आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारणमंत्री म्हणतात, सध्याच्या समन्यायी पाणी वाटप कायद्यात बदल करण्याची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतला. आता या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्या जायकवाडीसंदर्भातील पाण्याचा विचार करता तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नसतानादेखील हे पाणी डोळ्यादेखत खाली जात असल्याने यावर िवचार व्हायला हवा, असे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी सांगितले.


जिल्ह्यातील धरणांसाठी जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास तीव्र विरोध होत असतानाच आता सत्ताधारी मंत्र्यानेच केलेल्या या वक्तव्याने जायकवाडीचे पाणी आणखी पेटण्याची शक्यता आहे. शनिवारी पालकमंत्री शिंदे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी संगमनेर तालुक्यात होते. जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी यापूर्वीच यासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित होते, मात्र समन्यायी पाणी वाटप कायदा २००५ मध्ये तयार 
करण्यात आला. हा कायदा करताना सर्वंकष विचार अपेक्षित होता. त्यावेळी पुरेसा विचार झाला नसल्याने आता पाणी सोडावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.


जिल्ह्यात दुष्काळ तीव्र होत असताना लोकांच्या डोळ्यांदेखत येथील पाणी जायकवाडीसाठी वाहून जात आहे. आहे त्या लोकांना पाणी नाही आणि आता ते डोळ्यासमोरून खाली जायकवाडीत जात आहे. जायकवाडीत पाणी असतानादेखील लवाद, न्यायालयाचे निर्णय आणि कायद्याच्या अनुषंगाने पाणी सोडणे प्रशासनाला 
बंधनकारक ठरत आहे. 


कायदा करतानाच तत्कालिन राज्यकर्ते आणि त्यांच्या नेतृत्वाने नीट लक्ष घालणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायदा आणि मेंढेगिरी समितीच्या अहवालावर दर पाच वर्षांनी आढावा घेतला 
जायला हवा. 


पाच वर्षांनंतर काय स्थिती आहे याची पडताळणी करण्याची आवश्यकता आहे. अन्याय होत राहिला, तर जवळच्या माणसाला पिण्यासाठी पाणी नाही आणि लांबच्या माणसाला दिले जाते अशी स्थिती निर्माण होईल. पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे, मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता जायकवाडीत नाही. अशा स्थितीत पाणी जायकवाडीत असल्याने याचा विचार व्हायला हवा, असे शिंदे म्हणाले.

 

पालकमंत्र्यांची गाडी अडवली

पालकमंत्री राम शिंदे यांची गाडी शनिवारी अडवून शिवसैनिकांनी समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करावा, तसेच जायकवाडीला सोडण्यात येणारे पाणी तत्काळ थांबवण्याबाबत निवेदन दिले. जायकवाडीसाठी पाणी सोडण्याऐवजी हे पाणी गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी सोडावे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. शेतातील उभी पिके जगवण्यासाठी पाण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, बाळासाहेब गिधाड, भागवत लांडगे, नितीन पुंड आदींच्या सह्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...