिसरातील मंदिरांवर व इतरत्र ठिकाणी चौकांमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दोन संशयित आरोपी तोंड पूर्णपणे बांधून दुचाकीवरून परिसरात फिरत असल्याचे आढळून आले आहे. याच फुटेजच्या आधारे चोरट्यांपर्यंत पोहोचत त्यांच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

 

रांजणगावात ६ दुकाने फोडली, बजाजनगर, क्रांती चौक, हर्सूलमध्येही घरफोड्या, सिडकोत घरात घुसून इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास 

हर्सूलमध्येही घरफोडी अन्य एका घटनेत हर्सूल परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेचे घर फोडण्यात आले. तक्रारदार महिला कन्नडला माहेरी गेली असताना चोरांनी आधी गेटचे ग्रील तोडले, त्यानंतर दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाट फोडले. त्यातून त्यांनी सोन्याचा एक तोळ्याचा हार, चांदीचे पैंजण, घराच्या रजिस्ट्रीची महत्त्वाची कागदपत्रे चोरांनी चोरून नेली. १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडला. हर्सूल पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...