Home | Maharashtra | Vidarva | Akola | Warning of protests in Akola for Dhanagar reservation

धनगर आरक्षणासाठी अकोल्यात दिला पराकोटीच्या आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी | Update - Aug 14, 2018, 12:23 PM IST

धनगर आरक्षणासाठी अकाेला, अमरावती, यवतमाळ, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात साेमवारी अांदाेलन करण्यात अाले.

 • Warning of protests in Akola for Dhanagar reservation

  अकाेला- धनगर आरक्षणासाठी अकाेला, अमरावती, यवतमाळ, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात साेमवारी अांदाेलन करण्यात अाले. अकाेल्यात मागणी मान्य न झाल्यास अांदाेलन करण्याचा इशारा देण्यात अाला अाहे. तर अमरावती अाणि यवतमाळात रास्ता राेकाे अांदाेलन करण्यात अाले. बुलडाण्यात धनगर समाजाने एकत्र येत अांदाेलन केले.


  सकल धनगर जमातीतर्फे साेमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे अांदाेलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात अाले. सातत्याने संघर्ष केल्यानंतरही राज्य सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे अारक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास पराकाेटीचे अांदाेलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात अाला.


  यवतमाळात रास्ता राेकाे; पुसद, महागाव, आर्णी तहसील कार्यालयावर मोर्चा
  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये अनुछेद क्र. ३६ वर केलेला असताना आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही. २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई यांनी सत्तेत आल्यास पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू असे लेखी आश्वासन दिले होते. सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास सरकार चालढकल करीत असल्याने सकल धनगर समाजातर्फे १३ ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे रास्ता रोको करण्यात आले तर पुसद, महागाव, आर्णी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.


  बुलडाण्यात एकवटला धनगर समाज
  धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज, १३ आॅगस्ट रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात समाजबांधवांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. येळकोट येळकोट जय मल्हार, अशी गर्जना करत दुपारी एक वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील हजारो धनगर समाजबांधव एकत्रित आले होते.


  अमरावतीमध्ये रास्ता रोको
  धनगर समाज संघर्ष समितीद्वारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर रहाटगाव टी-पाॅईंट येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, मल्हार सेनेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. रहाटगाव टी-पाॅईंट येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य साधून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अमरावतीहून नागपूरकडे जाणाऱ्या, नागपूरहून अमरावतीकडे येणाऱ्या तसेच बायपासवरील वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती.

Trending