Home | Magazine | Madhurima | Wandana Dhaneshwar's article on election

निवडणुकांनंतर ‘वहिनी’कुठे गायब होतात?

वंदना धनेश्वर | Update - Apr 16, 2019, 11:57 AM IST

महिला कार्यकर्तीच्या क्षमतेवर विश्वास दाखवून किती पक्ष त्यांना पदं, जबाबदाऱ्या आणि संधी देतात?

 • Wandana Dhaneshwar's article on election

  घराणेशाहीमुळं बॅनरवर चमकणाऱ्या ताई-माई-अक्का म्हणजे राजकारणातल्या महिला का? प्रचारात दिवसरात्र एक करणारी सामान्य कार्यकर्ती या धबडग्यात नक्की कुठंय ? जिच्या मदतीच्या जोरावर पक्ष जागा जिंकतो ती कार्यकर्ती निकालानंतर कुठे गायब होते? महिला कार्यकर्त्याचं महत्त्व प्रचारातल्या पायपिटीपुरतंच का? सामान्य महिला कार्यकर्तीच्या क्षमतेवर विश्वास दाखवून किती पक्ष त्यांना पदं, जबाबदाऱ्या आणि संधी देतात? - वंदना धनेश्वर, औरंगाबाद


  2009 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरचा प्रसंग. ठिकाण, राष्ट्रीय पक्षाच्या औरंगाबादेतील उमेदवाराचं संपर्क कार्यालय. उमेदवाराच्या विजयाचे हारतुरे पार पडलेले. कार्यालयाच्या गेटवर अल्पसंख्याक महिला आघाडी सांभाळणाऱ्या‘भाभी’ वॉर्डातल्या महिलांसोबत उमेदवाराच्या भेटीच्या प्रतीक्षेत. मात्र कार्यालयाच्या गेटवरच त्यांना थांबवण्यात येतं. भेटीसंदर्भात उमेदवारापर्यंत निरोप पाठवला जातो. मात्र विजयाच्या धुंदीत ‘भाभींना’ भेट नाकारली जाते. कार्यालयाची वेटिंग रूम तर दूरच, यांच्यासाठी गेटही न उघडण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या जातात. ‘भाभी’ आणि महिला आल्या पावली परत. इतक्या वर्षांनंतरही हा ‘ऑँखों देखा’ प्रसंग तपशिलासह सांगण्याचं कारण परिस्थितीत आजही विशेष बदल नाही.याच ‘भाभी’नं उत्तम नेतृत्व, प्रभावी जनसंपर्क, सभाधीटपणा, कामाचा उरक दाख‌वत एकेकाळी महानगरपालिका गाजवली होती. अल्पसंख्याक समाजातल्या महिलांना मतदानासाठी घराबाहेर काढल होतं. मात्र या मेहनती कार्यकर्तीचा पक्षानं, पक्षातल्या इतरांनी केवळ मतांपुरता उपयोग करून घेतला. ‘भाभी’आजही पक्षनिष्ठ आहेत. मात्र डावललं गेल्याची जखम खपली नाही धरू शकली. आजही स्थितीत फार बदल नाही हे ‘भाभी’ खेदानं मान्य करतात. हे एक प्रातिनिधिक उदाहरण. प्रत्येक पक्षात अशा वहिनी आहेत.‘प्रचार काळात वहिनी वहिनी करत मागे-पुढे करणारे नेते - कार्यकर्ते निकालानंतर ढुंकूनही पाहत नाहीत. पक्षांर्तगत जबाबदाऱ्या, पदं मिळणं तर दूरच. पक्षासाठी आम्हीही मेहनत घेतो. पण संधी देताना आमचा विचारच होत नाही’ औरंगाबादेतल्या पक्षकार्यकर्तीनं नाझियानं ( बदललेले नाव) नाव न छापण्याच्या अटीवर तिची कैफियत मांडली. ‘प्रचारावेळी फक्त पत्रकं वाटणं, घराघरातून बायकांशी संवाद अशीच कामं सोपवतात. नाझिया तिचा मनस्ताप व्यक्त करून गेली. पक्षात होणारी कुचंबणा, घुसमट महिला उघडपणे व्यक्तही करू शकत नाही. परिस्थिती, मानसिकता बदललेली नाही, यासाठी नाझियाचं उदाहरण पुरेसं ठरावं.


