आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमुळे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीला उबदार पोशाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. एवढेच नव्हे तर ऋतुमानाप्रमाणे त्यांच्या खानपानाची देखील व्यवस्था आहे.   ऋतुमानाला योग्य होईल असे पदार्थ नैवेद्यांमध्ये त्यांना दाखवले जात असतात. सध्या थंडीचा मोसम सुरू असल्यामुळे पहाटेच्या थंडीत विठुरायाला उबदार कपड्यांचा पोशाख परिधान करण्यात येत आहे.  दोन हात करवती काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधून उबदार शाल पांघरण्यात येत आहे, तर रात्री शेजारतीनंतर रजई पांघरण्यात येत आहे. त्यामुळे थंडीच्या उबदार वातावरणात राजस सुकुमार असलेल्या सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच लोभस असे भासत आहे. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने थंडीची चाहूल थोडी उशिरानेच सुरू झाली. नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात थंडी पडायला सुरुवात झाली. सावळ्या विठोबा रखुमाईस प्रक्षाळपूजेपासून म्हणजे रविवार, १७ नोव्हेंबरपासून दररोज रात्री तसेच पहाटे उबदार कपड्यांचा पोशाख करण्यात येत आहे. पहाटेच्या नित्यपूजेवेळीच देवाला दोन हात करवती काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधून उबदार शाल पांघरण्यात येत आहे, तर रात्री शेजारतीनंतर रजई पांघरण्यात येत आहे. रुक्मिणी मातेलाही उबदार शाल पांघरण्यात येत आहे. हा पोशाख थंडी संपेपर्यंत राहणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांनी दिली.

उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचा पोशाख

थंडीप्रमाणेच उन्हाळ्यातदेखील विठुरायाचा पोशाख वेगळा असतो. पांढऱ्याशुभ्र रंगाचा संपूर्ण पोशाख उन्हाळ्यात त्यांना परिधान करण्यात येत असतो. खानपानाच्या बाबतीत देखील विठ्ठल-रुखुमाईची विशेष काळजी घेतली जाते. ज्या त्या ऋतुमानाप्रमाणे योग्य त्या पदार्थाचा समावेश असलेला नैवेद्य त्यांना दाखविण्यात येत असतो. विठ्ठलास उन्हाळ्याचा त्रास जाणवू नये, त्याला शीतलता मिळावी म्हणून दररोज दुपारी चंदनउटीनंतर लिंबू सरबत तसेच शिरा किंवा पोह्यांचा नैवेद्य दाखवण्यात येत असतो. काही वेळेस कैरीचे पन्हे आणि डाळीचादेखील नैवेद्य दाखवला जात असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...