आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वामन हरी पेठे ज्वेलर्स घोटाळा : आईसाठी मंगळसूत्र खरेदी करून जैनने केली सोने चोरीला सुरुवात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सन २०१७ मध्ये आईसाठी एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र खरेदी करून राजेंद्र किसनलाल जैन याने वामन हरी पेठे ज्वेलर्समधील आपल्या चोरीची सुरूवात केली होती.  फ्लोअर मॅनेजर अंकुर राणेला हाताशी धरून नंतर त्याने सन २०१७ ते डिसेंबर १८ या दोन वर्षांच्या कालावधीत २७ कोटी ३१ लाखांचे एकूण ५८ किलो सोने हळूहळू लंपास केले. हा घोटाळा आता ६५ किलोवर जाण्याची शक्यता असून चोरलेले सोने फायनान्स कंपनीत तारण ठेवून कर्ज उचलले. यावर त्याने व्याजबट्ट्याचाही जोडधंदा सुरू केला होता. शिवाय तीन स्वतंत्र फर्म स्थापन करून या फर्मच्या नावाचे स्टिकर्स तो वामन हरी पेठेतून चोरलेल्या सोन्याच्या डब्यांवर लावत असे. या डब्या, स्टिकर्स, फर्मची कागदपत्रे व इतर व्यवहारासंदर्भातील दस्तऐवज तो कारमध्ये ठेवून ही गाडी सिद्धार्थ उद्यानाजवळील पार्किंगमध्ये उभी करत असे, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 

 


शहराच्या सराफा इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर राजेंद्र जैन, त्याचा कॉलेजकुमार भाचा लोकेश आणि पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे या तिघांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या तिघेही पोलिस कोठडीत आहेत. त्यांना पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच जैन पोपटाप्रमाणे आपले एक-एक कारनामे सांगत अाहे. तो म्हणाला, २०१७ मध्ये प्रथम समर्थनगरातील पेठे ज्वेलर्समधून आईसाठी एक तोळ्याचे (१० ग्रॅम) मंगळसूत्र खरेदी केले. त्यानंतर थोडे थोडे सोने विकत घेऊन त्याने फ्लोअर मॅनेजर राणेला आपल्या कह्यात घेतले होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याने पहिल्यांदा सर्वाधिक पाच किलो सोने एकदाच मागितले आणि त्यानंतर तो हिशेब तब्बल ५८ किलोपर्यंत गेला. प्राथमिक तपासात आता ५८ किलो सोने ६५ किलोच्या घरात गेले आहे. यात सुरुवातीला सोने विक्रीतून आलेल्या पैशांमधून त्याने राणेला २५ टक्के वाटा देण्याचे आमिष दाखवले. नंतर मार्केटिंग करून तुला व्यवसाय वाढवून देतो, मीसुद्धा व्यापार करतो, असे म्हणून त्याने राणेला भुलवले. 


जैन याने चोरलेल्या सोन्यासोबतच पेठे ज्वेलर्सच्या दागिन्यांचे डबेही जपून ठेवले होते. शिवाय कोट्यवधींचे कर्ज घेऊन त्याने दोन फ्लॅट आणि तीन कार विकत घेतल्या होत्या. त्या कार   पोलिसांनी जप्त केल्या. यातील एक कार जैन नेहमी सिद्धार्थ उद्यानाजवळील पार्किंगमध्ये उभी करायचा. ही कार म्हणजेच त्याचे कार्यालय होते. त्यात तीन फर्मच्या नावाने असलेली कागदपत्रे, स्टॅम्प, दागिन्यांच्या रिकाम्या डब्या असे साहित्य असलेल्या चार बॅगा तो त्यातच ठेवत होता. इतर दोन कार तो समर्थनगरमधील अपार्टमेंटमध्ये उभ्या करत होता. पोलिसांनी त्याच्या सर्व बॅगा जप्त केल्या आहेत. त्यात   पेठे ज्वेलर्सच्या दागिन्यांच्या रिकाम्या डब्याही सापडल्या. विशेष म्हणजे सर्व डब्यांवर त्याने तीनपैकी एका फर्मचे स्टिकर चिकटवले आहे. त्याचे यातून नियोजन काय होते, असे स्टिकर लावून तो यातून काय व्यवसाय करणार होता, याचा पोलिस तपास करत आहेत.


