Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Warkari training institute riot case: Maharaja arrested ; Restrictive action according to section 107

वारकरी प्रशिक्षण संस्था मारहाण प्रकरण : मारहाण करणाऱ्या महाराजाला अटक; कलम १०७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई

प्रतिनिधी, | Update - Jul 18, 2019, 08:01 AM IST

न विचारता बिस्किटाचा पुडा घेतला म्हणून चौथीतल्या मुलाला केली होती मारहाण

 • Warkari training institute riot case: Maharaja arrested ; Restrictive action according to section 107

  औरंगाबाद - न विचारता बिस्किटाचा पुडा घेतला म्हणून चौथीतल्या मुलाला मारहाण करणाऱ्या वारकरी प्रशिक्षण संस्थेचा संचालक रामेश्वर पवार याला वडोद बाजार पोलिसांनी मंगळवारी अटक केली. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला जामिनावर साेडले. पुढे अशा प्रकारचे वर्तन घडू नये म्हणून त्याच्यावर कलम १०७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती वडोद बाजार ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.


  माऊली वारकरी शिक्षण संस्था व संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड येथे ११ जुलै रोजी निरंजन जाधव या विद्यार्थ्याने एका मुलाचा बिस्किटाचा पुडा न विचारता घेतल्याने संस्थाचालक रामेश्वर पवार महाराज याने सदरील विद्यार्थ्यास स्पीकरचा वायर चाैपदरी करून मारहाण केली हाेती. यात विद्यार्थ्याला दुखापत झाली हाेती. निरंजनच्या आईच्या तक्रारीवरून रामेश्वर महाराज यांच्या विरोधात वडोद बाजार पोलिस ठाण्यात कलम ३२४ गंभीर दुखापत करणे, ३२३ साधी दुखापत आणि कलम ५०४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील दीड महिन्यांत तपास पूर्ण करत दोषारोप पत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास हवालदार शेख अजीज करीत आहेत.


  पोलिस अधीक्षकांसमोर कैफियत : मंगळवारी दुपारी निरंजनची आई चैताली जाधव व तिच्या मावशीने पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडल्यानंतर पाटील यांनी सबंधित पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्या नुसार मंगळवारी रात्रीच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
  मुले भेदरली : या प्रकारामुळे विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी शाळेला भेट दिली. त्यामुळे मुले काही प्रमाणात भेदरली होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास रामेश्वर महाराज पुन्हा शाळेत आला.

  गंभीर दखल घेतली
  पोलिसांनी संस्था चालक रामेश्वर पवार यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. शाळेतील इतर विद्यार्थ्यांचेही जवाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. भेदरलेल्या मुलांना पोलिसांनी आधार देण्याचे काम केले. लवकरच दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर करण्यात येईल.
  - सत्यजीत ताईतवाले, सपाेनि, वडोद बाजार ठाणे

  जया अंगी मोठेपण
  जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, या उक्तीप्रमाणे माझ्यासोबत प्रसंग घडत आहेत. सूड भावना ठेवून हे काम होत आहे. तो मुलगा सुधारावा म्हणून मी त्याला शिक्षा केली. मात्र सुधारण न दिसल्यामुळे मी त्याच्या आईला त्याला परत घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे सूड भावना ठेवूनच हे काम केले जात आहे. -रामेश्वर पवार महाराज

Trending