आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी संकट: भर जुलैमध्ये पाणीटंचाई उद्भवली, अंबाजोगाई अन् आष्टी तालुक्यामध्ये १७८ टँकरला मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - जिल्ह्याची पावसाची सरासरी पर्जन्यमान हे ६६६.३६ मिमी असे त्यापैकी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्हाभरामध्ये केवळ १६९.६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्येही केवळ १५७.३ मिमी पाऊस झालेला हाेता. परिणामी समाधानकारक पाऊस नसल्याने पाणी टंचाईचे संकट कायम आहे. दरम्यान राज्य शासनाने देखील ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस न झाल्याने जलस्राेतांमध्ये वृद्धी झालेली नाही, अशा भागांचे सर्वेक्षण करून दुष्काळी उपाययाेजना लागू करण्याचा अध्यादेश काढलेला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी ३० जून नंतरही पाणी टंचाई जाहीर करून अंबाजाेगाई व आष्टी तालुक्यांमध्ये १७८ पिण्याच्या पाण्याच्या टँकरला मंजुरी दिली आहे. 


सामाधानकारक पाऊस न झाल्याने ज्या तालुक्यामध्ये पाणी टंचाईसदृश परिस्थिती आहे, अशा तालुक्याचे तहसीलदार, बीडीआे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी संयुक्त टंचार्इ अहवाल हा उपविभागीय अधिकारी यांना पाठवावा. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे द्यावा. पुढे सीईआे यांनी पडताळणी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे विहिर, बाेअर अधिग्रहण व पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी करावी अशी तरतूद महाराष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन ) अधिनियम , २००९ मध्ये आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ३० जून राेजी अध्यादेश काढला. आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी पाणी टंचाई जाहीर केली आहे.

 

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे किंवा अन्य कारणांमुळे ग्रामीण व नागरी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. शासनाने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ग्रामीण व नागरी क्षेत्रात घ्यावयाच्या उपाययोजनांकरिता वेळोवेळी स्थायी आदेशांद्वारे निर्णय घेतलेले आहेत. ३ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत कार्यवाही निश्चित करण्यात आल्या आहे . स्थायी आदेशानुसार पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणाऱ्या उपाययोजना ३० जूनपर्यंत राबवणे आवश्यक आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना  ३० जून नंतरही राबवण्याबाबत आवश्यकतेनुसार विशिष्ट प्रकरणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन ) अधिनियम , २००९ मधील तरतुदीनुसार पिण्याच्या पाण्याची टंचाई भासल्यास कोणत्याही वेळी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाहीर करून टंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांमधील उपयुक्त टंचाई निवारक उपाययोजना घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. ३० जूननंतर टंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे वारंवार विचारणा करण्यात येत आहे. त्यामुळे  ३० जूननंतर टंचाई अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना सुरू ठेवावयाच्या असल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी टंचाई परिस्थितीचा फेर आढावा घेऊन महाराष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन ) अधिनियम , २००९ मधील तरतुदीनुसार पिण्याच्या पाण्याची टंचाई जाहीर करून  ३० जून नंतरच्या काळातही दुष्काळी उपाययाेजना राबवण्याचा अध्यादेश राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने काढले आहेत.

 

जिल्ह्यातील १०३ प्रकल्प काेरडे
जिल्ह्यामध्ये सात जूनपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी नंतरच्या काळामध्ये माेठा खंड पडलेला आहे. परिणामी जलस्राेतांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी तब्बल १०३ प्रकल्प काेरडे आहेत. २५ ते ५०  टक्के पाणीसाठा केवळ दाने प्रकल्पांमध्ये असून सात प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

 

आष्टी अन््  अंबाजाेगाई तालुक्यात तीव्र पाणीटंचाई
जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ५८ गावांमध्ये पाणीटंचार्इ कायम राहिली आहे  त्यामुळे ५८ पाणी टंॅकर तसेच अंबाजाेगार्इ तालुक्यातील ९५ गावे आणि ६३ वाडी यासाठी १२० टॅंकर मंजूर करून पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिलेले आहेत.

 

पाऊस पडेपर्यंत टँकर : जयदत्त क्षीसागर
मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना पिण्यासाठी आणि जनावरांसाठी ठिकठिकाणी टँकर चालू ठेवण्याची मागणी रोजगार हमी व फलाेत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे टँकरची संख्या प्रशासनाकडून कमी होण्याआधी मंत्री क्षीरसागर यांनी सोमवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पुरेसा पाऊस पडेपर्यंत टँकर चालू ठेवण्याची मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली असून पुरेसा पाऊस पडेपर्यंत राज्यातील टँकर चालू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...