वाळू तस्करीचाही व्यवसाय : मूळ राजस्थानचे असलेल्या जैन कुटुंबातील राजेंद्रचे वडील शिरपूरला स्थायिक झाले. ३९ वर्षीय राजेंद्रचा जन्म तेथेच झाला. २००१ ते २००५ दरम्यान राजेंद्र कुटुंबासह नाशिकमध्ये स्थायिक झाला होता. तेथे त्याने वाळू तस्करी व्यवसाय सुरू केला होता. एका वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीमागे तो एक ते दीड हजार रुपये कमावायचा, परंतु त्यात काही अडचणी सुरू झाल्याने तो नंतर औरंगाबादमध्ये स्थायिक झाला. तेथून त्याने साडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.  


प्रकरण मिटेल, राणेचा फाजील विश्वास : राणे व जैनला कोट्यवधींचा घोटाळा करूनदेखील अजूनही प्रकरण मिटेल, असा विश्वास आहे. आमची चर्चा झाली आहे, आम्ही सर्व प्रकरण मिटवू, असा विश्वास तो सतत व्यक्त करत आहे. त्यावर पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व जणांना त्याचा फाजील आत्मविश्वास पाहून नवल वाटले.
 

 

तीन नावे, तीन कंपन्या
जैन याने चोरलेल्या सोन्याच्या पैशांतून बी. अँड बी. ज्वेलर्स, आनंद गारमेंट आणि यक्ष कलेक्शन या नावाने तीन फर्म स्थापन केल्या होत्या. बालाजीनगरमधील त्याच्या फ्लॅटमधून तो आणि त्याची पत्नी साड्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्या व्यवसायातून पाच हजारांच्या खरेदीवर १० ग्रॅम चांदीचा शिक्का भेट म्हणून देऊन तो आपला साडी विक्रीचा व्यवसायही वाढवण्याचा विचार करत होता. सोने तारण ठेवून कर्जातून आलेल्या पैशांतून चांदी विकत घेऊन यात टाकणार असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

दागिने शासकीय कोषागारात 
शुक्रवारी जप्त मणप्पुरम् मधून पोलिसांनी जप्त केलेले २१ किलो पेठेचे दागिने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोषागारात  ठेवण्यात आले. तपास पूर्ण होईपर्यंत ते तेथेच ठेवण्यात येणार असून सोमवार पासून पुन्हा तीन फायनान्स कंपनी मध्ये जप्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

तपासासाठी विशेष पथकाची स्थापना
वामन हरी पेठे ज्वेलर्समधील घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून  तपासासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे उपआयुक्त निकेश खाटमोडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन (एसआयटी) करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांच्या सह गुन्हे शाखेचे अमोल देशमुख यांचा पथकात समावेश करण्यात आला आहे. 

 

खंडणीचे ३५ गुन्हे दाखल असलेल्या गुंडाला पैसे पाठवले
जैन याने त्याच्या फ्लॅटवर एका खंडणीबहाद्दर गुंडाच्या नावाची नेमप्लेट लावली होती. तो त्याच्या संपर्कात असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. त्याशिवाय त्याने त्या गुंडाला बँकेतून पैसे पाठवल्याचे समोर आले आहे. या गुंडावर आतापर्यंत खंडणीचे ३५ गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याची सखोल चौकशी लावली होती. 

 

मॅनेजरच्या सॅलरी स्लीपही जैन जवळच
राणेच्या पगाराच्या पावत्याही जैन स्वत:कडे ठेवून घेत होता. साडी विक्री, पेठे ज्वेलर्समधून सोने चोरी यासोबतच सोने तारण ठेवून उचललेल्या पैशांतून त्याने व्याजाचा धंदाही सुरू केला होता.