आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वाॅटर कप’चे बक्षीस वितरण: टाकेवाडीचे गावकरी ‘कराेडपती’; सरकारकडूनही 25 लाखांचे बक्षीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिद्ध अभिनेते अामिर खान यांच्या ‘पाणी फाउंडेशन’तर्फे घेण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप- २०१८’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात ७५ लाखांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळवण्याचा मान सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी अांधळी (ता. माण) या गावाने पटकावला अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या गावकऱ्यांच्या श्रमदानाचे काैतुक करत राज्य सरकारतर्फे २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. त्यामुळे दुष्काळमुक्तीसाठी सामूहिक लढा देणाऱ्या या गावाने तब्बल १ काेटी रुपयांचे पारिताेषिक पटकावले अाहे. 


सातारा जिल्ह्यातीलच भांडवली (ता. माण) व बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड (ता. माेताळा) या गावांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या दाेन्ही गावांना प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस पाणी फाउंडेशनतर्फे देण्यात अाले. तर बीड जिल्ह्यातील अानंदवाडी (ता. अाष्टी) व नागपूर जिल्ह्यातील उमठा (ता. नरखेड) या तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या गावांना प्रत्येकी २० लाखांचे बक्षीस देण्यात अाले. दुसरा व तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या गावांना राज्य सरकारतर्फे अनुक्रमे १५ व १० लाखांचे प्राेत्साहनपर पारिताेषिक मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.  


दरम्यान, दुष्काळमुक्त राज्य हे संपूर्ण महाराष्ट्राचे स्वप्न आहे. ते पूर्ण करणेही सरकारचे एकट्याचे काम नाही. प्रत्येकाने या कामात स्वत:ला जोडून घेतले, तरच महाराष्ट्र पाणीदार बनेल, असे मत प्रसिद्ध अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे प्रमुख अामिर खान यांनी व्यक्त केले. 

 

यांना मिळाले पुरस्कार...

- सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी गावाला पहिले पुरस्कार जाहीर झाले. या गावाला पुरस्काराची रक्कम 75 लाख आणि मानचिन्ह दिले जाणार आहे. सोबतच, राज्य सरकारकडून अतिरिक्त 25 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. 

- साताऱ्यातील मांडवी गावाला दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बुलडाण्यातील सिंदखेड गावालाही दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या दोन्ही गावांना पुरस्काराची रक्कम 25-25 लाख अशी विभागून दिली जाणार आहे. यांनाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या राज्य शासनाकडून अतिरिक्त 15 लाख रुपये विभागून दिले जातील.

- बीड जिल्ह्यातील आनंदवाडी गावाला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोबतच नागपूर जिल्ह्यातील उमठा गावाला सुद्धा तिसरे पुरस्कार देण्यात आले आहे. या दोन्ही गावांना तिसरे पुरस्कार विभागून दिले जाणार आहे. राज्य सरकारकडून त्यांना 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.

 

 

कार्यक्रमात राजकीय फटकेबाजी...
या कार्यक्रमात उपस्थित मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय टीकास्त्र सुद्धा दिसून आले. सुरुवातीला भाषण करणारे राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि त्यापूर्वीच्या सरकारांनी काम केले नाही अशी टीका केली. एवढेच नव्हे, तर गेल्या 60 वर्षांत सिंचनाचा पैसा कुठे गेला असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यावर अजित पवारांनी काही लोक फक्त बोलतात करत काहीच नाहीत अशा शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज ठाकरेंचा समाचार घेताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुद्धा समाचार घेतला. राजकीय नेते कधी एक होणार नाहीत फक्त भांडत राहणार याची जाणीव आमिर खान यांना होती त्यामुळेच त्यांनी पाणी फाउंडेशन स्थापित करून स्वतः काही करण्याचा निर्णय घेतला आणि परिणाम सर्वांसमोर आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

पहिले पारितोषिक जिंकणाऱ्यांना अतिरिक्त 25 लाख - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी वॉटर कप जिंकणाऱ्या गावांसाठी राज्य शाससनाकडून 3 पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात पहिला येणाऱ्या गावास 25 लाख रुपये, दुसरे पुरस्कार मिळवणाऱ्या गावाला 15 लाख आणि तिसरे पारितोषिक जिंकणाऱ्यांना 10 लाख रुपये दिले जातील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...