मराठा क्रांती मोर्चा प्रकरण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट

दिव्य मराठी

Apr 24,2019 09:32:00 AM IST

पुसद - सकल मराठा समाजाच्या मूक मोर्चावर शिवसेनेच्या मुखपत्रातून अाक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत, राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध पुसद न्यायालयाने सोमवारी वॉरंट जारी केले आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने मूक मोर्चे सुरू होते. असे असताना मराठा समाजाच्या मूक मोर्चावर शिवसेनेच्या मुखपत्रात हे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. यात भारतीय सैन्य दलांमधील शहीद झालेल्या सैनिकांबाबतीत डेंग्यूच्या हल्ल्यात जवान शहीद झाले, सीमेवर नाही, असे संबोधले होते. या संदर्भात चिंतामणीनगर येथील दत्ता भाऊराव सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत तसेच व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध भादंविचे कलम २९२, २९५ अ, २९६, ५००, ५०१, सह कलम १३४ अ, ३४ , अनुसार खासगी फिर्याद पत्र दाखल केले होते. याची दखल घेऊन न्या. ए. एच. बाजड यांनी समन्स बजावले होते. तरी कुणीही हजर झाले नाही. त्यामुळे या प्रकरणी सोमवारी फिर्यादींनी दिलेले जवाब व त्यांचे वकील अॅड. आशिष देशमुख यांच्या युक्तिवादावरून उद्धव ठाकरे, संजय राऊत, राजेंद्र भागवत या तिघांविरुद्ध वॉरंट काढण्यात आले.

X