आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात १० जागांवर आघाडीला ‘वंचित’चा फटका; अशाेक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांच्या पराभवास लावला ‘हातभार’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रातील सुमारे १० लाेकसभा मतदारसंघांत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पराभवास अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरल्याचे चित्र मतदानाच्या आकडेवारीवरून समाेर आले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या या आराेपाचे प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी डाॅ. अंजली मायदेव खंडन मात्र करतात.  ‘आम्हाला कोणाच्याही पाडापाडीचे राजकारण करायचे नाही, तर वंचितांचे हक्क राजकारणाच्या ऐरणीवर आणण्याचे राजकारण करायचे आहे, त्यामुळे बाळासाहेबांच्या दोन्ही जागा गेल्या असल्या तरी त्या मूळ उद्देशात वंचित बहुजन आघाडीस यश आले,’ असे त्या म्हणाल्या. २५ मार्च रोजी स्थापन झालेल्या या पक्षाला ७.२ टक्के मतेे मिळणे हाच मोठा विजय असल्याचे त्या म्हणाल्या. आजवर राज्यात आंबेडकरी पक्षांना कमाल ३.४ टक्केच मते मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

 

नांदेड, परभणी, हातकणंगले, सांगली, अकाेला, साेलापूर यासह सुमारे १० मतदारसंघांत ‘वंचित’च्या उमेदवारांनी लाखावर मते घेतल्यामुळे येथील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाला सामाेरे जावे लागल्याचा निष्कर्ष राजकीय तज्ज्ञांकडून काढला जात आहे, तर आैरंगाबादेत शिवसेनेचे चार टर्म खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करत ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील यांनी वंचित आघाडीला पहिला खासदार दिला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत याच पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित आघाडीला हातमिळवणीचा प्रस्ताव देऊन चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे.


पडळकर आंबेडकरांना भारी
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकाेला व साेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली, दाेन्ही ठिकाणांहून ते पराभूत झाले. त्यांना अनुक्रमे २ लाख ७७ हजार व १ लाख ६८ हजार मते पडली, तर ‘वंचित’चे सांगलीतील उमेदवार गाेपीचंद पडळकर यांना २ लाख ९३ हजार मते प्राप्त झाली. वंचित आघाडीच्या पराभूत सर्व उमेदवारांमध्ये पडळकर सर्वाधिक मते मिळवणारे एकमेव उमेदवार ठरले.

बातम्या आणखी आहेत...