  घराकडे दुर्लक्ष होते ही खंत

  सुनीता सावरकर, स्वाभिमान पक्षात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. सकाळी अकराला प्रचाराला सुरुवात होते. मध्यरात्री दोन-तीन वाजतात घरी येण्यासाठी. पतीही सक्रिय कार्यकर्ते असल्यानं दोघांचाही दिवस पहाटे पाचला सुरू होतो. मोठ्या मुलाने दहावीची नुकतीच परीक्षा दिली, तर छोटा आठव्या वर्गात असून त्याची सध्या परीक्षा सुरू आहे. मुलाची दहावी असतानाही प्रचारामुळे त्याच्याकडे लक्ष देता आले नाही. दोन्ही मुले स्वत:चे काम स्वत:च करतात. त्यांचा अभ्यास घेता येत नाही. दिवसभर प्रचारात असल्याने घराकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत आहे. प्रचारकार्यासाठी वेळेवर निघायचे असल्याने घरातील आवरासावर, मुलांचे, कुटुंबीयांची करताना दमछाक होते.- जयश्री देशमुख, अमरावती


  कुटूंबीयांवर घरदार सोपवलंय
  शशिकला मेंगडे या भाजपच्या ३० वर्षांपासूनच्या कार्यकर्त्या. महिला कार्यकर्त्यांचे काम सकाळी सात ते रात्री नऊ, असे पूर्णवेळ सुरू आहे. पदयात्रेची पूर्वतयारी, वेळापत्रक करणे, कोपरा सभांचे नियोजन, घरोघरचे संपर्क, पत्रके वाटणे, उमेदवारांचे परिचयपत्र पोचवणे, अशी कामांची साखळी आहे. महिला कार्यकर्त्या जमेल तेवढे घरचे काम उरकून येतात. पण तरीही दिवसभर त्यांना बाहेर राहणे क्रमप्राप्त असल्याने बहुसंख्य भगिनींनी निवडणुकीच्या काळात घरदार त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले आहे. मुलांच्या परीक्षा आता संपल्यात. त्यामुळे मुलेही उत्साहाने आईच्या मदतीला येत आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य असल्याने हे सारे जमू शकते.- जयश्री बोकील, पुणे


  पोस्टाच्या कमिशनवर राजकारणाचा, खर्च
  मध्यमवर्गीय कुटुंबातील, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अंजली ( नाव बदलले आहे) गेल्या तीस वर्षांपासून पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो वा महापालिका ते लोकसभा या स्तरावरील कोणतीही निवडणूक, सकाळी दहाच्या ठोक्याला घर सोडून पक्षाच्या कामाला बाहेर पडायचं हा त्यांचा परिपाठ. ऊनवारापाऊस असो, सणवार असोत वा दुखणीखुपणी, त्यात खंड पडला नाही. या वेळीही महिला आघाडीच्या वतीने त्यांच्या प्रत्येक मंडलातील महिलांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. अंजलीताई प्रचार करीत असलेली ही विसावी निवडणूक. पण त्यांचा उत्साहाचा झंझावात तेवढाच आहे. पतीच्या तुटपुंज्या पगारावर आपल्या राजकीय कामाचा भार नको म्हणून त्या पोस्टाची कामे करतात. त्यातून येणाऱ्या कमिशनवर राजकीय पक्षासाठी होणारा प्रवासाचा, मोबाइलचा खर्च करतात. त्या सांगतात, निवडणूक असो वा नसो, दहाच्या ठोक्याला घरातील काम आ‌वरायचं आणि पक्षाच्या कामासाठी बाहेर पडायचं अशी सवयच लागलीए. त्या पक्षातील सर्वात जुन्या-जाणत्या कार्यकर्त्या. तरीही स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी शेवटपर्यंत चर्चेत असलेले त्यांचे नाव आयत्या वेळी कापले गेले तेव्हा त्यांना दु:ख झालेच. त्या म्हणतात, ‘मला पक्षाने पद दिले नाही असे नाही, अनेक वर्षे मी उपाध्यक्ष होते, महिला आघाडीची अध्यक्ष होते. पण महिलांना दिली जाणारी ही पदे दुय्यमच.’- दीप्ती राऊत, नाशिक

Trending