आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’चा जलसत्याग्रह (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळाशी महायुद्ध आरंभलेल्या ‘दिव्य मराठी’ने आता जलसत्याग्रह सुरू केला आहे. मशालीच्या प्रकाशात रात्र जागून गावकरी पाणी उपसताहेत आणि विहिराच्या तळाशी पाण्याचा टिपूसही दुरापास्त होत चाललाय, अशी उदाहरणे अपवादात्मक नाहीत. दूर अंतरावरून पाणी वाहून आणण्यातच मायमाउलींची जिंदगी बरबाद होत चालली आहे. पाणी फक्त डोळ्यात, अशी स्थिती महाराष्ट्राची आहे. ही आपत्ती नैसर्गिक आहे, हे खरेच. पण, मानवनिर्मितही आहे. आपली राजकीय, सामूहिक इच्छाशक्ती त्याला तेवढीच जबाबदार आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही त्या भागातील जनता सुखेनैव राहते, अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतानाही यंदा आपण भीषण पाणीटंचाई अनुभवतो आहोत. उत्तम व्यवस्थापनाने पाण्याची उपलब्धता वाढवता येते हे आजवर अनेक राज्यांनी, देशांनी अगदी आपल्या राज्यातील अनेक गावांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. महाराष्ट्रात उपलब्ध वापरायोग्य भूपृष्ठजलाचे प्रमाण भारतातील वापरायोग्य पाण्याच्या ९% तर जगातील वापरायोग्य पाण्याच्या ०.१३% एवढे आहे. चितळे जलसिंचन आयोगाच्या अंदाजानुसार, राज्यात भूपृष्ठजल व भूजलासह वापरासाठी सरासरी १,३९,२२७ दलघमी एवढे पाणी उपलब्ध आहे. २०३० साली राज्याची सिंचनाच्या व इतर पाण्याची एकूण गरज केवळ ९७,६६८ दलघमी एवढी असणार आहे. म्हणजेच पाण्याच्या वाढत्या गरजा भागवूनही २०३० साली सुमारे ४१,५५९ दलघमी एवढे पाणी महाराष्ट्रात शिल्लक राहणार आहे. देशात जेवढी मोठी धरणे आहेत, त्यातील ३५% एकट्या महाराष्ट्रात आहेत. राज्याची पाणीसाठा करण्याची क्षमता देशात सर्वात जास्त असणे ही आपली जमेची बाजू आहे. या पाण्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्याय आहेत, आणि आपण हे करू शकतो. अगदी अलीकडचे उदाहरण लातूरचे देता येईल. २०१५ मध्ये लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यानंतर तेथील प्रशासन आणि संस्थांनी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली. नंतरच्या हंगामात पाऊसही बऱ्यापैकी झाला. त्यामुळे २०१६ मध्ये लातूर जिल्ह्यात एकही टँकर लावावे लागले नाही, रेल्वे तर दूरच. लातूरकरांना जमले ते सर्वांनाच जमणारे आहे. गरज आहे ती कृतीची अन् व्यवस्थापनाची. ‘दिव्य मराठी’ने नवव्या वर्षात दाखल होताना त्या दिशेनेही एक पाऊल टाकले आहे. या वर्षात ‘पाणी’ हाच आमचा मुख्य मुद्दा असणार आहे. आज औरंगाबादमध्ये आम्ही त्याच विषयावर चर्चा केली आहे. पाण्याचा प्रश्न कठीण असेल, पण उत्तर आहे. पर्याय आहे. पर्यायाच्या वाटा अधोरेखित करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करणार आहोत. 
या कामात आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांचे स्वागत. आपण सर्व जण मिळून हा जलसत्याग्रह यशस्वी करू आणि दुष्टकाळाशी सुरू असलेले महायुद्ध जिंकू.

बातम्या आणखी आहेत...